पिंपरी (पुणे) : 'पोलिस चौकीत नको, चौकात थांबा,' असे आदेश पोलिस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांनी पोलिसांना दिले. तो निर्णय किती सार्थ आहे, हे आता दिसून येऊ लागले आहे. मोबाईलवर बोलत चाललेल्या पादचाऱ्याचा मोबाईल पळवणाऱ्या दोन चोरट्यांना डांगे चौकातील पोलिसांनी जेरबंद केले. ही घटना थेरगावात बुधवारी सायंकाळी घडली. पोलिस आयुक्तांच्या टीमवर्कने चोरट्यांना दिलेला हा दुसरा दणका आहे. यापूर्वी निगडीत पोलिसांच्या टीमने दोन चोरट्यांना जागेवरच पकडले आहे.
शुभम नितीन काळभोर (वय 18, रा. भीम शक्तीनगर, मोरेवस्ती, चिखली) आणि त्याचा अल्पवयीन साथीदाराला अटक केली. त्यांच्यावर पिंपरी, निगडी, भोसरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात मोबाईल चोरीचे गुन्हे दाखल आहेत. वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आयुक्तांनी दिलेल्या आदेशानुसार वाकड पोलिस ठाण्यातील टीम क्रमांक 3, 9 आणि 11 यातील पोलिस कर्मचारी डांगे चौकातील नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर जॅमरची कारवाई करीत होते. त्या वेळी गणेश नारायणदास सोमाणी (वय 22, रा. थेरगाव) हे बुधवारी रात्री पावणेआठच्या सुमारास थेरगावातील गणेश मंदिरापासून पायी मोबाईलवर बोलत चालले होते. त्या वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला.
सोमाणी यांनी आरडाओरडा केला. इतर नागरिकांनीही 'चोर-चोर' ओरडत दुचाकीवरील आरोपींच्या मागे लागले. त्यावेळी चौकात असलेले पोलिस कर्मचारी रोहिदास टिळेकर, मयूर जाधव, दत्तप्रसाद चौधरी, शरद दुधाळ यांनी चोरट्यांचा पाठलाग करून पकडले. पकडलेल्या आरोपींकडून फिर्यादी व साक्षीदार यांचे चोरलेले 13 हजार रुपयांचे दोन मोबाईल हस्तगत केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.