पुणे

न थकता काम करणाऱ्या दिव्यांगांची फॅक्‍टरी

नंदकुमार सुतार

पुणे  - मशिन सकाळी नऊ वाजता सुरू होते. त्यावर काम करणारे लोक मोठ्या चपळाईने आणि कुशलतेने कामाला लागतात. त्यात ते एवढे तल्लीन होतात जणू वारकरी कीर्तनात, कलावंत रंगमंचावर, योद्धा समरांगणात असावा तसे. तहान-भूक विसरून. एकच लक्ष, आजचे लक्ष्य गाठण्याचे. ही आहे अपंगांची फॅक्‍टरी, पुण्याच्या शिवाजीनगर भागातील. वेगवेगळ्या प्रकारचे शारीरिक वैगुण्य असलेल्या सोळा दिव्यांग व्यक्ती तेथे काम करत आहेत.

साधारणपणे नोकरीत कामावर असताना मध्येच ‘टी ब्रेक’, ‘लंच ब्रेक’ वगैरे अल्प विश्रांतीचे थांबे अनुभवायला मिळतात; पण या फॅक्‍टरीतील दिव्यांग कष्टकऱ्यांना हे शब्द माहितीच नाहीत. ते खूप तन्मयतेने काम करतात, एवढे की त्यांना मध्येच थांबायला सांगावे लागते. वेळ संपली तरी त्यांचे काम सुरूच असते. आता तुमची ‘ड्यूटी’ संपली, असे त्यांच्या लक्षात आणून द्यावे लागते. कुणी निदर्शनास आणले नाही, तर त्यांचे काम अविरत सुरूच राहते, न थकता... विश्रांतीविना !

साखर संकुलापुढे वाकडेवाडीला जाण्यासाठी भुयारी रस्ता आहे. या भुयारी रस्त्याने जाण्याऐवजी उजव्या हाताने पुलावरून डावीकडे वळले की दोन मिनिटांनी उजव्या हाताला मोठे गोदाम लागते. त्यावर महापालिकेची ४७ क्रमांकाची शाळा आहे. तेथे विद्यादान चालते, तर खाली दिव्यांगांचे श्रमदान. ‘ईडार्च’ (दिव्यांग व्यक्तींसाठी उद्यमशीलता विकास आणि पुनर्वसन केंद्र) संस्था ही आगळीवेगळी फॅक्‍टरी चालवते. सुमारे २० वर्षांपूर्वी ‘ईडार्च’ची स्थापना झाली. आपल्या क्षमतेमध्ये दिव्यांग व्यक्तींच्या पुनर्वसनाचा विडा तिने उचलला आणि बऱ्याच प्रयत्नांनंतर ही जागा मिळाली. या फॅक्‍टरीत पाच प्लॅस्टिक इंजेक्‍शन मोल्डिंग मशिन आहेत. त्यात हाताने चालवायच्या दोन, दोन सेमिऑटोमेटिक आणि एक ऑटोमेटिक मशिन आहे, तर दोन पेपर श्रेडिंग मशिन आहेत. 

‘ईडार्च’च्या या फॅक्‍टरीत तीन अंध, बौद्धिक विकास न झालेले पाच, कर्णदोष असलेले तीन आणि विविध प्रकारचे अस्थिव्यंग असलेले, शिवाय बौद्धिक विकास न झालेले पाच कामगार आहेत. हे सर्व जण १८ ते ३५ वयोगटातील आहेत. दिव्यांग असले, तरी त्यांच्याकडे प्रचंड उत्साह आणि अथक श्रम करण्याची वृत्ती आहे. एक अपवाद वगळता सर्व जण अल्पशिक्षित आहेत. 

कसे-बसे प्राथमिक शिक्षण झालेले. अजित कुंटे हा काम करत करत पदवीचे शिक्षण घेत आहे. लहानपणीच त्याला अर्धांगवायू विकाराने घेरले. दोन्ही पाय निकामी झाले. तो स्वत:हून उभा राहू शकत नाही; परंतु त्याचे कामाचे कौशल्य अचंबित करणारे आहे. तो कथाकथनही करतो. त्यासाठी त्याला पुरस्कारही मिळाले आहेत. 

