चौदाव्या शतकात ‘इसामी’ नावाच्या मुस्लिम कवीने रचलेल्या शाहनामा-ए-हिंद या फारसी महाकाव्यात सिंहगडचा पहिला उल्लेख कुंधियाना असा येतो.
चौदाव्या शतकात ‘इसामी’ नावाच्या मुस्लिम कवीने रचलेल्या शाहनामा-ए-हिंद या फारसी महाकाव्यात सिंहगडचा पहिला उल्लेख कुंधियाना असा येतो. नागनायक नावाच्या एका कोळी सरदाराकडून कुंधियाना महम्मद तुगलकाकडे कसा आला याचे त्यात वर्णन आहे. तुघलकाकडून निजामाकडे आणि निजामाकडून आदिलशाहीकडे हा किल्ला आला. शिवरायांनी कोंढाण्याचे महत्त्व ओळखून तोरणा, राजगड नंतर कोंढाणा स्वराज्यात आणला आणि त्याचे नाव सिंहगड असे ठेवले.
पुढे पुरंदरच्या तहानुसार शिवाजी महाराजांना हा किल्ला मुघलांकडे सोपवावा लागला, मात्र नरवीर तानाजी मालुसरे यांनी माघ वैद्य नवमीच्या अंधाऱ्या रात्री आकस्मिक छापा टाकून सिंहगड परत स्वराज्यात आणला. दुर्दैवाने या छाप्यात तानाजीरावांना आपला देह ठेवावा लागला. संभाजी महाराजांच्या कारकिर्दीत नावजी बलकवडे आणि विठोजी कारके यांनी तानाजीसारखेच अचाट शौर्य गाजवून सिंहगड परत स्वराज्यात आणला. राजाराम महाराजांच्या मृत्यूपर्यंत तो कायम स्वराज्यात होता. पुढे औरंगजेबाने तो जिंकला पण दोन वर्षांतच रामजी फाटक नावाच्या शूर वीराने तो ताब्यात घेतला आणि तो पुढे स्वराज्यातच राहिला. पंतसचिव आणि पेशवे यांच्यात तह होऊन सिंहगड पेशव्यांकडे आला.
आज व्यायामासाठी, ट्रेकिंगसाठी, फिरण्यासाठी, पावसात भिजण्यासाठी आणि गरमागरम कांदा भजी, पिठलं-भाकरी खाण्यासाठी पुणेकरांची पावले सिंहगडाकडे वळतात, तसेच कात्रज ते सिंहगड, सिंहगड ते राजगड ते तोरणा असे काही लोकप्रिय ट्रेकसुद्धा इथे करता येतात. पूर्वी प्रस्तरारोहणाचा सराव करण्यासाठीसुद्धा इथला खानकडा आणि उत्तम पेंटर हा कातळ प्रसिद्ध होता.
काय पहाल
कोंढाणेश्वर महादेवाचे शिवालय, अमृतेश्वर भैरवाचे देवालय, नरवीर तानाजी मालुसरे यांचे समाधिस्मारक, टिळक बंगला, पुणे दरवाजा, कल्याण दरवाजा, दारूकोठार, प्राचीन खांब टाकी आणि राजाराम महाराजांची समाधी अशी अनेक ठिकाणे येथे आहे. एकेकाळी महत्त्वाचे असलेले टीव्ही सेंटर आणि त्यांचा लोखंडी मनोरा आपले लक्ष वेधतो.
कसे पोहचाल
पुण्याहून पीएमपीएमएल बसने पायथ्याच्या आतकरवाडीला जाऊन येथून वर चालत जाता येते. कात्रज बस स्टँडहून कोंडणपूर येथे बसने जाऊन वरती चालत जाता येते, तसेच मोटारीसाठी वरपर्यंत रस्तासुद्धा आहे. मागच्या बाजूने कल्याण दरवाजानेसुद्धा वर जाता येते. पुण्यापासून अंतर २५ किलोमीटर
- सतीश मराठे, इतिहासप्रेमी-गिर्यारोहक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.