सहकारनगर - उपनगरांत महापालिकांच्या दवाखान्यात गरीब रुग्णांना औषध मिळत नसल्याने नागरिकांची रुग्णांची फरफट होत आहे. दक्षिण पुणे भागातील सर्व दवाखान्यांत औषधांचा तुटवडा आहे. सातारा रस्ता येथील कै. शंकरराव पोटे, धनकवडी येथील स्व. विलासराव तांबे दवाखान्यात डॉक्टरांनी लिहून दिल्यापैकी दोन किंवा तीन गोळ्या मिळत आहेत. मनपाच्या सर्वच दवाखान्यात अशी स्थिती असून, रुग्णांना वेळेत औषध मिळावीत, अशी मागणी नागरिक करीत आहेत.
नागरिक म्हणतात...
साहेबराव खंडाळे (वय ७२, तळजाई वसाहत पद्मावती) - मनपाचा निवृत्तिसेवक असून, मला दम्याचा त्रास आहे. मनपाच्या कामगार साह्य निधीतून शुल्क कपात केले जाते, परंतु वेळेवर औषध मिळत नाहीत. डॉक्टरांनी दोनशे रुपयांसाठी दम्यावरील पंप लिहून दिला आहे. मात्र त्यासाठी चारशे रुपये घेतले आहेत.
माणिक फरांदे (वय ६७ रा. आंबेगाव पठार, धनकवडी) - मनपाचे शहरी गरीब योजना कार्ड चार वर्षांपासून वापरत आहे. मला मधुमेहाचा त्रास असून, साखर वाढली आहे. डॉक्टरांनी दिलेल्या सात ते आठ औषधांपैकी दोन किंवा तीन औषध मिळत आहेत. याबाबत वारंवार चौकशी केली असता गाडीखाना दवाखान्यातून औषधपुरवठा वेळेवर होत नसल्याने औषधांचा तुटवडा आहे.
ऑनलाइन प्रक्रिया राबवावी - विशाल तांबे
नगरसेवक विशाल तांबे म्हणाले, ‘‘शहरातील पालिकेच्या दवाखान्यांची विश्वासार्हता वाढली असून, रुग्णांची संख्या वाढत आहे. नियोजनाअभावी आरोग्य विभागाकडून औषध मिळत नसल्याने नागरिकांना अडचणी येत आहेत. रुग्णांना औषध मिळण्यासाठी ऑनलाइन प्रक्रिया राबवावी. जेणे करून डॉक्टरांनी लिहून दिलेल्या चिट्टीपैकी रुग्णांना किती औषधे मिळाली आणि ठेकेदारांनी पाठवलेली औषधे यांचा ताळमेळ घालता येईल.’’
खासगी डॉक्टरांनी रुग्णांना लिहून दिलेली चिट्टी संबंधित दवाखान्यात दिली जाते. त्यानुसार औषधांची यादी गाडीखाना दवाखान्यात पाठवली जाते. त्यानंतर नावाप्रमाणे औषधांची यादी बनून दवाखान्यात पाठवली जाते. नंतर रुग्णांना औषधपुरवठा केला जातो. या प्रक्रियेला दोन दिवस जातात. रुग्णांना लिहून दिलेल्या औषधांपैकी बदलून दिलेली औषधे रुग्ण घेत नाहीत. तीच औषधे उपलब्ध नसतील तर खरेदी करून दिली जातात.
- रामचंद्र हंकारे, आरोग्य प्रमुख, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.