पिंपरी/कामशेत - पुणे-लोणावळादरम्यानच्या प्रस्तावित तिसऱ्या व चौथ्या रेल्वे ट्रॅकच्या कामाचे सर्वेक्षण येत्या चार महिन्यांत पूर्ण होणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून निविदा प्रकिया काढण्यात येईल, अशी माहिती मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी कामशेत येथे पत्रकारांना दिली; तसेच पुणे ते लोणावळादरम्यान धावणाऱ्या उपनगरीय रेल्वेसाठी (लोकल) स्वतंत्र कॉरिडॉर करण्याचे नियोजन रेल्वे मंत्रालयाने केलेले आहे. येत्या दोन वर्षांत या कामाला प्रत्यक्षात सुरवात होण्याची शक्यता आहे.
रेल्वेच्या अडचणी
पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकसाठी काही ठिकाणी भूसंपादन करावे लागणार
कामशेत रेल्वे स्थानकाचे स्थलांतर करावे लागणार
पुणे-पिंपरीदरम्यानच्या लोहमार्गालगतच्या झोपडपट्ट्या हटवाव्या लागणार
पिंपरी-लोणावळादरम्यान बऱ्यापैकी जागा असूनही अतिरिक्त जागेची आवश्यकता भासणार
सद्य:स्थिती
पुणे-लोणावळा तिसऱ्या व चौथ्या ट्रॅकबाबत अंतिम सर्वेक्षण अहवालाचे काम प्रगतिपथावर
यंदाच्या केंद्रीय अर्थसंकल्पात १२ कोटी ५० लाख रुपयांची तरतूद
प्रत्यक्ष कामासाठी ९०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित
सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर निविदा प्रक्रिया सुरू होणार
राज्य व केंद्र सरकारकडून निधी उपलब्ध होणार
लोणावळा रेल्वे स्थानकाचा समावेश ‘क’ श्रेणीत
लोणावळा फाटक क्रमांक ३० येथील उड्डाण पूल व फाटक क्रमांक ३२ भांगरवाडी येथील भूमिगत रस्त्याला रेल्वेची मंजुरी
तळेगाव नगरपालिका हद्दीतील खांब क्रमांक ५१ येथे ‘सब-वे’ उभारण्यास रेल्वेची मंजुरी
भविष्यात..
लोणावळ्यात प्रवाशांसाठी दोन एस्कलेटर बसविण्यात येणार
एक एस्कलेटर (सरकता जिना) ऑक्टोबरमध्ये; तर दुसरा डिसेंबरमध्ये बसविण्यात येणार
लोणावळा उड्डाण पूल व भांगरवाडी भूमिगत रस्त्याच्या कामास लोणावळा नगरपालिकेकडून लवकरच सुरवात
लोणावळा उड्डाण पूल व भांगरवाडी भूमिगत रस्त्यासाठी ५० टक्के खर्च लोणावळा नगरपालिका करणार
चिंचवड व आकुर्डी रेल्वे स्थानकांवरील सुविधांबाबत कार्यवाही सुरू
तळेगाव नगरपालिका हद्दीतील खांब क्रमांक ५१ येथे ‘सब-वे’चे काम नगरपालिका करणार
महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही
पुणे-लोणावळादरम्यान लोकलने प्रवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. यामध्ये छेडछाडीचे प्रकार रोखण्यासाठी लवकरच महिलांच्या डब्यात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत, यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांच्या निधीतून खर्च केला जाणार आहे.
वडगाव ‘सब-वे’ला मंजुरी
मावळ लोकसभा मतदारसंघातील पुणे ते लोणावळा लोहमार्गावरील प्रलंबित मागण्यांचा सातत्याने पाठपुरावा मी करीत आहे. रेल्वेचे अधिकारी व मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक देवेंद्रकुमार शर्मा यांनी अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. काही प्रलंबित प्रश्न लवकरच सुटतील. वडगाव-केशवनगर येथील गेट क्रमांक ४९ येथील ‘सब-वे’साठी रेल्वे विभागाने १.५६ कोटी रुपयांचा प्रस्ताव दिलेला आहे. पुढील अर्थसंकल्पात यासाठी तरतूद केली जाणार आहे, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.