पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे २०२५ पासून राज्यसेवा परीक्षा लेखी स्वरूपातच घेतली जाणार आहे. त्यात कोणतेही दुमत नाही. एकविसाव्या शतकाकडे जाताना हा पर्याय स्वीकारणे गरजेचे आहे. तसेच संगणकीय क्षेत्रात वाढ होत असून या पुढील काळात मुख्य परीक्षा सोडून सर्व परीक्षा ऑनलाइन स्वरूपात घेण्याचा आयोगाचा मानस असून ती प्रक्रिया लवकरच होईल, असे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांनी रविवारी पुण्यात स्पष्ट केले.
अर्हम फाउंडेशन आणि वास्तव कट्टा यांच्यातर्फे आयोजित ‘संवाद टॉपर्स मार्गदर्शन : राज्यसेवा परीक्षेला सामोरे जाताना...’ या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी अर्हम फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शैलेश पगारिया, वास्तव कट्टयाचे किरण निंभोरे, महेश बडे उपस्थित होते. या कार्यक्रमात राज्यसेवा परीक्षेत मुलींमधून प्रथम आलेल्या पूजा वंजारी, ओबीसी प्रवर्गातून द्वितीय आलेल्या सोनल सूर्यवंशी, नववी रँक मिळवणारा वैभव पडवळ आणि २८वी रँक मिळवणारा विशाल नवले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ‘अभ्यासाचे योग्य नियोजन करून नोट्स काढा. ही शेवटची परीक्षा आहे असेच समजून प्रयत्न करा,’ असे विशाल नवले यांनी सांगितले.
शैलेश पगारिया यांनी प्रास्ताविक केले. महेश बडे यांनी कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. अश्विनी टव्हारे यांनी सूत्रसंचालन केले, तर राहुल शिंदे यांनी आभार मानले. आपण स्पर्धेत उतरलेले अश्व आहोत. मनात आणले तरच आपण जिंकू शकतो. उजळणी हाच यशाचा मार्ग असून त्यात सातत्य ठेवा. अभ्यासाचा वेळ वाया जाऊ देऊ नका.
-सोनल सूर्यवंशी, ओबीसी प्रवर्गातील द्वितीय विद्यार्थिनी
इच्छाशक्ती आहे म्हणून तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी येथे आला आहात. ९० टक्के अभ्यास हा आपल्यालाच करावा लागतो. मार्गदर्शनाचा केवळ १० टक्के फायदा होतो. परीक्षेला जाताना सकारात्मक राहिले पाहिजे.
- पूजा वंजारी, राज्यसेवा परीक्षेत मुलींमधील प्रथम विद्यार्थिनी
अभ्यास करताना प्रश्नपत्रिका सोडविणे गरजेचे आहे. संकल्पना समजून घेऊन अभ्यास करावा.
- वैभव पडवळ,
नववी रँक मिळविणारा विद्यार्थी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.