गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात आजअखेरपर्यंत (ता. २९ जून २०२१) ६८ हजार १८४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या.
पुणे - जून महिना संपला तरी अद्यापही पुणे जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्यांसाठी पुरेसा पाऊस पडला नसल्याने जिल्ह्यातील खरीपाच्या पेरण्या या पावसाअभावी लांबणीवर पडल्या आहेत. यामुळे पुरेशा प्रमाणात पाऊस नसल्याने पेरण्याच पूर्ण होऊ शकलेल्या नाहीत. मात्र पावसाअभावी भात लावणीस उशीर होणार आहे. परिणामी यंदा भात उत्पादनात घट होण्याचा धोका वाढला आहे. शिवाय कडधान्य पिकांवरही परिणाम होणार आहे.
गेल्या वर्षीच्या खरीप हंगामात आजअखेरपर्यंत (ता. २९ जून २०२१) ६८ हजार १८४ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदाच्या खरीप हंगामात मात्र आजअखेरपर्यंत २९ हजार ९०२ हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. यंदाच्या हंगामातील पेरण्यांचे हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत निम्म्याहून कमी आहे. जिल्ह्यात शिरूर तालुक्यात सर्वाधिक ६ हजार ३७१ हेक्टर क्षेत्रावर तर सर्वात कमी पेरण्या हवेली तालुक्यात पूर्ण झाल्या आहेत. हवेली तालुक्यात आतापर्यंत केवळ २८ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत.
जिल्ह्यातील काही भागात मे जून महिन्याच्या मध्यात एक पाऊस झाला होता. या एकाच पावसावर या पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत. त्यानंतर काही भागात अधूनमधून तुरळक सरी पडत असल्याने ही पिके तग धरून आहेत.
पुणे जिल्ह्याचे उसाचे क्षेत्र वगळता खरीप पिकाचे एकूण सरासरी क्षेत्र हे १ लाख ७४ हजार ९८८ हेक्टर इतके आहे. जिल्ह्यात खरिपाचे सर्वाधिक २९ हजार ९३३ हेक्टर क्षेत्र हे जुन्नर तालुक्यात असून, सर्वात कमी म्हणजे केवळ २ हजार ९९२ हेक्टर क्षेत्र हे दौंड तालुक्यात आहे. जिल्ह्यात खरीप हंगामात भात, खरीप ज्वारी, बाजरी, रागी, मका, तूर, मूग, उडीद, भुईमूग, तीळ, कारळे, सूर्यफूल, सोयाबीन आदी प्रमुख पिके घेतली जातात.
खरिपाचे सरासरी व पेरणी झालेले क्षेत्र (हेक्टरमध्ये)
- तालुका --- सरासरी क्षेत्र --- पेरणी पूर्ण झालेले क्षेत्र
- हवेली --- ४०७५ --- २८
- मुळशी --- ८७७३ --- ७०६
- भोर --- १४६४३ --- १०२६
- मावळ --- १२७५५ --- १५२८
- वेल्हे --- ५९९४ --- ६१९
- जुन्नर --- २९९३३ --- ५०६१
- खेड --- २३६१९ --- ३९२४
- आंबेगाव --- ४५१५ --- ३३८१
- शिरूर --- २७४३२ --- ६३७१
- बारामती --- १०२८१ --- ४७०५
- इंदापूर --- ८३८१ --- १३५६
- दौंड --- २९९२ --- ७२६
- पुरंदर --- २१५९४ --- ४७०
भाताची रोपे करपू लागली
जिल्ह्यातील भोर, वेल्हे, मावळ आणि मुळशी हे चार तालुके आणि हवेली तालुक्यातील काही क्षेत्र हे भात पिकांचे आहे. त्यामुळे या तालुक्यात भाताची लावणी मोठ्या प्रमाणात होत असते. ही भात लावणी करण्यापूर्वी शेतकरी किमान एक महिना आधी भाताची रोपे तयार करण्यासाठी रोपवाटिका तयार करत असतात. परंतु यंदा यासाठी पुरेसा पाऊस न झाल्याने, काही शेतकऱ्यांनी विहिरीचे पाणी किंवा धरणांतील पाण्यावर रोपवाटिका तयार केल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांनी एका पावसाच्या पाण्यावर रोपवाटिका तयार केल्या, अशा रोपवाटिकांमधील भाताची रोपे करपू लागली आहेत.
जिल्ह्यात पाऊस लांबला असल्याने, अद्याप पुरेशा प्रमाणात खरीपाच्या पेरण्या पूर्ण झालेल्या नाहीत. गतवर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत निम्म्याहून कमी क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत.
त्यामुळे जिल्ह्यात खरीप हंगामात दुबार पेरण्यांचे संकट येणार नाही. दुबार पेरण्यांचे संकट आता टळणार आहे.
- ज्ञानेश्वर बोटे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.