- प्रसाद कानडे
पुणे - पुण्याच्या सार्वजनिक वाहतुकीचा कणा असलेली ‘पीएमपी’ आता ‘धापा’ टाकत धावत आहे. जानेवारी ते मार्चदरम्यान चार हजार २५२ बस रस्त्यातच बंद पडल्या. तर दोन ठेकेदारांच्या २६६ बस आयुर्मान संपल्याने प्रवासी सेवेतून बाद झाल्या आहेत. याचा परिणाम प्रवासी सेवेवर होत आहे.
बसच्या फेऱ्या रद्द होत असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. प्रवाशांना आपला प्रवास अर्ध्यावर सोडून वाहतुकीच्या दुसऱ्या पर्यायांचा आधार घ्यावा लागत आहे. शिवाय बस रस्त्यावर बंद पडल्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे अन्य नागरिकांना देखील फटका बसत आहे.
‘पीएमपी’च्या सर्वसाधारणपणे ४८ बस दिवसाला बंद पडत आहेत. एक बस बंद पडली तर त्याचा परिणाम किमान दोन ते तीन फेऱ्यांवर होतो. मुळात ‘पीएमपी’कडे असणाऱ्या बसची संख्या अत्यंत कमी आहे. त्यात बंद पडण्याचे प्रमाण वाढत आहे. तर दुसरीकडे बसचे आयुर्मान संपल्याने त्यांना प्रवासी सेवेतून काढून टाकले जात आहे. या सर्वांचा परिणाम सेवेवर होत आहे.
वेळेवर बस उपलब्ध न होणे, गर्दी असलेल्या बसमधूनच प्रवास करणे अशा विविध गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. बस बंद पडल्यानंतर रस्त्यावर भर उन्हात दुसऱ्या बसची वाट बघत प्रवाशांना थांबावे लागते.
प्रवासी सेवेचा ‘रिव्हर्स’ गियर
पूर्वी पावसाळा सुरू झाल्यानंतर ‘पीएमपी’ बसचे ब्रेकडाऊनचे प्रमाण वाढत होते. ‘पीएमपी’चे माजी अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांच्या कार्यकाळात एका महिन्यात जर एखादी बस तीन वेळा बंद पडली तर ती काही दिवसांसाठी प्रवासी सेवेतून बाहेर काढली जाई. तसेच संबंधित बसच्या ठेकेदाराला दंड देखील केला जात असे. त्यामुळे बस बंद पडण्याचे प्रमाण कमी झाले होते.
अशीच परिस्थिती माजी अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंग यांच्या कार्यकाळात देखील निर्माण झाली होती. त्यावेळी त्यांनी देखील बसच्या देखभाल दुरुस्तीवर विशेष लक्ष दिले होते. त्यामुळे बस बंद पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले होते. आता मात्र प्रमाणात वाढ झाली आहे. ‘पीएमपी’च्या स्वमालकीच्या तुलनेत ठेकेदारांच्या बस बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे.
फेऱ्या रद्द, प्रवाशांना फटका
एका बसची संबंधित मार्गावर तीन ते चार फेऱ्या होतात. बस बंद पडल्यावर किमान दोन फेऱ्या प्रभावित होतात. दिवसाला ४८ बस बंद पडत असल्याने त्याच्या किमान ९६ फेऱ्या रद्द होत आहे. एका बसमधून एका वेळी सुमारे ५० प्रवाशांची वाहतूक होते. याचा विचार केला तर फेऱ्या रद्द झाल्याचा दिवसाला पाच हजार प्रवाशांना फटका बसत आहे. शिवाय प्रवासी घटल्याने ‘पीएमपी’च्या उत्पन्नात देखील घट होत आहे.
बस बंद पडण्याचे प्रमाण वाढले आहे. ठेकेदारांना या संबधी सूचना देण्यात आली आहे. स्वमालकीच्या बसच्या देखभाल व दुरुस्तीवर विशेष लक्ष देण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत. प्रवासी वाहतुकीवर परिणाम होऊ नये याची काळजी घेतली जात आहे.
- नितीन नार्वेकर, सह व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल, पुणे
आयुर्मान संपलेल्या बसेस
‘पीएमपी’च्या सुमारे १६५० बस दररोज रस्त्यावर धावतात. यातून रोज सुमारे १२ लाख प्रवाशांची वाहतूक होते. ‘पीएमपी’कडे सध्या बसची कमतरता असल्याने शेवटच्या घटका मोजणाऱ्या बसमधून प्रवासी वाहतूक होत आहे. बस ठेकेदार असलेल्या ट्रॅव्हल टाइम व बीव्हीजी या दोन कंपनीच्या २६६ बसचे आयुर्मान संपले आहे. पैकी १७० बस प्रवासी सेवेतून बाहेर काढण्यात आल्या आहेत.
जून महिन्यात उर्वरित ९६ बस सेवेतून बाहेर काढल्या जाणार आहेत. याचा मोठा फटका प्रवासी सेवेला बसणार आहे. दररोज एका बसमधून साधारणपणे ९०० प्रवाशांची वाहतूक होते. २६६ बस सेवेतून बाहेर गेल्यास याचा फटका किमान अडीच लाख प्रवाशांना बसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.