First Woman Fire Fighter : आजकाल प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत. पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहेत. उच्च शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभ्या राहत आहेत. असे कोणतेही क्षेत्र नाही की, ज्यात महिला कार्यरत नाहीत. आता अग्निशमन दलात देखील महिलांची आघाडी पहायला मिळत आहे.
नुकतीच पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलामध्ये अग्निशमन विमोचक (फायरमन) या पदासाठी प्रथमच महिला उमेदवाराची निवड करण्यात आली आहे. या महिला उमेदवाराचे नाव मेघना सपकाळ असे आहे. पुणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दलामध्ये पहिल्यांदाच एका महिलेची निवड करण्यात आली असून, हा मोठा अभिमानाचा क्षण आहे.
विशेष म्हणजे, मेघनाचे आजोबा सदाशिव बापूराव सपकाळ हे अग्निशमन दलात कार्यरत होते. ते सेवानिवृत्त झाले आहेत तर मेघनाचे वडील महेंद्र सपकाळ हे देखील अग्निशमन दलात कार्यरत आहेत. कुटुंबातील ही अग्निशमन दलातील सेवेची परंपरा मेघनाने ही आता जपली आहे.
२६ वर्षीय मेघनाने पुण्यातील गरवारे कॉलेजमधून कॉमर्समध्ये पदवी मिळवली आहे. त्यानंतर, तिने अग्निशमन अभ्यासक्रम देखील पूर्ण केला. मागील काही दिवसांपूर्वी पुणे महानगरपालिकेकडून अग्निशमन दलात १६७ जागांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर, मेघनाने या भरतीसाठी अर्ज केला होता. तिने परीक्षा आणि पात्रतेचे निकष देखील पूर्ण केले.
या भरती प्रक्रियेमध्ये एकूण १६७ उमेदवारांची निवड करण्यात आली असून, त्यामध्ये मेघना ही पुणे अग्निशमन दलात निवड झालेली पहिली महिला उमेदवार ठरली आहे.
यासंदर्भात ‘द इंडियन एक्सप्रेस’ सोबत मेघनाने बातचीत केली आहे. या निवडीबद्दल आनंद व्यक्त करताना ती म्हणाली की, ‘मुंबईमध्ये अग्निशमनाचे प्राथमिक प्रशिक्षणाचे ३ महिने पार पडले. या काळात फिजिकल फिटनेसवर मेहनत करताना मी रोज अश्रू ढाळले. मी खरच या भरतीसाठी फिट आहे की नाही याबद्दल मला तेव्हा शंका वाटायची.
मी शारिरीक व्यायामावर बरीच मेहनत घेतली. या खडतर काळात मला माझ्या कुटुंबियांनी मोलाची साथ दिली, मला पाठिंबा दिला. त्या बळावरच आज मी इथे आहे’ अशा शब्दांमध्ये मेघनाने तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. आता मेघना लवकरच पुणे अग्निशमन दलात पहिली महिला अग्निशामक म्हणून रूजू होऊन इतिहास रचणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.