फॅक्‍टरीला भेट दिली तेव्हा सर्व कामगार कामात गढून गेल्याचे दिसले. पेपर श्रेडिंग मशिनवर चौघे जण काम करत होते. त्यांचे कौशल्य आणि सफाईदारपणा असा होता, की ते दिव्यांग आहेत, असे आवर्जून सांगितल्यावरच समजले. मशिनमध्ये पेपर टाकणारा कामगार अंध होता, तर कापलेल्या पेपरवर काम करणारा बौद्धिक दिव्यांग आणि अस्थिव्यंग असलेला होता. या दिव्यांग व्यक्तींकडे वेगवेगळ्या क्षमता आहेत. त्या एकत्र आणल्या की मोठी सांघिक क्षमता तयार होते आणि चांगले काम उभे राहते. त्याचा उत्तम वापर ‘ईडार्च’ संस्थेने करून घेतला आहे. हे सारे कामगार या सर्व मशिनवर त्यांच्या-त्यांच्या क्षमतेत काम करू शकतात. संस्थेचे दिलीप देशपांडे आणि उदय कुलकर्णी यांनी सांगितले, की आधी आम्ही त्यांना साध्या मशिनवर प्रशिक्षण देतो. नंतर सेमिऑटोमेटिक आणि ऑटोमेटिक मशिनवर. टप्प्याटप्प्याने त्यांच्यातील क्षमता वाढत जातात आणि विशेष म्हणजे ही मंडळी कधीच थकत नाहीत. त्यांना चहाचीदेखील आठवण येत नाही, केवळ काम आणि कामच.

आम्हाला हवी रद्दी
संस्थेची स्थापना झाल्यानंतर अनेक अडचणींचा सामना करावा लागला. आम्हाला चांगली जागा मिळत नव्हती. पाच-सहा ठिकाणी काम करून पाहिले. मोठ्या प्रयत्नांनंतर आजची जागा मिळाली आणि दिव्यांगांना रोजगार देऊ शकलो. आमच्या संस्थेमध्ये दोन प्रकारची कामे करणाऱ्या सात मशिन असल्या तरी आमची मदार पेपर श्रेडिंग मशिनवरच अधिक आहे. कारण, पॅकेजिंगसाठी पेपर श्रेडिंगला चांगली मागणी आहे. या कामगारांचे पोट बहुतांशकरून यावरच अवलंबून आहे; पण विकतची रद्दी आम्हाला परवडत नाही. त्यात आम्हाला सरकारी अनुदान मिळत नाही, की अन्य कोणत्या स्वरूपाची मदत. शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये आदी ठिकाणी मुबलक रद्दी असते. आमची पैशांची अपेक्षा नाही. ही रद्दी मिळाली तर आमची ही फॅक्‍टरी चांगली चालू शकेल. आम्ही रद्दी जिथे आहे तिथे जाऊन घेऊ, त्यासाठी या संस्थांनी मदत करावी, असे आवाहन ‘ईडार्च’चे संस्थापक, अध्यक्ष दिलीप देशपांडे यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: अनिल देशमुखांवर हल्ला कसा झाला, नेमकं काय घडलं? हल्लेखोर देत होते भाजप जिंदाबादच्या घोषणा? मोठा रिपोर्ट समोर

थंडीत उर्जा रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी आहारात काय असावे? ‘हे’ ७ पदार्थ आहारात ठेवा, होतील फायदेच फायदे

Marathwada: जातीयवाद , प्रांतवाद सोडून द्या अन हिंदूत्वासाठी एकत्र या; कालीचरण महाराजांचे आवाहन...

Mumbai Election: मुंबईत मतदारांची संख्या किती? आकडा वाचुन तुम्हालाही बसेल धक्का

...तर ॲडमिनवरही दाखल होईल गुन्हा! सोशल मिडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या ९९ जणांवर कारवाई; सायबर पोलिसांनी हटविल्या ३० पोस्ट; १८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

SCROLL FOR NEXT