- प्रकाश शेलार
खुटबाव : नानगाव (ता. दौंड) येथील सोपान विठोबा रासकर हे स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू केलेला कपडे शिवण्याचा व्यवसाय आता छंद म्हणून जोपासत आहेत. वयाच्या नव्वदीतही ते ‘फिट अँड फाइन’ आहेत. त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांच्या कौतुकाचा ते विषय ठरले आहेत. ९२ वर्षाच्या आयुष्यामध्ये हजारो व्यक्तींच्या कपड्यांची शिलाई करत त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचे काम त्यांनी केले आहे.
रासकर यांचा जन्म सन १९३१मध्ये झाला. त्यांनी वयाच्या १३ वर्षापासून शिवणकामाचे धडे आपली आजी कै. अनुराधा रासकर यांच्याकडून घेतले. त्याकाळी शिलाई मशिन नव्हत्या. आजीने स्वतःच्या हाताने कपडे शिवण्याची कला त्यांना दिली. पूर्वीच्या काळी माणसाचे शरीर पाहून कपडे शिवले जायचे. तेव्हा बारबंदी व चारबंदी ही प्रसिद्ध वस्रे असायची.
शाळेची पायरी न चढलेले रासकर यांनी सन १९४६ मध्ये दौंड तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये पहिली शिलाई मशिन घेतली. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढत गेला. त्यांच्या हाताखाली शिलाईकाम करणारे १० मजूर असायचे.
या मजुरांना पुरेल एवढे शिलाई काम दौंड व शिरूर तालुक्यातील आसपासच्या २५ गावांतून मिळायचे. त्याकाळी बंडी (५० आणे), कोपरी (४ आणे), चोळी (२ आणे), परकर (२ आणे) आणि पायजमा (२ आणे), असे शिलाईचे दर असायचे.
परिसरातील एखाद्या गावची यात्रा असली तर १० शिलाई मशिन बैलगाडीमध्ये भरून नेल्या जायच्या. त्या गावी रासकर व मजुरांचा महिनाभर मुक्काम असायचा. संपूर्ण गावातील ग्रामस्थ व पै- पाहुण्यांचे कपडे शिवले जायचे. त्यांनी सन १९७२च्या दुष्काळामध्ये परिसरातील अनेक गोरगरीब व्यक्तींना मोफत कपडे शिवून देण्याची सेवा केली.
आज ९२ वर्षे वय झाले तरी त्यांच्या दिवसाची सुरवात चालण्याच्या व्यायामाने होते. हळूहळू शिलाई कामाचा व्यवसाय त्यांनी कमी केला असला, तरी तरी आवड म्हणून दिवसातून १ तास ते शिलाई मशिनवर बसतात. कुटुंबीयांतील व्यक्तींच्या कपड्यांना शिलाई करण्याचे काम आवडीने करतात. सायकल चालवणे, शेती काम करणे, गुरांचे काम करणे, आदी कामे ते सफाईदारपणे पार पाडतात. विशेष म्हणजे नजर तीक्ष्ण असल्याने ते सुईमध्ये दोराही ओवतात.
रासकर यांची पुढील पिढी उद्योग व्यवसाय व नोकरीमध्ये गुंतली आहे. तरीदेखील त्यांनी आठवण म्हणून जुन्या काळातील शिलाई मशिन आवर्जून घरामध्ये ठेवली आहे. घरातील चिमुकल्यांना शिलाई कामाचे धडे देत आहेत.
‘कोविड’मधून बचावले
कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये सोपान रासकर यांना कोविड झाला. एचआरसीटी स्कोर १९ होता. पारगाव येथील एका शासकीय कोविड सेंटरला ते स्वतः क्वारंटाइन झाले. ४ दिवस अतिदक्षता विभागात राहून त्यांनी कोविडपासून स्वतःची सुटका करून घेतली. वयाच्या नव्वदीतही कोविडशी संघर्ष करत विजय मिळवला. आता उरलेले आयुष्य बोनस मिळाल्याचे ते आनंदाने सांगतात.
संतुलित आहार व व्यायाम हे आपल्या निरोगी आरोग्याचे लक्षण आहे. वर्षापूर्वी गुडघे दुखतात म्हणून शरीराच्या सर्व टेस्ट केल्या असता, मला कसलीच आजाराची विशेष लक्षणे निघाली नाहीत. मला कसलीही गोळी चालू नाही. माझी दृष्टी व श्रवण क्षमता चांगली आहे. त्यामुळे आयुष्याचा प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आहे.
- सोपान रासकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.