निरगुडसर : कुठलेही क्लास न लावता प्रतिकूल परिस्थितीवर मात करत आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर येथील भाजीपाला विक्री करणाऱ्या दाम्पत्याचा मुलगा प्रशांत बबन दांगट यांने एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले आहे,आपल्या आई वडिलांचे स्वप्न सत्यात उतरून प्रशांतने पीएसआय पदाला गवसणी घातल्याने सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
निरगुडसर येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील प्रशांत बबन दांगट यांचा नुकताच एमपीएससी महाराष्ट्र लोकसेवा आयोग पोलीस उपनिरीक्षक पदाचा निकाल लागला असून प्रशांत याने ४४० पैकी ३४९ गुण मिळवून त्याचा राज्यात सहावा क्रमांक आला आहे, त्याच्या पोलीस उपनिरीक्षकपदी निवडीची बातमी कळताच निरगुडसर गावी त्याच्या मित्रपरिवार, श्रीराम प्रतिष्ठान व कुटुंबीयांनी फटाके फोडत एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला आहे.
प्रशांत याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मेंगडेवाडी, रत्नभूमी विद्यालय रामजी नगर घाटकोपर, माध्यमिक शिक्षण पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय निरगुडसर, उच्च माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय व अण्णासाहेब आवटे कॉलेज येथे झाले.
पुणे येथील मॉडर्न कॉलेज येथे बीएससी पदवी प्राप्त केली आहे तर आबेदा इनामदार कॉलेज पुणे येथे एमस्सी पदवी प्राप्त केली आहे. लांडेवाडी येथील कॉलेजला बीएडचे शिक्षण पूर्ण करून काही काळ गेनबा मोझे कॉलेज येथे शिक्षकाची नोकरी केली.
नोकरी करत असताना बरोबरचे अनेक मित्र, मैत्रिणी एमपीएससीचा अभ्यास करत असल्याने तिच प्रेरणा घेऊन व पोलिस दलाबद्दल आवड निर्माण झाल्यानंतर प्रशांत याने एमपीएससीचा अभ्यास सुरू केला,त्याने २०२० साली पोलीस उपनिरीक्षक पदाची परीक्षा दिली होती पण ४ गुणांनी त्याची निवड हुकली होती नंतर पुन्हा त्याच जोशाने अभ्यास करून पुन्हा पोलिस उपनिरिक्षक ( पी एस आय ) २०२२ ची परीक्षा दिली व तो उत्तीर्ण झाला.
प्रशांत हा सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा असून त्याचे कुटुंबीय निरगुडसर येथे शेतमजुरी तसेच भाजीपाल्याचा व्यवसाय करतात. प्रशांत याने प्रतिकूल परिस्थितीवर मात करत परीक्षेचे कुठलेही क्लास न लावता आपल्या मित्रांबरोबर पुणे ग्रंथालयात दिवस रात्र अभ्यास करून हे यश मिळवले आहे. त्याच्या यशात आई, वडील, दोन भाऊ, बहिण, मित्र परिवार, नातेवाईक यांचा मोलाचा वाटा आहे.
आई वडिलांचे स्वप्न सत्यात उतरवले. प्रशांत दांगट म्हणाला की,मी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत अभ्यास करत कुठलाही क्लास न लावता हे यश मिळवले असून माझ्या यशात माझे कुटूंबीय , मित्रांचे मोलाचे योगदान आहे.
मी गेली चार-पाच वर्ष एमपीएससीचा अभ्यास करत होतो अनेक परीक्षेत यश आले नाही मात्र जोमाने अभ्यास करत राहिलो व यश संपादन केले आज पोलीस उपनिरीक्षक पदावर निवड झाल्याचा मनस्वी आनंद होत आहे. आई वडिलांचे व मी मनाशी बाळगलेले स्वप्न सत्यात उतरवल्याने खूप आनंद होत आहे. सोबत आयकार्ड फोटो प्रशांत दांगट
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.