पुणे : दोडा जिल्ह्यात 1999मध्ये दहशतवाद्यांनी एका रात्रीत जो रक्तपात घडवून आणला, तो अशा स्वरूपाचा देशातील आतापर्यंतचा सर्वांत मोठा रक्तपात ठरला; दहशतवाद्यांनी एकाच कुटुंबातील 15 जणांना गोळ्या घालून ठार केले. एकाच कुटुंबातील एवढे लोक मारले जाण्याची ही पहिलीच घटना होती. या घटनेचा साक्षीदार असलेला जोगिंदरसिंग पुण्यात राहतो. तो कुटुंबातील सर्वांत लहान सदस्य होता.
आजोबा, आजी, आई- वडील, भाऊ आदींसह पंधरा कुटुंबीय रक्ताच्या थारोळ्यात पडलेले त्याने पाहिले. या घटनेमुळे जोगिंदरच्या मनाला तीव्र वेदना होतात; परंतु या वेदनांवर उपाय म्हणून आपणही शस्त्र हाती घ्यावे, असे त्याला कधीही वाटले नाही. शांतता, शिक्षण हेच व्यवस्थेत मूलभूत बदल करू शकतात, अशी त्याची विचारसरणी आहे आणि त्याच मार्गावर तो चालत आहे.
जोगिंदरसिंग ऊर्फ जोगीला जेव्हा त्या घटनेची तीव्रतेने आठवण होते, तेव्हा तो बंद खोलीत ओक्साबोक्सी रडतो; पण सर्वांसमोर आल्यास हसतमुख असतो. तो चार-साडेचार वर्षांचा असतानाची घटना. लेहोटा हे सीमेलगत असलेले त्याचे गाव. 19 जुलै 1999च्या रात्री दशहतवाद्यांच्या मोठ्या गटाने अत्याधुनिक शस्त्रांसह गावावर हल्ला केला. नऊच्या सुमारास जोगीच्या घरावर गोळ्यांचा वर्षाव सुरू झाला. त्याचे कुटुंबीय ग्राम सुरक्षा दलाचे सदस्य असल्याने त्यांच्याकडे बंदुका होत्या. त्यांनी अतिरेक्यांचा प्रतिकार सुरू केला.
दहशतवादी जवळ आल्याचा अंदाज येताच छोट्या जोगीला त्याच्या बहिणीने मागच्या बाजूला फेकून दिले, त्यामुळेच तो बचावला. गोळ्यांच्या आवाजामुळे तो प्रचंड घाबरला होता. जोगीचे आजोबा, वडील, त्यांचे भाऊ आदींनी तब्बल पंधरा तास दहशतवाद्यांचा मुकाबला केला आणि तिघांना ठार केले; परंतु दहशतवाद्यांच्या शस्त्रांसमोर त्यांच्या बंदुका फार काळ टिकाव धरू शकल्या नाहीत. जोगीच्या कुटुंबातील 15 जणांनी स्वतःचे बलिदान दिले. अन्य पाच जण गंभीर जखमी झाले. जोगी, त्याची बहीण असे चौघे मागे पळाल्यामुळे बचावले.
या भीषण हल्ल्याची देशभर चर्चा झाली. तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी जोगीच्या कुटुंबातील बचावलेल्या सदस्यांची भेटही घेतली. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने त्यांना संपूर्ण मदत करण्याचे जाहीर केले. कुटुंबातील प्रत्येकाचे पुनर्वसन करण्याचे जाहीर केले. छोट्या जोगीला जम्मूच्या एसओएस ------------बालग्रामम या शाळेमध्ये घालण्यात आले. दहावीपर्यंत तो तिथे शिकला; परंतु त्यापुढे तेथे राहण्याची व्यवस्थाच नव्हती. त्यामुळे तो चिंतातूर होता. तत्कालीन केंद्रीय आरोग्यमंत्री गुलामनबी आझाद हे शाळेच्या कार्यक्रमासाठी 2012 मध्ये तेथे आले होते.
सुरक्षारक्षकांचे कडे तोडून किशोरवयीन जोगी आझाद यांच्यापर्यंत पोचला आणि अडचण मांडली. सरकारी कामाची गती कदाचित त्यांनाही माहीत असावी, म्हणून त्यावर न विसंबता त्यांनी पुण्याच्या सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांच्याशी संपर्क साधून जोगीच्या पुढच्या शिक्षणाची व्यवस्था करण्याची विनंती केली आणि इयत्ता अकरावीसाठी जोगी पुण्यात आला. जोगीला कुटुंबाची उणीव भासू नये म्हणून नहार यांनी त्याला वसतिगृहाऐवजी स्वत:च्याच घरी ठेवले. आता तो पदवीधर झाला आहे.
तेव्हाच्या घटना आठवल्यास आजही तो रडतो; पण त्यात हरवून जात नाही. त्याला सारा घटनाक्रम कसा आठवतो, असा प्रश्न पडू शकतो. मात्र, तो दोडा येथे दहावी उत्तीर्ण होईपर्यंत वारंवार त्या घटनेचा उल्लेख व्हायचा, चर्चा झडायची. नेते, अधिकारी भेटायचे. आता तो भविष्याकडे मोठ्या आशेने पाहतो. "हिंसेचा बदला हिंसेने' हे त्याला अजिबात मान्य नाही. सरकारने अनेक आश्वासने दिली होती; परंतु सर्व पाळण्यात आली नाहीत. तुटपुंजी मदत मिळाली. तिघांना शासकीय सेवेत घेण्यात आले; पण माझ्याकडे पाहणारे कोणीही नाही. मी अनाथ झालो. अनाथ मुलाला अनेक संकटांचा सामना करावा लागतो.
इतरांच्या वाट्याला तो येऊ नये म्हणून मला संघर्ष करायचा आहे. त्यासाठी अविरत प्रयत्न करायचे आहेत. स्वातंत्र्य दिनासारख्या राष्ट्रीय सणांना आम्हाला सन्मान मिळतो, इतर वेळी कोणी विचारत नाही म्हणून राग मानून कसे चालले? प्रत्येकाच्या काही अडचणी आहेत. जगात सर्वसुखी कोणीही नसतो. म्हणून बंदूक हाती घ्यायची नसते. पुण्याने मला नवी ओळख दिली आहे. या संधीचे मी सोने करण्यासाठी झटेन, असे विचार आहेत जोगीचे!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.