पुणेः भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसबा पेठ मतदारसंघामध्ये काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांचा दणदणीत विजय झाला आहे. धंगेकरांना ७२ हजार ५९९ तर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना ६१ हजार ७७१ मतं मिळाली आहेत. साधारण १० हजार ८०० मतांनी धंगेकर विजयी झाले आहेत.
खरंतर कसबा पेठ निवडणूक दोन्ही पक्षांसाठी रंगीत प्रतिष्ठेची झाली होती. कसबा हा भाजपला बालेकिल्ला समजला जात असला तरी पेठेतल्या मतदारांनी भाजपला नाकारलं आहे. स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कसब्यात ठाण मांडून होते. रात्री-अपरात्री त्यांनी मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या. विशेष म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हेदेखील प्रचारादरम्यान पुणे दौऱ्यावर होते. ही निवडणूक २०२४ विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम समजली जाते. कसब्यातून काँग्रेसला परवलीचा मुद्दा सापडलाय का? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
स्थानिक उमेदवार आणि स्थानिक मुद्दे घेऊन कसब्याची निवडणूक झाली. शिवाय रवींद्र धंगेकर यांचं ग्राऊंड लेव्हलवरील काम, त्यांचा साधेपणा; हे मुद्दे काँग्रेसच्या आणि महाविकास आघाडीच्या कामी आले आहेत. काँग्रेसला धंगेकरांच्या माध्यमातून विजयाचा सूर गवसू शकतो, असंही राजकीय जाणकार सांगतात.
यामुळे धंगेकरांचा विजय झाला?
भाजपने टिळकांना उमेदवारी नाकारल्याने मतदार नाराज असल्याचं सांगितलं जातं. हे एक महत्वाचं कारण हेमंत रासनेंच्या पराभवाचं असल्याचं समोर येतंय. दुसरं कारण यावेळी कसब्यात थेट दुरंगी लढत झाली. यापूर्वी कसब्यामध्ये तिरंगी लढती झालेल्या आहेत. या लढतींमुळे कसब्यातल्या मतदारांच्या भरोशावर भाजपला विजय सोपा होत होता.
रवींद्र धंगेकर यांच्या विजयाचं तिसरं कारण ओबीसी उमेदवार असल्याचं सांगितलं जातं. भाजपने ब्राह्मण समाजाला डावलून हेमंत रासनेंना उमेदवारी दिली. त्यामुळे काँग्रेसनेही ओबीसी उमेदवार रिंगणात उतरवला. आधीच टिळकांमुळे नाराज झालेली ब्राह्मण मतं भाजपपासून आणखीच दुरावली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.