न्हावरे - भाजपवाले म्हणत असतील आम्ही जानकारांना मंत्री केले म्हणून त्यांनी माझ्यावर उपकार केले नाहीत. तर त्यांना मी मुख्यमंत्री केले म्हणून त्यांनी मला मंत्री केले असा सणसणीत टोला भाजपला राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री महादेव जानकर यांनी लगावला.
न्हावरे (ता. शिरूर) येथे राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने मिशन २०२४ अंतर्गत काढण्यात आलेल्या जनस्वराज्य यात्रेनिमित्त झालेल्या सभेत ते बोलत होते पुढे बोलताना माजी मंत्री महादेव जानकर म्हणाले की, भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे दोन्हीही पक्ष वेश बदलून सर्वसामान्य जनतेला लुटण्याचे काम करत आहेत.
काही पक्ष केवळ पोरीसाठी, पुतण्यासाठी व मुलांच्या राजकीय भवितव्यासाठी चालविले जात आहेत. मला बायको नाही, पोरं नाहीत त्यामुळे इतरांप्रमाणे भ्रष्टाचार आणि चोरी हा आमच्याकडे विषयच नाही. पक्षाच्या माध्यमातून समाजहिताची कामे होत आहे. त्यामुळे आज पक्ष पुढे चालला आहे.
दरम्यान राष्ट्रीय समाज पक्षाला जनाधार वाढत असून सर्व जातीधर्मांच्या कार्यकर्त्यांना मानाचे स्थान मिळवून देणारा पक्ष म्हणून राष्ट्रीय समाज पक्षाची आज ओळख आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला देशातील चार राज्यात मान्यता असल्याचे जानकर यांनी यावेळी सांगितले.
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रीय समाज लोकसभेची निवडणूक लढवणार असून येत्या निवडणुकांत पक्षाला निश्चित चांगले यश मिळणार असल्याचा विश्वास जानकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. राजश्री शाहू महाराजांनी मराठा व इतर समाजाला आरक्षण दिले मात्र गेल्या सत्तर वर्षात मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले, मंत्री झाले आमदार झाले.
साखर कारखान्यांची सत्ता ताब्यात होती. परंतु, ते मराठा समाजाला आरक्षण देऊ शकले नाहीत. आजही मराठा समाज बांधवांना आरक्षणासाठी उपोषण करावे लागते रँली काढावी लागते याबाबत जानकर यांनी आपल्या भाषणातून खंत व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे जेष्ठ नेते रामकृष्ण बिडगर, तालुकाध्यक्ष शिवाजी कु-हाडे, भरत गडधे, माऊली सलगर, अजित पाटील, विनायक रुपनवर, सुनील बंडगर, सुवर्णा जराड, सुनिता किरवे, चेतना पिंगळे, सागर कोळपे, संजय माने, ज्ञानेश्वर सलगर आणि रतन पाडुंळे यांची भाषणे झाली.
याप्रसंगी रासपाचे राष्ट्रीय महासचिव कुमार सुशिल पाल, प्रभाकर जांभळकर, भाऊसाहेब धायगुडे, तात्यासाहेब टेळे, रवींद्र मखर, आबासाहेब ठोंबरे, गोकुळ पिंगळे, सपना मलगुंडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्रा. गोरक्ष डुबे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.