पुणे - कोरोनाचा लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथिल होत असला तरी, त्यामुळे जीवनशैलीत झालेल्या बदलांची नोंद घेऊन स्मार्ट सिटी मिशनने पुण्यासारख्या ‘स्मार्ट सिटी’साठी नव्या मार्गदर्शक सूचना (एसओपी) नुकत्याच पाठविल्या आहेत. त्यात इंटरनेट हा केंद्रबिंदू आहे. टेलिमेडिसीन, मोबाईल हेल्थ क्लिनिक, ऑनलाइन समुपदेशन, ऑनलाइन शिक्षणाबरोबरच सार्वजनिक वाहतुकीमध्येही अभिनव प्रयोग करता येईल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे. शहराच्या गरजेनुसार त्याची अंमलबजावणी करण्याचेही स्वातंत्र्य ‘स्मार्ट सिटीज’ला दिले आहे.
कोरोनामुळे दैनंदिन जीवनात झालेल्या बदलांची नोंद घेऊन केंद्र सरकारने ही ‘एसओपी’ तयार केली आहे. पुढील काळात पुन्हा अशी परिस्थिती उद्भवली तर प्रशासन आणि नागरिकांनी कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे, याबद्दलही काही कल्पना ‘एसओपी’मध्ये आहेत. कोरोनामुळे सार्वजनिक आरोग्य सेवेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. तसेच, असंघटित कष्टकरी वर्ग तंत्रज्ञानापासून दूर राहू नये, यासाठी स्थानिक प्रशासनाने उपाययोजना करण्यासाठी ही ‘एसओपी’ उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा ‘स्मार्ट सिटी मिशन’चे संचालक कुणाल कुमार यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.
पिण्याचे पाणी, कचरा व्यवस्थापन, सांडपाणी प्रक्रिया यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवून स्मार्ट सोल्युशन्सची निर्मिती करणे, यासाठी प्राधान्य देतानाच केंद्र सरकारने असंघटित कष्टकरी वर्ग, आर्थिक दुर्बल घटक वर्गातील लोकांच्या रोजगारासाठीही आधुनिक माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशल इंटलिजन्स) आणि डिजिटलायझेशनचा नागरी प्रशासनाला करण्यात आला आहे, असेही त्यांनी सांगितले.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
सर्वांच्या खिशाला परवडतील अशा पद्धतीने ऑनलाइन शिक्षण प्रणाली निर्माण करणे गरजेचे आहे. तसेच इंटरनेटचा वापर सर्वांसाठी होऊ शकेल, यासाठी ते तळागाळातील लोकांपर्यंत पोचवायचे आहे. त्यासाठीचे अभिनव मार्ग स्थानिक प्रशासनाने शोधावेत आणि त्यांच्या अंमलबजावणीचा निर्णय घ्यावा. या संपूर्ण प्रक्रियेत लोकसहभाग आवश्यक असून शहराच्या गरजेनुसार स्वयंसेवी संस्था आणि विविध घटकांनाही यामध्ये समाविष्ट करून घेण्यात यावे, असेही कुणाल कुमार यांनी स्पष्ट केले.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन मार्गदर्शक सूचना
टेलिमेडिसीनचा शहरभर प्रसार करणे.
मोबाईल हेल्थ क्लिनिक्सची निर्मिती करणे.
चालणे, धावणे या व्यायामप्रकारांना प्राधान्य देणे, सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणे.
सार्वजनिक वाहतुकीत स्पर्शविरहित तसेच डिजिटल तिकिटिंगला प्राधान्य देणे.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून साथीच्या रोगांना अटकाव शक्य.
अत्यावश्यक सेवा, सुविधा पुरविण्यासाठी आणि देखरेख करण्यासाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करणे.
नागरी सेवा पुरविण्यासाठी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करणे.
स्थलांतरित मजूर, कामगारांना रोजगार मिळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे.
ई-कॉमर्सला चालना देण्यासाठी नेटवर्क निर्माण करणे.
असंघटित कष्टकऱ्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी त्यांना तंत्रस्नेही बनविणे.
शहरभर इंटरनेटची सुविधा उपलब्ध करून देणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.