पिंपरी - पुणे-लोणावळा प्रस्तावित लोकल रेल्वे कॉरिडॉरसाठी स्वतंत्र ट्रॅक टाकण्याचे विचाराधीन आहे. त्यासाठीच्या तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक निधी आणि अन्य अहवाल तयार करण्याचे काम मार्च 2018 पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती रेल्वेच्या सूत्रांनी "सकाळ'ला दिली.
सर्वेक्षण अहवालाची स्थिती
पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकचा अंतिम अहवाल तयार झाल्यानंतर मान्यतेसाठी रेल्वे बोर्डाकडे पाठविला जाईल. तेथून केंद्र सरकारच्या संसदीय समिती आणि पर्यावरण विभागाकडे जाईल. त्यामुळे पुढील वर्षात या प्रकल्पाला गती मिळण्याची शक्यता आहे.
असे होईल सर्वेक्षण
रेल्वेच्या फिजिकल सर्वेक्षणात सध्याच्या मार्गावर किती ठिकाणी पूल आहेत. नाले, डोंगराळ भाग आहे. नवीन मार्गासाठी किती जागा संपादित करावी लागेल, आदी बाबींचा समावेश आहे.
रेल्वेच्या अहवालानुसार
- बोपोडी- दापोडीजवळ मुळा नदीवरील हॅरिस पूल आणि पुण्यातील मुठा नदीवरील संगम पूल या ठिकाणी लोकलसाठी स्वतंत्र नवीन पूल उभारावे लागणार
- पुणे-लोणावळा दरम्यान 112 छोटे पूल उभारावे लागणार
- मार्गावरील सर्व लेव्हल क्रॉसिंग बंद करण्याचे नियोजन
- सर्व क्रॉसिंगच्या ठिकाणी पादचारी व वाहनांसाठी उड्डाण पूल उभारावा लागणार
कामशेत स्टेशनचे स्थलांतर शक्य
सध्याच्या कामशेत स्थानकाच्या बाजूने इंद्रायणी नदी वाहत आहे. तिथे लोकलसाठी स्वतंत्र ट्रॅक उभारणे शक्य नाही. त्यामुळे सध्याचे कामशेत स्टेशन पुण्याच्या दिशेला एक किलोमीटरवर स्थलांतरित करण्याचे नियोजन आहे. या परिसरात रेल्वेची जागा बऱ्यापैकी आहे. त्यामुळे तिथे स्थानक उभारणे शक्य होईल.
झोपडपट्ट्यांचा अडथळा
पुणे-लोणावळा प्रस्तावित तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या उभारणीत राज्य सरकारचा सहभाग आहे. त्यामुळे लोहमार्गालगतच्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन राज्य सरकारच्या नियमानुसार केले जाणार आहे. रेल्वेच्या हद्दीतील घरे आणि झोपडपट्टीधारकांचे रेल्वेने सर्वेक्षण केलेले आहे. त्याचे मार्किंग केलेले आहे.
येथे आहेत झोपडपट्ट्या
शिवाजीनगर, बोपोडी, दापोडी, फुगेवाडी, कासारवाडी, पिंपरी, आनंदनगर (चिंचवड स्टेशन), दळवीनगर (चिंचवड), बिजलीनगर (चिंचवड), वाल्हेकरवाडी (आकुर्डी स्टेशनजवळ), एम. बी. कॅम्प (विकासनगर, किवळे), पार्शीचाळ (देहूरोड).
दृष्टिक्षेपात भूसंपादन
- पुणे-लोणावळा प्रस्तावित तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकसाठी (नवा लोकल कॉरिडॉर) अपेक्षित जमीन : 137.28 हेक्टर
- तिसऱ्या ट्रॅकसाठी उपलब्ध जमीन : 48.73 हेक्टर
- चौथ्या ट्रॅकसाठी उपलब्ध जमीन : 19.64 हेक्टर
- एकूण उपलब्ध जमीन : 67.47
- तिसऱ्या ट्रॅकसाठी आणखी अपेक्षित जमीन : 18.17 हेक्टर
- चौथ्या ट्रॅकसाठी आणखी अपेक्षित जमीन : 50.74 हेक्टर
- करावे लागणारे एकूण भूसंपादन : 68.91 हेक्टर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.