जुन्नर - जागतिक वनदिनाचे औचित्य साधून श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले शिवनेरीवर जुन्नर वनविभागाच्या वतीने आज गुरुवार ता. २१ पासून कायमस्वरूपी प्लॅस्टिक बंदी करण्यात आली आहे.
पर्यटन क्षेत्रात काम करणाऱ्या विविध संस्था संघटनाकडून शिवनेरीवर प्लॅस्टिक बंदीची मागणी सातत्याने करण्यात येत होती या निर्णयामुळे पर्यावरण व निसर्गप्रेमीकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी एका छोट्या कार्यक्रमात उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक अमित भिसे यांनी शिवनेरीवर कायमस्वरूपी प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीचा शुभारंभ केला.
यावेळी जुन्नरचे वन परीक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण, वनपाल नितीन विधाटे, शेखर बैचे, वनिता होले, वनरक्षक रमेश खरमाळे, देविदास मिसाळ, स्वरूप रेंगडे, मंगल काळे, कल्याणी पोटवडे, राजेंद्र गायकवाड, एकनाथ बांगर, संदिप लांडे, किशन खरोडे, पुरातत्व विभागाचे गोकुळ दाभाडे, तसेच जुन्नर पर्यटन विकास संस्था, सह्याद्री गिरी भ्रमण संस्था, स्वराज्य पर्यटन संवर्धन संस्था, जुन्नरी कट्टा आदी संस्थांचे पदाधिकारी व सदस्य तसेच शिवाई देवी ट्रस्टचे प्रकाश ताजणे, राजेंद्र भगत, विकास दुराफे, कुसुर ग्रामस्थ व पर्यटक उपस्थित होते.
शिवनेरीवर प्लॅस्टिक बंदी असल्यामुळे येणाऱ्या पर्यटकांनी गडावर जाताना प्लॅस्टिक घेऊन जाऊ नये. पर्यटकांजवळ प्लॅस्टिक आढळून आल्यास किंवा किल्ल्यावर इतरत्र टाकून दिल्याचे आढळून आल्यास वनविभागाच्या वतीने दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे उपवनसंरक्षक सातपुते यांनी पर्यटकांना मार्गदर्शन करताना सांगितले.
वनविभाग व पुरातत्व विभागामार्फत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली असल्याचे सातपुते यांनी स्पष्ट केले. प्लॅस्टिक बंदीच्या निर्णयानंतर यावेळी सोलापूर येथून आलेल्या प्रथम पर्यटकाची तपासणी करून त्यांना गुलाब पुष्प देऊन शिवनेरीवर स्वागत करण्यात आले.
गडावर जाताना आपल्याजवळील सिगारेट,काडीपेटी,तंबाखू तसेच प्लॅस्टिक पायथ्याशी तपासणी नाक्याजवळ ठेवावे. ह्या वस्तू गडावर घेऊन जाण्यास बंदी असल्याने पर्यटकांनी सहकार्य करावे असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.