शहरातील खड्डे बुजविण्यासाठी आदर्श नियमावलीचे पालन केले जाईल, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. मात्र, प्रत्यक्षात खड्ड्यात पाणी जमा झालेले असताना त्यात काँक्रीट टाकून खड्डा बुजविण्याचा अजब प्रकार महापालिकेच्या ठेकेदारांनी सुरू केला आहे. वारजे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हा प्रकार समोर आला. यामुळे खड्डे दुरुस्तसाठीचा निधीही ‘खड्ड्यांत’ गेल्यात जमा आहे.
पावसाळ्यात शहरातील रस्त्यांना खड्डे पडून चाळण झालेली आहे. वाहनचालकांची तारांबळ उडत असून कोंडीत भर पडत आहे. खड्डे बुजविताना चुकीच्या पद्धतीने डांबर किंवा सिमेंट न टाकता नियमानुसारच खड्डा बुजविला पाहिजे असे ठेकेदारांना, अधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे. त्यानुसार काही काही भागात कार्यवाही सुरू आहे. पण अद्याप काही ठेकेदार त्यांच्या मनमर्जीप्रमाणे खड्डे बुजवत आहेत.
दरम्यान या सर्व प्रकाराचा व्हिडिओ दैनिक सकाळचे प्रतिनिधी ब्रिजमोहन पाटील यांनी एक्सवर शेअर केला आहे. यावेळी त्यांनी लिहिले आहे की,"पुणे महापालिका भर पावसात खड्डे कसे बुजवत आहे बघा. खड्ड्यात पाणी साचलेले असले तरी त्यात थेट सिमेंट काँक्रिट टाकले जात आहे. असे केल्यास कामाचा दर्जा कसा राहिल? ठेकेदाराचा माणूस बिनधास्तपणे सांगतोय काही होणार नाही?"
हा प्रकार वारजेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील असल्याचेही पाटील यांनी पुढे सांगितले आहे.
यावेळी सकाळचे प्रतिनिधी पाटील यांनी तिथे उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांना या सर्व प्रकाराबाबत विचारणा केली, तेव्हा त्या कर्मचाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याचबरोबर या काँक्रिटवर डांबर टाकणार असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले.
वारजे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडून कर्वेनगरच्या दिशेने जाताना दुपारी साडेतीनच्या सुमारास सिमेंट रस्ता बुजविण्याचे काम सुरू होते. पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यात पाणी जमा झालेले असताना हे पाणी बाहेर न काढता मिक्सरमधून सिमेंट ओतून खड्डा बुजविण्यात आला. पण रस्त्याचा हा सगळा भाग भुसभुशीत झाला होता. काँक्रीटमधून पाणी वाहत होते. यावेळी ठेकेदाराच्या कामगारांकडे चौकशी केली असता हे काम पाण्यात काँक्रीट टाकले तरी काही होणार नाही, रस्ता चांगला होईल, असा दावा केला. दरम्यान, हे काम सुरू असताना पुणे महापालिकेचा कोणताही उपअभियंता किंवा कर्मचारी यावेळी उपस्थित नव्हते.
"हे काम पाणीपुरवठा विभागातर्फे केले जात आहे. खड्डा बुजविताना त्यातील पाणी काढून टाकणे आवश्यक होते. अशा प्रकारे काम करणे चुकीचे आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदारावर कारवाई केली जाईल आणि रस्ता पुन्हा नव्याने करून घेतला जाईल," अशी माहिती पुणे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी दिली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.