एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे हात जोडून, ‘परत असं वागणार नाही’, असं म्हणतो. त्यामुळे माझा खूप मानसिक कोंडमारा होतो.’’ स्नेहलने असं म्हटल्यावर फौजदारसाहेबांनाही तिचे म्हणणे पटले.
‘‘मला माझ्या नवऱ्याचा समीरचा प्रचंड वैताग आलाय. त्यामुळे माझा मानसिक कोंडमारा होत आहे. त्याला चांगली अद्दल घडवा,’’ डोळ्यांत पाणी आणून स्नेहलने आपली व्यथा फौजदारासमोर मांडली.
‘‘म्हणजे तो नक्की काय करतो, हे सांगाल का’’? फौजदाराने विचारले.
‘‘अहो, तो माझ्याशी कधी भांडतच नाही. जेवण अळणी बनवा, तिखट बनवा किंवा अगदीच बेचव बनवा. निमूटपणे खातो पण मला कधी याबद्दल जाब विचारत नाही. मी त्याला अनेकदा फरशी पुसायला, भांडी घासायला सांगते. हेतू हा की त्याने ‘नाही’ म्हणावे. त्यामुळे आमच्यात भांडण होईल पण मी काम सांगितले, की नंदीबैलासारखी मान हलवून कामाला सुरवात करतो. अशाने माझं कसं होईल’’? स्नेहलने सांगितले.
‘‘मला अनेकदा भांडणाची खुमखुमी येते. आवाज चढवून बोलावेसे वाटते. भांड्यांची आदळआपट करावीशी वाटते, सगळं घर डोक्यावर घेऊन, शेजारी- पाजाऱ्यांना जमा करून, त्याच्या छपन्न कुळांचा उद्धार करावसा वाटतो. पण मी काही बोलले, की हा सरळ ‘सॉरी’ म्हणून मोकळा होता. एखाद्या आज्ञाधारक मुलाप्रमाणे हात जोडून, ‘परत असं वागणार नाही’, असं म्हणतो. त्यामुळे माझा खूप मानसिक कोंडमारा होतो.’’ स्नेहलने असं म्हटल्यावर फौजदारसाहेबांनाही तिचे म्हणणे पटले.
‘‘सोसायटीतील अनेक बायकांची नवऱ्यांबरोबरची भांडणे पाहून, मला त्यांच्या भाग्याचा हेवा वाटतो. ‘सोफ्यावर ओला टॉवेल ठेवला’ म्हणून अनेक जोडप्यांमध्ये दोन- दोन तास भांडणे झाल्याची मी पाहिले आहेत. पण मी नवऱ्याचा ब्रॅंडेड आणि आवडता शर्ट इस्त्रीच्या नावाखाली जाळून टाकला. तरीही हा बाबा शांत ! ‘मी दुसरा घेईन,’ असे म्हणून या विषयावर पडदा टाकला. अनेकींचे नवरे दारू पिऊन भांडण करतात. बायकोला मारहाण करतात. म्हणून मी याच्यासाठी स्वतः दारू विकत आणली. पण हा ‘कडू आहे’, असे म्हणून पाणी ओतत राहिला. त्यामुळे पाणी पिऊन, त्याला भांडायचा जोर कसा येईल’’?
माझ्या माहेरच्यांचं तर त्याला विशेष कौतुक. माझे आई-वडील किंवा भाऊ कधी आले तर त्यांची प्रेमाने विचारपूस करतो. त्यांच्यासाठी महागडी कपडे आणतो. त्यांना हवं ते खाण्या-पिण्यासाठी आणतो. माहेरच्यांविषयी चुकूनही तो वाईट बोलत नाही. मग सांगा आमच्यात भांडण कसं होणार, स्नेहलने आपली कैफियत मांडली.
‘‘मी माझ्या नवऱ्यावर अनेकदा संशय घेतला. त्याचं नाव शेजारणीशी मुद्दाम जोडलं, हेतू हा की त्यानं चिडावं. पण रक्षाबंधनाच्या दिवशी त्याने शेजारणीकडून राखी बांधून घेतली. मी अनेकदा त्याच्याकडून पैसे घेऊन, त्याची मुद्दाम उधळपट्टी केली. कधीच हिशेब दिला नाही. पण परत पैसे मागितले, की लगेच द्यायला तयार. अनेकदा त्याने कर्ज काढूनही मला पैसे दिलेत. माझ्या सगळ्या हौस-मौज तो न सांगत पूर्ण करतो. मला तक्रार करण्यासाठी जागाच ठेवत नाही, असलं अळणी जीवन मला नकोसं झालंय. भांडणाचा झणझणीतपणा असल्याशिवाय जीवनाला काही अर्थ आहे का? तुम्ही त्याच्याविषयी लेखी तक्रार घ्या. त्याला चांगला खडसावा.’’ स्नेहलने असं सांगितल्यावर फौजदारांनी समीरला लगेच बोलावून घेतले. दहाच मिनिटांत समीर पोलिस ठाण्यात हजर झाला. फौजदारसाहेबांनी आवाज चढवत त्याला दमात घेतले व तक्रारीविषयी माहिती दिली.
‘‘सॉरी साहेब, माझं चुकलं. मी परत असं कधी वागणार नाही. उद्यापासून मी दररोज सकाळी नऊ ते सव्वानऊ अशी पंधरा मिनिटे स्नेहलशी भांडेल. तिच्या मनासारखा भांडल्यानंतरच थांबेल.’’ असे म्हणून त्याने हात जोडले. स्नेहलचीही त्याने माफी मागितली. मग त्याने खिशातील डायरी काढली. ‘रोज सकाळी नऊ ते सव्वानऊ स्नेहलशी भांडण’ असे त्यात त्याने लिहिले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.