पिंपरी - वेळापत्रकापेक्षा उशिराने धावणाऱ्या लोकल आणि अचानक रद्द केलेल्या गाड्या, रेल्वेच्या या कारभाराचा फटका नोकरदारांसह प्रवाशांना बसत आहे. दररोजच्या "लेटमार्क'मुळे नोकरदारांच्या संतापात भर पडत असून, रेल्वेविषयी नाराजीचे वातावरण आहे.
सध्या पिंपरी ते स्वारगेट या मेट्रोचे काम वेगात सुरू आहे. येत्या तीन वर्षांत कदाचित मेट्रो शहरातून धावलेही. मात्र स्वस्तात मस्त आणि जलद प्रवास म्हणून लोकल रेल्वेकडे पाहिले जात आहे. पुणे आणि पिंपरी- चिंचवड शहरांतून दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. पूर्वी महिन्यातून एकदा कधीतरी रेल्वेचे वेळापत्रक कोलमडून पडत असे. आता रोजच असा अनुभव येत आहे. त्यामुळे इच्छित स्थळी वेळेत पोचता येत नसल्याने प्रवाशांत नाराजी आहे. अनेकदा लोकलच रद्द केली जात आहे.
लोकलचे वेळापत्रकही बिघडते
लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्या जाऊ देण्यास रेल्वेचे अधिकारी प्राधान्य देतात. त्यासाठी लोकल प्लॅटफॉर्मवर थांबवून एक्स्प्रेस गाडीला वाट करून दिली जाते. कधी कधी तर तीन तीन एक्स्प्रेस गेल्यानंतर लोकलला हिरवा सिग्नल दिला जातो. यामुळे वेळापत्रक कोलमडते.
लोकल बंदमुळे गैरसोय
पुरेशी संख्या नसल्याने रात्री साडेनऊनंतरच्या काही लोकल तात्पुरत्या, तर काही कायमच्या बंद केल्या आहेत. पिंपरी-चिंचवड, तळेगाव दाभाडे आदी परिसरांतील कामगार ग्रामीण भागातील आहेत. मुंबईहून रात्री उशिरा येणारे प्रवासी लोणावळ्याहून लोकलने पिंपरी-चिंचवडला येतात. या लोकल बंद केल्याचा मोठा फटका बसू शकतो.
रात्रीच्या एक्स्प्रेस गाड्या
- राजकोट एक्स्प्रेस : 9.25
- हुबळी एक्स्प्रेस : 9.30
- चेन्नई एक्स्प्रेस : 10.45
- महालक्ष्मी एक्स्प्रेस : 11.00
- लातूर एक्स्प्रेस : 11.30
रात्रीच्या गाड्यांनी अनेक जण मुंबईहून लोणावळ्यापर्यंत येतात. तेथून पुणे मार्गावरील गावांमध्ये जाण्यासाठी लोकलने प्रवास करतात. मात्र 9.30 नंतरच्या लोकल बंद केल्याने अनेकांची गैरसोय होणार आहे. रात्री साडेआठ ते रात्री बारापर्यंत एकही एक्स्प्रेस गाडी मुंबईला जाण्यासाठी नाही.
कमी उत्पन्नाची कारणे
- पिंपरी-चिंचवडहून लोणावळा, मुंबई प्रवास करणारे हजारो प्रवासी त्यांच्या स्थानकाऐवजी थेट पुणे ते लोणावळा किंवा पुणे ते मुंबई असा मासिक पास काढतात. त्यामुळे पिंपरी-चिंचवडहून उत्पन्न कमी दिसते, असे नियमित प्रवाशांचे म्हणणे आहे. तसेच देहूरोड ते लोणावळा दरम्यान विना तिकीट प्रवाशांची संख्या जादा असते. फुकट्यांची दादागिरीही असते. या भागात नियमित तिकीट तपासणी केल्यास महसुलात वाढ होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली.
"सिंहगड'ला दोन कोच जोडावेत
सिंहगड एक्स्प्रेसने शहरातील बहुतांश नोकरदार मुंबईला कामाला जातात. संपूर्ण शहरासाठी फक्त एकच बोगी राखीव असते. त्यातील पिंपरीला 56 आणि चिंचवडसाठी 60 सीट राखीव असतात. यामुळे प्रवाशांमध्ये दररोज जागेवरून भांडणे होतात. गर्दीत चालती गाडी पकडण्याच्या नादात अनेकांचा अपघात झाला आहे. या गाडीला पिंपरी आणि चिंचवडसाठी स्वतंत्र दोन बोगी जोडण्याची मागणी प्रवाशांनी केली आहे. पुण्याहून अनेक एक्स्प्रेस आहेत. त्यातील पिंपरी- चिंचवडला थांबा असणाऱ्या एकमेव गाडीला अवघी एकच बोगी दिलेली आहे. रेल्वेचा हा दुजाभाव असल्याने प्रवाशांत संताप आहे.
इतर गाड्यांनाही थांबा हवा
पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या 25 लाखांच्या घरात आहे. ठराविक एक्स्प्रेस गाड्या सोडल्यास अन्य गाड्यांना थांबा नाही. रेल्वेने डेक्कन क्वीन, प्रगती, महालक्ष्मी, चेन्नई आणि लातूर या गाड्यांना थांबा दिल्यास प्रवाशांना दिलासा मिळू शकेल.
दुपारीही लोकल सुरू ठेवावी
सकाळच्या सत्रातील शाळा- महाविद्यालये दुपारी साडेबारानंतर सुटतात. हे विद्यार्थी स्टेशनला येईपर्यंत एक वाजतो. मात्र दुपारी एक ते 3.30 पर्यंत कोणतीही लोकल नाही. यामुळे हाल होतात. या दरम्यान किमान दोन लोकल सुरू करण्याची आवश्यकता आहे.
रात्री अकराच्या सुमारास तळेगावात पोचणारी लोकल बंद केली आहे. बारा डब्यांच्या या लोकलमध्ये प्रवाशांची संख्या नगण्य होती. या लोकलनंतर अगदी पाच मिनिटांत येणारी पॅसेंजर सर्व स्थानकांवर थांबत असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
- मनोज जव्हार, जनसंपर्क अधिकारी, रेल्वे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.