लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेला खीळ बसली. उद्योग क्षेत्रासमोर कुशल कामगार, अकुशल कामगारांची उपलब्धता, मंदीसदृश परिस्थिती, त्याअनुषंगाने आवश्यक असणारे धोरणात्मक बदल अशी अनेक आव्हाने आहेत. त्यावर भाष्य करण्यासाठी मी कुणी उद्योजक नाही; परंतु सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रतिनिधी म्हणून उद्योजकता या मानसिकतेवर आणि लोकप्रतिनिधी म्हणून कोरोनाच्या संकटपश्चात उद्योगसंधींवर भाष्य करणे मला अधिक उचित वाटते.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
मानसिकता बदलण्याची गरज
सर्वसामान्य मराठी मध्यमवर्गीय कुटुंबाचा विचार केल्यास उद्योगासाठी पोषक वातावरणापेक्षा उद्योजकतेची विचारसरणी पूर्णपणे विकसित झालेली नाही, ही वस्तुस्थिती आहे. कदाचित, याची प्रमुख कारणे त्या क्षेत्रातील अनिश्चितता आणि आवश्यक आर्थिक पाठबळ, ही असू शकतील. आजही मध्यमवर्गीय कुटुंबात आर्थिक सुरक्षिततेला आणि त्या दृष्टीने सुरक्षित करिअरला प्राधान्य दिले जाते. परिणामी, अगदी उच्चशिक्षित मध्यमवर्गीय तरुणाचा कलही उद्योग-व्यवसायापेक्षा सरकारी किंवा खासगी क्षेत्रातील नोकरीकडे अधिक असतो. मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे येऊन यशस्वी उद्योजक झाल्याची काही उदाहरणे आहेत, उद्योजकतेसाठी पूरक काही धोरणे-योजना आहेत; परंतु अजूनही या मानसिकतेत आमूलाग्र बदल झालेला दिसत नाही. एकूण सरकारी नोकऱ्यांची उपलब्धता आणि खासगी नोकऱ्यांमधील अनिश्चितता लक्षात घेतल्यास उद्योजकतेबाबत ‘हे आपल्याला जमणार नाही,’ यापेक्षा ‘हे आपल्याला का जमणार नाही,’ हा विचार करणे गरजेचे आहे.
समाजाच्या प्रश्नांना उत्तर शोधा
‘गरज ही शोधाची जननी आहे,’ असे म्हणतात. समाजाला भेडसावणारी समस्या, ती समस्या सोडवण्याची गरज, त्या गरजेतून निर्माण होणारी कल्पक उपाययोजना आणि त्या उपाययोजनेची अंमलबजावणी ही उद्योजकतेची सुरुवात आहे. उदाहरणार्थ, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कमी अवधीत जाणे ही गरज होती, आधी सायकल मग मोटार ही कल्पक उपाययोजना होती आणि त्या उपयाच्या अंमलबजावणीतून उभी राहिली ती ऑटोमोबाईल इंडस्ट्री! त्यामुळे समाजातील समस्या व त्यानुसार निर्माण झालेल्या गरजा आणि त्यावरील कल्पक उपाय यांवर उद्योजकतेच्या दृष्टीने विचार केला पाहिजे. अर्थातच, त्या अंमलबजावणीतील निरंतर संशोधन आणि त्यानुसार बदल तुम्हाला स्पर्धेत टिकवून ठेवतात. बाजारातील मागणी, त्या मागणीनुसार पुरवठा आणि तो पुरवठा करताना आपले खास वैशिष्ट्य आणि विश्वासार्हता या बाबीदेखील महत्त्वाच्या ठरतात. गरज जेवढी मोठी तेवढी संधीची व्याप्ती मोठी, हे साधे सूत्र आहे.
मार्केट आणि लोकभावनेची जाण
कोणताही व्यवसाय करताना मार्केटची गरज आणि लोकभावना यांचा वस्तुनिष्ठ अंदाज महत्त्वाचा आहे. या दोन बाबतीत अल्पावधीत हजारो कोटींचा पल्ला गाठणाऱ्या ‘पतंजली’चे उदाहरण समोर आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ या घोषणेनंतर लोकभावनेत होणारा बदल अनेक स्वदेशी कल्पनांच्या पथ्यावर पडू शकेल. कोविडच्या पार्श्वभूमीवर चीनविषयी तयार झालेली सुप्त लोकभावनाही उद्योजकतेच्या दृष्टिकोनातून तपासणे गरजेचे आहे. केवळ चीनमधून कंपन्या भारतात येतील, या आशेवर बसणे ‘बिरबलाची खिचडी’ ठरेल. त्यापेक्षा चिनी व इतर परदेशी वस्तूंना स्थानिक आणि जागतिक बाजारपेठेत सक्षम भारतीय पर्याय उभे करणे हे देशपातळीवरील धोरण असले पाहिजे.
केवळ मोठ्या प्रमाणात निर्मिती नाही, तर संशोधन क्षमता हे चीनचे बलस्थान ध्यानात घेऊन संशोधन आणि विकासासाठी पायाभूत सुविधांवर भर द्यावा लागेल. धोरणात्मक बाबींवर विचार करताना सहकारी तत्त्वावर उद्योगक्षेत्राची उभारणी करता येईल का, याचीदेखील चाचपणी होण्यास हरकत नसावी. ‘एकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ,’ हे सहकाराचे तत्त्व उद्योजकतेच्या कसोटीवर पारखून वाटचाल केली, तर एक वेगळी दिशा मिळू शकेल, असा मला विश्वास आहे.
संकट आणि आव्हान असते तिथे संधीही असतेच. कोरोनाने दोन पावले मागे नेले आहे; पण दोन पावले मागे जाऊन झेप घ्यायची आपली परंपरा आहे. एकूणच उद्योजकतेचे आभाळ विस्तारलेय, गरज आहे ती हे आभाळ कवेत घेण्याची!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.