पुणे - पुरस्थितीच्या दुसऱ्या दिवशी पाणी ओसरलेल्या ठिकाणी महापालिका प्रशासन पोचले. पुरबाधित नागरिकांना नाश्ता, जेवण देणे, रस्ते स्वच्छता, चिखल, गाळ काढणे, औषध फवारणी करण्यापासून ते नुकसान झालेल्या ठिकाणांचे पंचनामे करण्यापर्यंतची विविध कामे महापालिका प्रशासनाकडून करण्यात आली. महापालिकेच्या विविध विभागांच्या माध्यमातून ही कामे करण्यात येत होती. महापालिकेला अनेक स्वयंसेवी संस्था, मंडळांनी सहकार्याचा हात दिला.
पुरस्थितीनंतर महापालिका प्रशासनावर पुरबाधित नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. विशेषतः लोकप्रतिनिधींनीही प्रशासनाला धारेवर धरले होते. त्यानंतर लोकांच्या प्रशासन लोकांच्या मदतीसाठी पोचले होते. दरम्यान, गुरुवारी पाणी ओसरण्यास सुरवात झाल्यापासून सलग दुसऱ्या दिवशी महापालिका प्रशासनाकडून शहराच्या वेगवेगळ्या भागातील पुरबाधित क्षेत्रामध्ये विविध प्रकारची कामे करण्यात येत होती.
महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, पाणी पुरवठा विभाग, पथ विभागांसह सर्व क्षेत्रीय कार्यालयांकडील अधिकारी, कर्मचारी शुक्रवारी सकाळपासूनच ठिकठिकाणी कामात व्यस्त होते.
एकता नगर, आदर्शनगर, विठ्ठलवाडी, पुलाची वाडी, पाटील इस्टेट, बोपोडी, येरवडा, औंध, मातोश्री रमाबाई आंबेडकर रस्ता (ताडीवाला रोड) या भागामध्ये महापालिकेकडून मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, बाजारपेठ, सार्वजनिक ठिकाणांवरील चिखल, गाळ काढण्यात आला.
दुर्गंधीयुक्त व खराब पाण्यामुळे रोगराई पसरू नये, यासाठी औषध फवारणी करण्यात आली. ठिकठिकाणी साठलेला कचरा, गाळ तत्काळ उचलण्यास प्राधान्य देण्यात आले. अनेक ठिकाणी ड्रेनेजमधून पाणी रस्त्यावर येण्याच्या घटना घडल्या होत्या, त्या ठिकाणी जेंटिंग मशिनद्वारे रस्त्यावरील पाणी कमी करण्यात आले.
स्वच्छता करण्यामध्ये कमतरता राहू नये, यासाठी महापालिका प्रशासनाकडून तीन वेगवेगळ्या शिफ्टमध्ये अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून काम सुरू होते. विशेषतः पुरस्थितीनंतर तत्काळ उपाययोजना करताना कुठलाही अडथळा येऊ नये, यासाठी महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून या सर्व कामांवर बारकाईने लक्ष दिले जात होते.
स्वयंसेवी संस्थांचा मदतीचा हात
अनेक स्वयंसेवी संस्था, गणेशोत्सव मंडळे, महाविद्यालये, सामाजिक संघटनांकडून महापालिकेला स्वच्छतेच्या कामासाठी सहकार्य करण्यात आले. अनेक विद्यार्थी, तरुण कार्यकर्ते या कामासाठी पुढे आले. रस्त्यावर साठलेला कचरा, पुलांवर वाहून आलेला कचरा, प्लॅस्टिक पिशव्या व अन्य प्रकारच्या वस्तु जमा करून कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्यात आले.
नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे सुरू
पुरबाधित नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरे, घरातील वस्तु, वाहनांसह विविध प्रकारच्या महत्त्वाच्या वस्तुंचे नुकसान झाले. दरम्यान, कोणत्या परिसरात किती नुकसान झाले आहे, याचा पंचनामा करण्याचे काम महापालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून शुक्रवारी दिवसभर करण्यात आले.
'पुरस्थितीनंतर महापालिका प्रशासन तत्काळ लोकांच्या मदतीसाठी पुढे आले. स्वच्छता, औषध फवारणी, रस्ते सफाई, पुरबाधितांना जेवण देण्यापासून विविध प्रकारच्या उपाययोजना महापालिकेने केल्या आहेत. आता महापालिकेकडून वेगवेगळ्या भागात पंचनामे सुरू आहेत.'
- गणेश सोनुने, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, महापालिका.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.