मार्केट : मार्केट यार्डात (market yard) दररोज २५-३० हजार लोकांची ये-जा असते. इतकी मोठी वर्दळ असूनही त्याप्रमाणे सुविधा उपलब्ध नाहीत. उलट गूळ-भुसार, फळे-भाजीपाला, पान बाजार समस्यांच्या विळख्यात अडकला आहे. कचरा, दुर्गंधी, खड्डे, धूळ, अतिक्रमण, वाहतूकोंडीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. याकडे लक्ष देण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला वेळ मिळत नसल्याने ग्राहक, व्यापारी मात्र त्रासून गेले आहेत.
अस्ताव्यस्त पार्किंगमुळे कोंडी
शिवनेरी रस्त्यावर अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली आहेत. याच रस्त्यावर बाजारात येणारे खरेदीदार जागा मिळेल तिथे गाडी उभा करतात. त्यामुळे कायम वाहतूक कोंडी असते. बाजारातील सर्व वाहनतळ वाहने लावण्यासाठी अपुरे पडत आहेत. त्यामुळे येणाऱ्या वाहनांसाठी नवीन वाहनतळ उभे करण्याची गरज असल्याची भावना व्यापारी व्यक्त करत आहेत.
कचरा, डुकरांमुळे दुर्गंधी
मार्केट यार्डात ठिकठिकाणी कचरा पडलेला पाहावयास मिळत आहे.त्या कचऱ्यात सातत्याने डुकरे आणि जनावरे वावरत असतात. यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरत आहे. येणाऱ्या जाणाऱ्या ग्राहक, व्यापाऱ्यांना याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे. तसेच अनेक ठिकाणी ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर वाहत आहे.
दोन कोटींचे स्वच्छतागृह बंद
दोन कोटींपेक्षा जास्त खर्च करून समितीने ११ स्वच्छतागृहांची उभारणी केली आहे. मात्र यातील अनेक स्वच्छतागृह बंद आहेत. त्यामुळे खर्च करून ही स्वच्छतागृह फक्त दिखाव्यासाठीच बांधल्याची भावना बाजारातील व्यापारी, ग्राहक व्यक्त करत आहेत.
खड्डे आणि अर्धवट कामे
समितीने तब्बल साडेबारा ते चौदा कोटी रुपये खर्च करून बाजारात अनेक ठिकाणी नवीन रस्त्यांचे डांबरीकरण केले होते. परंतु या रस्त्यावर पुन्हा अनेक ठिकाणी मोठे मोठे खड्डे पडले आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट कामे झाली आहेत. त्यामुळे बाजार आवारात व्यापारी, कामगार, विक्रेते, खरेदीदारांना या खड्ड्यांचा आणि धुळीचा त्रास सोसावा लागत आहे.
कचरा उचलण्यासाठी ठेकेदार नेमले आहेत, तसेच ड्रेनेजच्या वाहणाऱ्या पाण्याच्या लाइनची लवकरात लवकर दुरुस्ती करून घेण्यात येईल.
- मधुकांत गरड, प्रशासक, बाजार समिती
मार्केट यार्ड हे शहरातील सगळ्यात वर्दळीचे ठिकाण आहे. इथे मोठ्या प्रमाणावर खाद्य-अन्नाचा व्यापार केला जातो. त्यामुळे बाजारात स्वच्छ्ता असणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने बाजार समितीने काळजी घेणे गरजेचे आहे.
- राजेंद्र बाठीया, व्यापारी, मार्केट यार्ड
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.