विश्रांतवाडी : "लोकांना चांगले रस्ते, स्वच्छ पाणी मिळायला हवे. प्रभागातील लोकप्रतिनिधींनी पक्षविरहित काम करत लोकांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. केंद्र, राज्य सरकार आणि महापालिका तिघांनी एकत्रितपणे काम केले, तर विकास झपाट्याने होईल. समाजातील प्रत्येक घटकाला विकास योजनांचा लाभ देण्यासाठी आपण कार्यरत असले पाहिजे," असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक राज्य मंत्री व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून व आमदार सुनील टिंगरे यांच्या सहकार्यातून संगमवाडी-टिंगरेनगर विस्तारित रस्त्याचे भूमिपूजन रामदास आठवले यांच्या हस्ते झाले. येरवड्यातील ई-कॉमर्स झोन चौकात झालेल्या कार्यक्रमावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनीता वाडेकर, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पुणे शहराध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, नगरसेविका फरझाना शेख, शीतल सावंत, संपर्कप्रमुख अशोक कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
रामदास आठवले म्हणाले, "गोरगरीब जनतेच्या हिताचे धोरण नरेंद्र मोदी सरकार राबवत आहे. पालिकेतही भाजप व रिपाइंची सत्ता आहे. डॉ. सिद्धार्थ धेंडे सर्वाना सोबत घेऊन काम करत असल्याने अनेक वर्षांपासून रखडलेला हा रस्ता मार्गी लागला आहे. भाजप, रिपाइं आणि राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी असतानाही एकत्रित प्रयत्नामुळे येरवडा प्रभागाचा विकास चांगल्या पद्धतीने होत आहे. नागरिकांच्या हिताच्या कामात पक्षभेद आणता कामा नये." आगामी पालिका निवडणुकीत मागासवर्गीय आरक्षण पडले, तर महापौर 'रिपाइं'चा होईल, असा पुनरुच्चार आठवले यांनी केला.
डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी प्रास्ताविकात सांगितले की, अग्रसेन शाळा ते ई-कॉमर्स चौक हा ९०० मीटरचा रस्ता अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. राज्य सरकार आणि महापालिका यांच्या एकत्रित प्रयत्नातून हा प्रश्न सुटला असून, त्यासाठी दोन कोटी रुपयांचा निधीही मंजूर झाला आहे. लवकरच या रस्त्याचे काम पूर्ण होऊन या भागातील नागरिकांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होण्यास मदत होईल.
या प्रभागातील सगळेच लोकप्रतिनिधी अतिशय समर्पित आणि एकोप्याच्या भावनेने काम करत आहेत, ही आनंददायी बाब असल्याचे मुरलीधर मोहोळ यांनी नमूद केले. सुनील टिंगरे यांनीही मनोगत व्यक्त केले. अल्पसंख्याक आघाडीचे अँड. अयुब शेख यांनी स्वागत-प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.