आंबेठाण (पुणे) : खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणावरून पुणे शहराच्या पूर्व भागाला पाणी पुरवठा करण्यासाठी टाकण्यात येत असलेल्या जलवाहिनीचे काम आजपासून (ता. १४) प्रचंड पोलिस बंदोबस्तात सुरू करण्यात आले आहे. हे काम सुरू करण्याला प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचा विरोध आहे, तर दुसरीकडे गावपातळीवर जाऊन प्रशासनाच्या वतीने शेतकऱ्यांना जमीन मोबदला देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
भामा आसखेड धरणावरून पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी जलवाहिनी टाकण्यात येत असून, किरकोळ अपवाद वगळता या जलवाहिनीचे एक किलोमीटरचे काम आसखेड खुर्द गावच्या परिसरात सर्वानुमते बाकी ठेवण्यात आले होते. परंतु, कालपासून अचानक प्रशासनाने सूत्रे हलवून हे काम सुरू करण्यासाठी हालचाली केल्या. त्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला. प्रश्न प्रलंबित असल्याने काम बाकी ठेवायचे, असे ठरले असताना देखील पोलिस बळाचा वापर करून शासन जी दडपशाही करीत आहे, याचा प्रकल्पग्रस्तांनी निषेध केला आहे.
आजच्या पोलिस बंदोबस्तासाठी एक पोलिस निरीक्षक, १६ अधिकारी,राज्य राखीव पोलिस दलाचे १०० कर्मचारी, आणि पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील ७५ कर्मचारी उपस्थित होते. तर, दुसरीकडे आर्थिक स्वरूपात मोबदला देण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी पाईट, शिवे, अहिरे, पाळू, आंबोली, वहागाव आणि करंजविहिरे या सजाच्या ठिकाणी उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत पथक तयार करून गावपातळीवर शेतकऱ्यांना आर्थिक मोबदला देण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. परंतु, आम्हाला जर आर्थिक मोबदला घ्यायचा असता, तर आम्ही तीस वर्षे न्यायालयात आणि रस्त्यावर लढा कशाला दिला असता, असा सवाल प्रकल्पग्रस्त शेतकरी करीत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.