पुणे

सत्ता भाजपची, वरचढ राष्ट्रवादीच...

अविनाश चिलेकर

पिंपरी- चिंचवड शहरात तीन महिन्यांपूर्वी अनपेक्षितपणे सत्तांतर झाले. अशाही परिस्थितीत ‘दादाला सत्तेवरून खेचणारा अजून जन्माला यायचाय’ इतका दांडगा आत्मविश्‍वास आपल्या सत्तेबाबत अजित पवारांना होता. रात्रीतून दादांच्या पायाखालची सतरंजी गेली आणि इथल्याही राजकारणाने कूस बदलली. भाजपच्या बेडकीचा पाहता पाहता बैल झाला. सत्तेच्या मस्तीत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची झूल जनतेनेच उतरवली. भाजप बहुमतात आला आणि स्वप्नातसुद्धा नसताना राष्ट्रवादी थेट विरोधात बसली. अवघ्या तीन वर्षांत एक खासदार, दोन आमदार, १२८ पैकी ७८ नगरसेवक, आजी- माजी नेत्यांची उधार उसनवारी करून भाजपने सर्कस करत फौजफाटा उभा केला. केंद्र- राज्य पाठीशी असल्याने हत्तीचे बळ आले. त्यामुळे राष्ट्रवादीचे शिल्लक सरदार, भालदार, चोपदार एकदमच गारद झाले. राष्ट्रवादीचे नामोनिशाण मिटल्याचे चित्र होते. दोनच दिवसांपूर्वी महापालिका अर्थसंकल्पाच्या निमित्ताने सभागृहात भाजपविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे असे द्वंद्व पाहायला मिळाले. चर्चा न करताच अर्थसंकल्प मंजूर केल्याने भाजपवर दादागिरीचा आरोप झाला. राष्ट्रवादीने उठाव केला, सभात्याग केला. राष्ट्रवादीच्या चार मुरब्बी नगरसेवकांनी भाजपला कसा सत्तेचा कैफ चढला ते मांडले. पालखीच्या निमित्ताने वारकऱ्यांना भेट द्यावयाच्या ताडपत्री खरेदीत मोठा गैरव्यवहार झाल्याच्या आरोपाने भाजपची अवस्था अंगावर पालच पडल्यासारखी झाली. राष्ट्रवादीच्या कोठारात दारूगोळा आणि सैन्य कमी असले, तरी जशा तोफा धडधडू लागल्या, तशी भाजपची गाळण उडाली. कारण भाजपकडे सीमा सावळे वगळता ९० टक्के नगरसेवक नवखे आहेत. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेसकडे मंगला कदम, योगेश बहल, दत्ता साने, राजू मिसाळ, नाना काटे, अजित गव्हाणे यांच्यासारखे एकाचढ एक असे १७ पट्टीचे खिलाडी आहेत. या राजकीय लढाईत जरी सत्ता आणि संख्याबळ भाजपचे असले, तरी राष्ट्रवादीच वरचढ दिसली. सामसूम झाली असे वाटत असतानाच पुढच्या पाच वर्षांत पालिकेचे राजकारण कसे चालणार, त्याची एक झलक मिळाली. भाजपची मंडळी गैरव्यवहाराच्या एका फुटकळ आरोपाने पार सैरभैर झाली. सत्तेच्या सिंहासनाला किती काटे आहेत ते त्यांना प्रथम उमगले. 

सत्ता येऊन तीन महिने झाले नाहीत तोच शहरातील तमाम भाजप नगरसेवकांना नैराश्‍याने ग्रासल्याचे जाणवले. ‘सर्वत्र आमची सत्ता असूनही काहीच उपयोग नाही, एकही काम होत नाही. महापालिकेतील अधिकारी सोडा हो, साधा लिपिकसुद्धा नगरसेवकाचे ऐकत नाही. लोकांना तोंड दाखवणे मुश्‍कील झाले. आज सत्ता भाजपची; पण प्रशासन पूर्णतः राष्ट्रवादीच्या हातात आहे,’ ही अत्यंत बोलकी प्रतिक्रिया पिंपरी- चिंचवड महापालिकेत सत्ता असलेल्या एका भाजप नगरसेवकाची. महापौर निष्प्रभ, सत्ताधारी नेता सैरभैर, उपमहापौर कोण? अशी अवस्था. स्थायी समिती अध्यक्षांचा तोराच निराळा. अद्याप प्रभाग रचनाच नाही, निधीचाही थांगपत्ता नाही. कामे कशी आणि कधी होणार, हा सवाल दुसऱ्या एका भाजप नगरसेवकाचा. आजवर जे राष्ट्रवादी काँग्रेसला नावे ठेवत ठेवत सत्तेत आले, त्या भाजपचीच आता पुरती ‘राष्ट्रवादी’ झाली. 

खरे तर सत्ता प्रशासनाची आहे, असे म्हटल्यास वावगे ठरू नये. भाजपचा तो आवाकाच नाही म्हणा, की प्रशासन हाकता येत नाही म्हणा. ज्या ज्या अधिकाऱ्यांवर भाजपने भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केलेत, त्यापैकी एकालाही तीन महिन्यांत भाजप पदच्युत (बाल भी बाका ना कर सके) करू शकत नाही, ही शोकांतिका म्हणावी की मतलबीपणा, त्याचे उत्तर आता काळ देईल तेव्हा देईल; पण सर्वसामान्य जनता होत्याचे नव्हते करू शकते, हा साधा धडा ‘भाजपयी’ मंडळी ताज्या निवडणुकीवरून शिकू शकत नाहीत, हे त्यांचे दुर्दैव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'मी रोहित शर्माच्या जागी असतो, तर पर्थ कसोटी खेळण्यासाठी पोहोचलो असतो', Sourav Ganguly च्या विधानाची चर्चा

Latest Maharashtra News Updates live : अमित शाह यांच्याऐवजी स्मृती इराणी आणि शिवराजसिंह चौहान यांच्या सभा

कऱ्हाड उत्तर-दक्षिण मतदारसंघांत आघाडी धर्म? पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब पाटील एकाच व्यासपीठावर; दोन्ही गटांनी घेतलं जुळवून!

Election Voting : मतदान कार्ड नाहीये? चिंता कशाला, या 12 पैकी कोणत्याही ओळखपत्रांद्वारे करा मतदान

विद्या नाही , माधुरी नाही तर 'ही' आहे खरी मंजुलिका ; बिहाइंड द सीन व्हिडीओ पाहून प्रेक्षकांना बसला धक्का

SCROLL FOR NEXT