पिंपरी - महापालिकेतील भाजपचे स्वीकृत सदस्य माउली थोरात, मोरेश्वर शेडगे आणि बाबू नायर हे पक्षाच्या शहर जिल्हा कार्यकारिणीत अनुक्रमे संघटन सरचिटणीस, उपाध्यक्ष आणि सरचिटणीस असून, या तिघांनाही पक्षाच्या धोरणानुसार पदाचे राजीनामे द्यावे लागणार आहेत. या तिघांकडे एकापेक्षा जास्त पदे असल्याने त्यांच्यावरही राजीनामा देण्याची वेळ आली आहे. त्यासाठी पाच डिसेंबरची मुदत देण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या निदर्शनास ही बाब आल्याने त्यांनीच या पदाधिकाऱ्यांना राजीनामे देण्याचे आदेश दिल्याने पक्षांतर्गत वातावरण ढवळून निघाले असून, कार्यकर्त्यांत चलबिचल वाढली आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पक्षाने प्रत्येक मतदारसंघात मंडलापर्यंत कार्यकारिणीची नियुक्ती व बूथरचना करण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष दानवे स्वत: पुणे व पिंपरी-चिंचवडच्या शहर जिल्हा कार्यकारिणीच्या बैठका घेत आहेत. त्यांनी नुकतीच बाणेरमध्ये पिंपरी-चिंचवड जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेतली. या वेळी प्रदेश सरचिटणीस आमदार सुजितसिंह ठाकूर, खासदार अमर साबळे, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, महिला मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीस उमा खापरे यांच्यासह काही पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत झालेल्या चर्चेच एकएका पदाधिकाऱ्याला त्याने केलेल्या कामांबद्दल विचारणा केली. त्या वेळी स्वीकृत सदस्य असलेले संघटन सरचिटणीस माउली थोरात प्रत्येक वेळी उठून माहिती देत होते. त्या वेळी एका व्यक्तीकडे किती पदे आहेत, याची विचारणा प्रदेशाध्यक्षांनी केली.
विचारणा झाल्यावर पदाधिकाऱ्यांनी दुसऱ्या पदाची माहिती प्रदेशाध्यक्षांना दिली. ही बाब लक्षात येताच ज्यांच्याकडे स्वीकृत सदस्यपद तसेच दोन पदे आहेत त्यांचे पक्षाच्या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांना पक्षाच्या संघटनात्मक जबाबदारीतून मुक्त करा, असा आदेश प्रदेशाध्यक्षांनी दिला. आतापर्यंत बूथ कार्यकारिणी नियुक्तीचे काम केवळ ६० टक्के झाले आहे.
त्या नियुक्त्या येत्या पाच डिसेंबरपर्यंत करण्यात याव्यात; तसेच ज्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेतले त्या संघटन सरचिटणीस व चिटणीस पदावर इतरांना संधी द्यावी, असे दानवे यांनी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांना सांगितले.
प्रदेशाध्यक्षांच्या या आदेशामुळे स्वीकृत सदस्य असलेल्या संघटन सरचिटणीस माउली थोरात, सरचिटणीस बाबू नायर आणि उपाध्यक्ष व पक्षाचे विस्तारकाची जबाबदारी पार पाडणारे मोरेश्वर शेडगे यांना पक्षातील पद गमवावे लागणार आहे. पाच डिसेंबरपूर्वी शहराध्यक्ष जगताप यांच्याकडे हे राजीनामे सुपूर्त केले जाणार असल्याचे एका पदाधिकाऱ्याने सांगितले.
कामतेकर, निसळ यांची नावे चर्चेत
ज्यांच्याकडे दोन पदे आहेत, त्या संघटन सरचिटणीस माउली थोरात, सरचिटणीस बाबू नायर व उपाध्यक्ष मोरेश्वर शेडगे यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो. तसे झाल्यास पक्षातील अन्य ज्येष्ठ कार्यकर्त्याचा संघटन सरचिटणीस म्हणून विचार केला जाऊ शकतो. या पदासाठी सध्याचे सरचिटणीस सारंग कामतेकर व प्रमोद निसळ यांच्या नावाची चर्चा पक्षात आहे. खालच्या स्थरावर काम करताना जबाबदारी मोठी असते. त्यामुळे खालच्या स्थरावर पक्षाचे ‘एक व्यक्ती एक पद’ असे धोरण असल्याचे एका ज्येष्ठ कार्यकर्त्याने सांगितले. दरम्यान, माउली थोरात, बाबू नायर यांनी मात्र राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे स्पष्ट केले आहे; तर शेडगे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.