पावसाची चाहूल लागताच पुणेकरांची पावले वळतात, ती लोणावळ्याकडे. लोणावळा परिसर हा ट्रेकर्ससाठी स्वर्गच म्हणावा लागेल.
पावसाची चाहूल लागताच पुणेकरांची पावले वळतात, ती लोणावळ्याकडे. लोणावळा परिसर हा ट्रेकर्ससाठी स्वर्गच म्हणावा लागेल. लोणावळ्याच्या अलीकडे असलेल्या मळवली स्टेशनवर उतरून भाजे गावाला जाऊन, तिथून चालत लोहगड किल्ल्यावर जाता येते. तसेच आता लोहगडवाडी या पायथ्याच्या गावापर्यंत डांबरी रस्ता झाला आहे, त्यामुळे गाडीने वर जाता येते. लोहगडाच्या पायथ्याला टुमदार लोहगडवाडी आहे, तेथे चहा, नाश्ता, जेवणाची सोय होऊ शकते. या वाडीच्या मागच्या बाजूला लोहगडाच्या कड्यात जैन लेणी आहेत. तेथे एक शिलालेखसुद्धा आहे, याची सुरुवात ‘नमो अरिहंत नाम’ अशी होते. त्यामुळे या जैन लेणी आहेत असे म्हणता येते.
किल्ल्याला गणेश, नारायण, हनुमान आणि महादरवाजा असे चार दरवाजे आहेत. सगळ्यांत वरून खालच्या दरवाजांची आणि बुरुजांची रचना फार सुंदर दिसते. या व्यतिरिक्त किल्ल्यावर लक्ष्मी कोठी, शिवमंदिर, अष्टकोनी तळे, सोळाकोनी तळे, दोन जुन्या गुहा, अनेक पाण्याची टाकी आणि घरांचे व तोफांचे अवशेष आहेत. गडाचा एक भाग बराच लांबला असून त्याच्या शेवटी माचीचे उत्तम बांधकाम आहे. याला विंचूकाटा माची असे म्हटले जाते. हा किल्ला आधी छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि नंतर पेशव्यांनी धन, सोने-नाणे ठेवण्यासाठी तिजोरीसारखा वापरला.
सुरतेहून आणलेली लूट इथेच ठेवली होती. लोहगड आणि विसापूर या किल्ल्यांच्या मधून तुंगारण्यात कारतलब खान हा शाहिस्तेखानाचा सरदार कोकणात उतरण्यासाठी सैन्य घेऊन गेला. पुढे उंबरखिंडीतली प्रसिद्ध लढाई होऊन मुघलांना इथून शस्त्रे दारूगोळा आणि घोडे सोडून परत जावे लागले. नाना फडणवीस यांचे काही महिने इथे वास्तव्य होते. पेशवे काळात या किल्ल्यावर दुरुस्तीचे बरेच काम झाले आहे. हा किल्ला मध्ययुगीन असून याचा ताबा विविध राजसत्तांकडे होता. यात सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, यादव, बहामनी, निजाम, मुघल आणि मराठे यांच्याकडे वेळोवेळी ताबा होता. शिवाजी महाराजांनी १६४८ मध्ये हा किल्ला जिंकून स्वराज्यात आणला; पण १६६५ च्या पुरंदरच्या तहात हा मुघलांना द्यावा लागला. पुन्हा १६७० मध्ये हा स्वराज्यात आला तो कायमचा.
काय पहाल?
चारही दरवाजे, बुरूज, शिवमंदिर, लक्ष्मी कोठी, पाण्याची टाकी, अष्टकोनी आणि सोळाकोनी तलाव, विंचूकाटा माची.
कसे पोहचाल
पुण्याहून मळवलीला जावे. तेथून भाजे गावात पोचून चालत जाता येते किंवा स्वतः वाहनानेही जाता येते. तसेच लोणावळ्यातून लोहगडवाडीला वाहनाने जाता येते.
- सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.