सुरुवातीपासूनच प्राथमिक सुविधांचा अभाव असणाऱ्या कोळेवाडीत महापालिका प्रशासन पोचणार का? हा ग्रामस्थांना पडलेला प्रश्न आहे. आजपर्यंत कुठलेही प्रशासन कोळेवाडीकरांसाठी सहज उपलब्ध झालेले नाही. रस्ता वगळला तर गावात कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. गावात ना बस आहे, ना पाणी. त्यामुळे आता महापालिका तरी तारणार का? असा प्रश्न असून, गावकरी पालिकेतील समावेशाबाबत नकारात्मक भूमिकेत आहेत.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आंबेगावमधून २००२ला जांभूळवाडी-कोळेवाडी ग्रुप-ग्रामपंचायतीची स्थापना झाली. त्यामध्ये कोळेवाडीचे दोन सदस्य असतात. पूर्ण गाव आदिवासी महादेव कोळी समाजाचे आहे. ५० ते ६० घरांचे गाव असणाऱ्या कोळेवाडीतील लोकांची उपजीविका करण्याचे साधन म्हणजे गावाभोवती असणारे जंगल, शेती तसेच रानातील रानमेवा आणि मोलमजुरी, जंगलातील मध, रानभाज्या विकणे ही आहेत. शेतजमिनीशी नाळ असणारा आणि त्याला पूरक व्यवसाय करणाऱ्या लोकांची संख्या गावात जास्त आहे. लोकांसमोर रोजगाराचा मूळ प्रश्न असताना महापालिकेत समावेश झाल्यानंतर कर कसा भरणार? हा प्रश्न गावकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे गावातील लोक पालिकेतील समावेशाबाबत नकारात्मक आहेत.
शहरालगत असणाऱ्या कारखान्यांमध्ये अकुशल कामगार म्हणून काम मिळाले तरी दळणवळणाच्या दृष्टीने ते गैरसोयीचे ठरते. त्यामुळे शहरात जाऊन कामधंदा करणेही गावकरी टाळतात. काहीजण दत्तनगर किंवा आंबेगाव भागात ये-जा करून कामधंदा करतात. गावात कुठलीही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नाही. गावातील नागरिकांना शहरात येण्यासाठी ३ किमी अंतरावर असणाऱ्या जांभुळवाडीत यावे लागते. गावात एका सार्वजनिक बोअरिंगच्या आधारे पिण्याच्या पाण्याची सोय होते. उन्हाळ्यात टॅंकरशिवाय पर्याय नसतो. ड्रेनेज लाइनची व्यवस्था तर लांबच लोक उघड्यावर प्रातर्विधीला जातात ही शोकांतिका आहे.
दृष्टिक्षेपात गाव...
५५६ (२०११ च्या जनगणनेनुसार)
७३३.१४ हेक्टर
सरपंच - वनिता जांभळे
सदस्यसंख्या - २
पुणे स्टेशनपासून अंतर : १७ किलोमीटर
गावाचे वेगळेपण : सह्याद्री रांगांच्या कुशीत वसलेले गाव
महापालिकेत गावाचा समावेश केल्यानंतर पालिका प्रशासन भौगोलिकदृष्ट्या गावापर्यंत पोचणे कठीण दिसते. ग्रामपंचायत असल्यास छोटीमोठी कामे स्थानिक पातळीवर करून घेणे शक्य आहे. मात्र, महापालिकेतील समावेशानंतर गाव अडगळीत पडेल.
- राजेंद्र जोरकर, उपसरपंच, जांभूळवाडी-कोळेवाडी
ग्रामस्थांना पालिका प्रशासनाला अडचणींचा पाठपुरावा करणेही जमणार नाही, त्यामुळे गावाच्या समावेशाबाबत पुनर्विचार व्हावा, ही अपेक्षा आहे.
- रंजना चोरगे, स्थानिक नागरिक
आम्ही ग्रामपंचायतीची घरपट्टीसुद्धा वेळेवर व पूर्ण भरू शकत नाहीत. गावाचा महापालिकेत समावेश झाल्यावर आम्ही पालिकेचा कर वेळेवर भरूही शकणार नाही.
- सागर सांगळे, स्थानिक नागरिक
गावाचा महापालिकेत समावेश करण्याऐवजी गावाला जांभूळवाडी-कोळेवाडी ग्रुप ग्रामपंचायतमधून वेगळे करून कोळेवाडी स्वतंत्र ग्रामपंचायत करावी.
- दामोदर शेलार, स्थानिक नागरिक
(उद्याच्या अंकात वाचा जांभूळवाडी गावाचा लेखाजोखा)
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.