पुणे - बदलल्या तंत्रज्ञानाबरोबर बँकिंग व्यवहार मोठ्या प्रमाणात ऑनलाइन पद्धतीने होऊ लागले आहेत. यामध्ये आपणही मागे राहू नये, या उद्देशाने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (पीडीसीसी) सभासदांसाठी आता अन्य बँकांच्या धर्तीवर युपीआय सुविधा सुरु केली आहे.
यामुळे जिल्हा बँकेच्या सभासदांना आता बँकेच्या विविध सेवांचा लाभ घेण्यासाठी प्रत्यक्षात बँकेत जाण्याची गरज भासणार नाही. याच सर्व सेवा आता घरबसल्या एका क्लिकवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.१३) या सेवांची सुरुवात करण्यात आली.
पुणे जिल्हा बँकेने नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांचा विश्वास संपादन करावा. योग्य नियोजन आणि पारदर्शक कारभाराद्वारे ग्राहकांचे समाधान होईल, यादृष्टीने काम करावे, अशी सूचना अजित पवार यांनी बँकेचे संचालक मंडळ, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना यावेळी केली. यावेळी बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे, उपाध्यक्ष सुनील चांदेरे, आमदार अशोक पवार, संजय जगताप, ज्येष्ठ संचालक रमेश थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई आदी उपस्थित होते.
पवार पुढे म्हणाले, ‘युपीआयसारख्या सुविधा उपलब्ध करून देत, आपण काळाबरोबर बदलत असल्याचे जिल्हा बँकेने दाखवून दिले आहे. या सेवेमुळे बँकेचे सभासद आणि ग्राहकांना आता एका क्लिकवर विविध सेवा घरबसल्या मिळू शकणार आहेत. यामुळे बँकेत होणारी गर्दी कमी होईल.
बँकिंग क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. अशा वेळी व्यापारी आणि स्थानिक पतसंस्थांशी स्पर्धा करताना अनुकूल बदल घडवून आणावे लागतील. त्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणात सातत्य ठेवावे.’
या समारंभात नोकरदार सभासदांसाठी यंदापासून सुरु करण्यात आलेल्या अपघात विमा योजनेचीही सुरुवात करण्यात आली. या योजनेचा जिल्हा बँकेच्या २६ लाख सभासदांना फायदा होणार आहे. यासाठी जिल्हा बँक प्रत्येक नोकरदार सभासदांचा प्रत्येकी दहा लाख रुपयांचा मोफत अपघात विमा उतरविणार आहे. या योजनेसाठी जिल्हा बँक दरवर्षी १ कोटी ५५ लाख रुपयांचा विमा हप्ता भरणार असल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्राय डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी यावेळी सांगितले.
‘तंत्रस्नेही कर्मचारी भरती करा’
सध्या बदलत्या तंत्रज्ञानामुळे बँकिंग क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेने ग्राहकांचे हित डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी. यासाठी बँकेत नवीन कर्मचाऱ्यांची भरती करताना नवे तंत्रज्ञान जाणणाऱ्या उमेदवारांची प्राधान्याने निवड करावी. शिवाय यासाठी स्थानिक उमेदवारांना प्राधान्य द्यावे, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना केली.
बँकेशी निगडित घटकांचा कायम ऋणी राहील’
बारामतीच्या नागरिकांमुळे जिल्हा बँकेचा संचालक म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मात्र आता या पदाचा मी राजीनामा दिला आहे. परंतु मी राजीनामा दिला असला तरी, बँकेच्या विकासविषयक बाबी मार्गी लावण्यासाठी संचालक मंडळाला कायम सहकार्य राहील.
संचालक म्हणून काम करताना सर्वसामान्यांच्या आर्थिक प्रगतीत हातभार लावता आला. या बँकेमुळे सर्वांचे भरभरून प्रेम मिळाले. त्यामुळे बँकेशी निगडित सर्व घटकांचा कायम ऋणी राहील, अशा शब्दात अजित पवार यांनी यावेळी बॅँकेविषयी बोलताना त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.