पुणे - पुराच्या पाण्यानं घरदार वाहून नेलं. मग सरकारी पंचनामे झाले अन् आधाराची अपेक्षा वाटली. शिधापत्रिका नसतानाही पुढचे चार महिने स्वस्त धान्य दुकानातून धान्य देण्याचं आश्वासन मिळालं; पण तेही कुणी पाळलं नाही. आम्ही कसे जगतोय हेही पाहायला आता कुणाकडे वेळ नाही...
ही कुण्या एका व्यक्तीची तक्रार, गाऱ्हाणे म्हणता येणार नाही, तर पूर आणि त्यानंतर जबाबदार यंत्रणांचा काणाडोळा झाल्याने ओढविलेल्या परिस्थितीतील वास्तव आहे.
पुण्यातील काही भागांना सप्टेंबरमध्ये पुराने वेढले होते. त्या पूरस्थितीला बुधवारी तीन महिने पूर्ण झाली. या काळात पूरग्रस्तांना किमान दिलासा मिळावा, यासाठी काही कार्यवाही झाली असावी, ही समजूत पूरग्रस्तांच्या भावना कानावर येताच खोटी ठरते. त्यातून पूरग्रस्तांच्या मनात निर्माण झालेल्या रोषातून महापौर मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त सौरभ रावही सुटले नाहीत. पूरस्थितीनंतर पाहणी, घोषणाबाजी, तुटपुंजी मदत यापलीकडे काहीच मिळाले नसल्याचे पूरग्रस्त सांगत आहेत. कागदपत्रे वाहून गेल्याने किमान स्वस्तातील धान्य देण्यात येईल, त्यासाठी शिधापत्रिकेची मागणी केली जाणार नाही, असे जिल्हा प्रशासनाने जाहीर केले. प्रत्यक्षात मात्र पहिल्या महिन्यांतच थोडेफार धान्य मिळाले. त्यानंतर दुकानदाराने नकार दिला, सहकारनगरमधील अंबिका सोनावणे सांगत होत्या.
आंबिल ओढा भागातील पूरग्रस्त बेघरच
या भागातील २६ कुटुंबांचे पुनर्वसन करण्यावर चार महिने चर्चा झाली. त्याचे प्रस्ताव अधिकाऱ्यांच्या दालनापासून, स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत फिरले. त्यानंतर या कुटुंबातील लोकांना साधे घरही मिळालेले नाही. त्यामुळे हे लोक शाळांमधील खोल्या आणि पडलेल्या घरात राहात आहेत.
काजत्रमध्ये सीमाभिंती पडलेल्याच
या भागातील सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने त्याभोवतीच्या सीमाभिंती पडल्या. त्या बांधून देण्याची मागणी रहिवासी आणि लोकप्रतिनिधींची आहे; परंतु पैसे नसल्याने ही कामे करता येणार नसल्याचे महापालिका सांगत आहे. दुसरीकडे नळजोड आणि काही किरकोळ कामांसाठी निविदा काढल्या; पण ही कामे अजूनही पूर्ण झालेली नाहीत.
पूरस्थितीला तीन महिने ओलांडून अजून आम्ही भाड्याच्या घरात राहत आहोत. नवरा बिगारी काम करीत असून, पंधरा हजार रुपये मदत मिळाली आहे. पुरात पडलेली भिंत गरीब परिस्थिती असल्याने बांधता येत नाही. पाच लहान मुले आहेत. अद्याप कुटुंबाचा संसार उघड्यावर आहे.
- आरती आरणे
नाल्याकडेला असलेल्या अरण्येश्वर येथील तावरे कॉलनी येथे अडीचशे घरे आहेत. यामधील प्रत्येकाला फक्त पाच हजार रुपये सरकारी मदत मिळाली आहे. काही नागरिक घर दुरुस्तीसाठी नातेवाइकांकडून मदत घेत आहेत. नागरिकांना आपला संसार पुन्हा उभा करण्यासाठी मदतीची गरज आहे.
- स्वप्नील नाईक , नागरिक
धुणीभांडी करून उदरनिर्वाह करीत आहे. घर दुरुस्तीसाठी दोन लाख खर्च येत असून, १५ हजार रुपये मदत मिळाली. घर दुरुस्तीसाठी जास्त मदतीची गरज आहे.
- नंदा शिंदे
पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत करण्यात आली आहे. मात्र, काही मागण्यांबाबत धोरणात्मक निर्णय घ्यावे लागतील. पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू आहे. पूरग्रस्तांना शिधापत्रिका देण्यासंदर्भात जिल्हा प्रशासनाशी चर्चा केली जाईल.
- सौरभ राव, आयुक्त
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.