पिंपळवंडी : पिंपरी पेंढार(ता.जुन्नर) येथील डेरे मळा शिवारात शुक्रवारी पहाटेच्या दरम्यान वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद झाला.बुधवारी सकाळी सहाच्या दरम्यान सुजाता डेरे या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यु झाला होता.
यानंतर वनविभागाने या परिसरात ३० पिंजरे,ट्रॅप कॅमेरे लावले होते.तसेच थर्मल ड्रोनच्या सहाय्याने देखील बिबट्याचा मागोवा घेण्याचे काम सुरु होते. वनविभागाचे अधिकारी व १०० कर्मचारी या परिसरात बिबट्याला पकडण्यासाठी तैनात करण्यात आले होते.
डेरे यांच्या घरा मागे १०० मीटर अंतरावर लावलेल्या पिंजऱ्यात शुक्रवारी पहाटेच्या वेळी नर बिबट जेरबंद झाला असल्याची माहिती जुन्नरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण व वनपाल अनिल सोनवणे यांनी दिली.
पकडलेला बिबट हा ६ वर्षांचा नर बिबट असुन.सदर बिबट्याला माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आलेले आहे.डेरे यांच्यावर हल्ला केलेला बिबट्या हा देखील पुर्ण वाढ झालेला नर बिबट असल्याचे वनविभागाने सांगितले होते.
चव्हाण यांनी सांगितले की या परिसरात पिंजरे लावलेले असुन या परिसरातील लवकरच सर्व बिबटे पकडण्यात येतील.नागरिकांनी बिबट प्रवण क्षेत्रात वावरत असताना काळजी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.
मे महिन्यापासून बिबट्याच्या हल्ल्यात मानवी मृत्युचे प्रमाण वाढले असल्याने जुन्नर परिसरातील नागरिक बिबट्याच्या दहशतीत जगत आहेत.घराबाहेर पडण्यास त्यांना भीती वाटत आहे.पुढील काळात ऊसतोडणी सुरु झाल्यावर पुन्हा बिबट्यांचे हल्ले वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.यावर कायमस्वरूपी उपाय करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.
दरम्यान जुन्नर मधील सर्व बिबटे पकडण्याच्या मागणीसाठी शरद सोनवणे हे याठिकाणी आंदोलनाला बसले आहेत.ज्या परिसरात हा बिबट्या जेरबंद झाला त्या जागेच्या काही अंतरावरच सोनवणे हे आंदोलनासाठी बसलेले आहेत.सोनवणे यांना पाठिंबा देण्यासाठी पिंपरी पेंढार सह परिसरातील गावकरी तेथे भेट देत आहेत. वनविभागाने लवकरात लवकर बिबट्याच्या या समस्येवर उपाय काढावा हि मागणी सोनवणे करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.