पुणे - ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णांवर (Mucormycosis Patients) धर्मादाय रुग्णालयांमध्ये (Charity Hospital) ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न (Income) ८५ हजार रुपयांच्या आत आहे, अशा रुग्णांना मोफत उपचार (Free Treatment) मिळणार आहेत. तसेच, ज्यांचे वार्षिक उत्पन्न ८५ हजार ते एक लाख ६५ हजार रुपयांच्या आत आहे, अशा रुग्णांना बिलात ५० टक्के सवलत देण्यात येणार आहे. गरिबांसाठीच्या निधीमधून (आयपीएफ) योजनेंतर्गत शहरातील मोठ्या खासगी धर्मादाय रुग्णालयांमध्ये ही सुविधा मिळणार आहे. (Patients with Mucormycosis will Receive Free Treatment Charity Hospital)
राज्य सरकारकडून खासगी रुग्णालयांसाठी ‘म्युकरमायकोसिस’ आजारावरील उपचारासाठी दर निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे उपचाराचा खर्च नियंत्रणात येणार आहे. ‘आयपीएफ’ योजनेत उत्पन्न कमी असलेल्या रुग्णांना या निश्चित सरकारी दरापेक्षाही अधिक सवलत मिळणार आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, धर्मादाय रुग्णालयांमध्ये ‘आयपीएफ’ योजनेंतर्गत गरीब आणि निर्धन रुग्णांना १० टक्के बेड राखीव ठेवणे अनिवार्य आहे. रुग्णांना बेडचे भाडे, आयसीयू, निवासी वैद्यकीय अधिकारी, परिचारिकांची रुग्णसेवा, निदान चाचण्या ही सुविधा मोफत पुरवणे आवश्यक आहे. तसेच, औषधे खरेदीच्या दरात, शस्त्रक्रियेचा दरही जनरल वॉर्डच्या दरानुसार लावण्यात येतात. त्याचा या आजारावरील रुग्णांना लाभ मिळण्यास मदत होइल, अशी माहिती धर्मादाय उपायुक्त नवनाथ जगताप यांनी दिली.
महात्मा फुले जन आरोग्य योजनेत या रुग्णालयांचा समावेश
जे रुग्ण ‘आयपीएफ’ योजनेंतर्गत निकषात बसत नाहीत. त्या रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजनेत लाभ घेता येईल. भारती हॉस्पिटल, नवले हॉस्पिटल आणि डीवाय पाटील हॉस्पिटल रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना राबविण्यात येत आहे. तसेच, धर्मादाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या बैठकीत दीनानाथ मंगेशकर रुग्णालय, रूबी हॉल क्लिनिक, जहाँगीर रुग्णालय, केईएम रुग्णालय, पूना हॉस्पिटल आणि इनलॅक्स बुधराणी हॉस्पिटल या रुग्णालयांनीही या योजनेत सहभागी होण्याबाबत होकार दिला आहे. याठिकाणीही ही योजना राबविण्यात येणार आहे.
उच्च न्यायालयाच्या धर्मादाय योजनेंतर्गत निकषात बसणाऱ्या रुग्णांना मोफत उपचाराची सुविधा आहे. तसेच, महात्मा फुले जन आरोग्य योजना कोणत्या रुग्णालयात आहे, याची खातरजमा करून रुग्णांनी नोंदणी करूनच त्या रुग्णालयात दाखल व्हावे. जेणेकरून संबंधित रुग्णांना सवलतीच्या दरात औषधोपचार उपलब्ध होतील.
- नवनाथ जगताप, धर्मादाय उपायुक्त, पुणे विभाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.