Pune News : वनाज ते रामवाडी मार्गावर वनाज ते चांदणी चौक आणि रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) या नव्या विस्तारित एलिव्हेटेड मेट्रो मार्गांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सोमवारी मंजुरी देण्यात आली. आता केंद्र सरकारने परवानगी दिल्यावर या विस्तारित मेट्रो मार्गांवर काम सुरू होणार आहे.
वनाज-रामवाडी हा १६ किलोमीटरचा मेट्रो मार्ग आता कार्यान्वित झाला आहे. या मार्गावर रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी दरम्यानच्या मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सहा मार्च रोजी उद्घाटन झाले. आता या मार्गावर विस्तारित मेट्रो मार्गांना परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी तीन हजार ७५६ कोटी ५८ लाख रुपये खर्च होणार आहे.
राज्य सरकार, केंद्र सरकार आणि कर्ज, या माध्यमातून या निधीची उभारणी होणार आहे. राज्य सरकारने या प्रस्तावाला मंजुरी दिल्यामुळे आता केंद्र सरकारच्या पब्लिक इनव्हेस्टमेंट बोर्ड (पीआयबी) यांच्यापुढे या प्रकल्पाचे सादरीकरण होईल. तेथे मंजुरी मिळाल्यावर हा प्रकल्प रेल्वे खात्यामार्फत केंद्र सरकराच्या मंत्रिमंडळापुढे अंतिम मंजुरीसाठी पोचेल. त्यानंतर मंजुरी मिळाल्यावर प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होईल. महामेट्रोने विस्तारित मार्गांसाठी प्रकल्प अहवाल तयार करून महापालिकेमार्फत राज्य सरकारकडे सादर केले होते.
वनाज ते चांदणी चौक ः अंतर १.१२ किलोमीटर - स्थानके १) कोथरूड बस आगार २) चांदणी चौक
रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) ः अंतर ११.६३ - किलोमीटर - स्थानके - १) विमाननगर २) सोमनाथनगर ३) खराडी बायपास ४) तुळजाभवानी स्थानक ५) उबाळे नगर ६) अप्पर खराडी रोड ७) वाघेश्वर मंदिर ८) वाघोली ९) सिद्धार्थ नगर १०) बकोरी फाटा ११) विठ्ठलवाडी
विस्तारित दोन्ही मार्गांची एकत्रित लांबी ः १२.७५ किलोमीटर १३ स्थानके असतील.
दोन्ही मार्गांवर एलिव्हेटेड मेट्रोचा एकत्रित खर्च ३ हजार ७५६ कोटी ५८ लाख रुपये
पुणे शहराचा औद्योगिक विकास आणि विस्तारही वेगाने होत आहे. वाढत्या लोकसंख्येला पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतूक सुविधा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नव्या विस्तारित मेट्रो मार्गांमुळे उपनगर शहराशी जोडले जाईल.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री
वनाज ते रामवाडी मार्गासाठी हा नैसर्गिक विस्तार आहे. रामवाडी ते वाघोली पट्ट्यालगत असलेल्या आयटी कंपन्या, वित्तीय संस्था, शाळा आणि महाविद्यालयांसाठी हा मार्ग उपयुक्त असेल. त्यामुळे नगर रस्त्यावरील वाहतुकीचा ताण कमी होईल. वनाज ते चांदणी चौक हा विस्तारही महत्त्वाचा आहे.
- श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.