पुणे : ‘‘आज ज्या साहित्य संस्था स्वायत्तपणे काम करत आहेत, आणि त्यांच्या भरवशावर जे लेखक, कलावंत लिहित आहे, त्यांच्यावर भयाचे सावट आहे. मनातले खरे बोलायला जिथे भिती वाटते, अशा समाजाच्या दिशेने आपण जात आहोत. यापासून आपल्याला अभय कोण देणार, हा प्रश्न आहे. या परिस्थितीत लेखकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी साहित्य संस्थांवरच आहे’, असे मत लेखक, संपादक किशोर बेडकिहाळ यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) ११६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी निरंजन घाटे यांना ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्कार, तर बेडकिहाळ यांना ‘डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष राजीव बर्वे, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे आणि कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार उपस्थित होते.
‘पुणे विद्यापीठाची स्थापनाच मराठी भाषेच्या प्रचार, प्रसारासाठी झाली. त्यामुळे विद्यापीठाने विज्ञानविषयक पुस्तके मराठीत प्रकाशित केले असते, तर मराठी ज्ञानभाषा होण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल पडले असते. इथून पुढे याबाबत कृती व्हायला हवी’, अशी अपेक्षा घाटे यांनी व्यक्त केली. तर, ‘मराठी साहित्यिकांच्या स्वातंत्र्यावर जर कोणी गदा आणली, तर महाराष्ट्र साहित्य परिषद त्याच्यामागे खंबीरपणे उभी राहील’, असे आश्वासन डॉ. कसबे यांनी दिले. डॉ. करमळकर यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रा. जोशी यांनी प्रास्ताविक केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले. पवार यांनी आभार मानले.
‘समाजाचा मौनराग सुटावा’
किशोर बेडकिहाळ यांनी आपल्या मनोगतात सध्याच्या राजकीय व सामाजिक परिस्थितीवर उपहासगर्भ शैलीत भाष्य केले. ‘सध्या भारतच कूस बदलतो आहे. आपल्या सगळ्यांचे वय आता बहुधा आठच वर्ष आहे. २०१४ नंतर नवा भारत निर्माण झाला असेल, तर आपले वय आठच असणार’, असे म्हणत ‘फुले-शाहू-आंबेडकर यांना आपण महाराष्ट्राचे महापुरुष मानत होतो. अजूनही आपण मानतो. मात्र आता नवे महापुरुष जन्माला आले आहेत. या नव्या महापुरुषांना त्या त्या क्षणी सत्याची नवी उपरती होते आणि त्यातून नवनवे कार्यक्रम जन्माला येतात. शांतताप्रिय महाराष्ट्राला मग अचानक भोंग्याची आठवण होते’, अशा शब्दांत त्यांनी परखड टीका केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.