किरकटवाडी: एकीकडे पुणे जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्ण संख्या झपाट्याने वाढत असताना रुग्णांना घेऊन जाण्यासाठी वेळेत रुग्णवाहिका उपलब्ध होत नसल्याचे चित्र आहे तर दुसरीकडे ग्रामपंचायतींच्या माध्यमातून तब्बल सोळा-सोळा लाख रुपये खर्च करून घेतलेल्या रुग्णवाहिका चालकांअभावी धूळ खात पडून असल्याचे दुर्दैवी चित्र खडकवासला व खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या रुग्णवाहिकांबाबत दिसून येत आहे. ग्रामपंचायतींच्या निधीचा अपव्यय झाल्याचा आरोप सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी केला आहे.
ऑगस्ट 2020 मध्ये पुणे जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतींकडून 14 व्या वित्त आयोगातील निधीचा वापर करून रुग्णवाहिका खरेदी करण्यात आल्या. खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी नऱ्हे ग्रामपंचायतीने 5,14,818 रुपये, नांदेड ग्रामपंचायतीने 4,29,419 रुपये, किरकटवाडी ग्रामपंचायतीने 2,49,454 रुपये, नांदोशी-सणसनगर ग्रामपंचायतीने 24,000 रुपये, खडकवासला ग्रामपंचायतीने 3,01,398 रुपये व गोऱ्हे बुद्रुक ग्रामपंचायतीने 67,677 रुपये असा एकूण 15,86,766 रुपये निधी दिला होता. सुमारे सोळा लाखांच्या निधीतून खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राला रुग्णवाहिका मिळाली मात्र केवळ काही दिवस वापर झाल्यानंतर चालकाअभावी रुग्णवाहिका धूळखात पडून आहे. सध्या खडकवासला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हद्दीत 319 ऍक्टिव्ह कोरोणा रुग्ण आहेत. तसेच दिवसेंदिवस रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. असे असताना नवी कोरी रुग्णवाहिका मात्र वापराविना पडून आहे. खानापूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेबाबतही असेच चित्र दिसून येत आहे.याबाबत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर भगवान पवार यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु संपर्क होऊ शकला नाही.
का मिळत नाहीत चालक?
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधित रुग्णवाहीकांना चालक पुरविण्याबाबतचा करार बी.व्ही.जी. गृप बरोबर झालेला आहे. या चालकांना केवळ आठ हजार रुपये दरमहा पगार दिला जात असल्याने चालक काम करण्यास नकार देत आहेत. जोखमीचे काम असल्याने पगार जास्त मिळावा अशी अपेक्षा चालक व्यक्त करत आहे. तसेच चालक म्हणून नियुक्ती तात्पुरत्या स्वरूपाची असल्याने अनेकांकडून काम करण्यास नकार येत आहे.
"आरोग्य विभागाला रुग्णवाहिका सांभाळता येत नसेल तर ती ग्रामपंचायतींच्या ताब्यात द्यावी. ग्रामपंचायतींच्या माध्यमातून चालकाची व्यवस्था करून नागरिकांची गैरसोय टाळता येईल. सात ते आठ महिने झाले सदर रुग्णवाहिका उपयोगात आल्याचे दिसून आले नाही." सुशांत खिरिड, ग्रा.पं.सदस्य, माजी उपसरपंच, गोऱ्हे बुद्रुक.
" नोटीस काढून सक्तीने ग्रामपंचायतींकडून चौदाव्या वित्त आयोगातील निधी रुग्णवाहिका खरेदी करण्यासाठी वर्ग करून घेण्यात आला; तीच तत्परता प्रशासनाने रुग्णवाहिकेच्या वापराबाबत दाखविलेली दिसत नाही. रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णवाहिकेची नितांत गरज आहे." नरेंद्र हगवणे, ग्रा.पं. सदस्य, माजी उपसरपंच, किरकटवाडी.
"ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ज्या रुग्णवाहिका खरेदी करण्यात आलेल्या आहेत त्यांचे डिझेल खर्च व इतर नियोजन जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांडे देण्यात आलेले आहे.रुग्णवाहिका का बंद आहेत त्याबाबत गटविकास अधिकार्यांकडून माहिती मागविली जाईल." संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत विभाग, पुणे जिल्हा परिषद.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.