सोमेश्वरनगर : स्वप्नीलला पोलिस बँडसमन पदाच्या मैदानी चाचणीसाठी २८ जूनला पहाटे सहा वाजता सिंधुदुर्गला हजर राहण्याचे आदेश आहेत, तर राज्य राखीव पोलिस दलाच्या परीक्षेसाठी २९ जूनला पहाटे साडेचार वाजता सोलापूरला हजर राहण्याचे आदेश आले आहेत! स्वप्नीलप्रमाणे पोलिस भरतीस इच्छुक असणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या परीक्षा देण्याच्या हक्कावर गदा आणण्याचे काम पोलिस भरतीच्या यंत्रणेच्या या अजब फतव्याने केले आहे.
यामुळे स्वप्नीलसारख्या उमेदवारांनी हेलिकॉप्टरने किंवा विमानाने भरतीच्या ठिकाणी पोहचावे अशी सरकारची अपेक्षा आहे काय, असा संतप्त सवाल केला जात आहे. तसेच पाचही पदांच्या मैदानी चाचणीत पुरेसे अंतर ठेवण्याची मागणी होत आहे. पोलिस शिपाई, पोलिस शिपाई चालक, राज्य राखीव पोलिस बल, कारागृह पोलिस शिपाई, पोलिस बँडसमन या पाच पदांसाठी सतरा हजार जागांवर भरती सुरू आहे.
या प्रक्रियेत एसईबीसी प्रवर्गातील असंख्य विद्यार्थ्यांचे योग्य नियोजनाअभावी अर्ज भरायचे राहिले. वयवाढीच्या मुद्दा बासनात गुंडाळला गेला. आता १९ जूनपासून ऐन पावसाळ्यात मैदानी चाचणी होणार आहे. त्यावेळी चाचणी कशी द्यायची असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे. पोलिस शिपाई, एसआरपीएफ, बँडसमन या पदांच्या भरतीची मैदानी चाचणी एकाच वेळी १९ जूनपासून होईल. उमेदवारांना एकाच पदासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यांत अर्ज करायला मनाई होती मात्र, प्रत्येकास पाच पदांना अर्ज सादर करण्याची परवानगी आहे. बहुतांश उमेदवारांनी पोलिस शिपाई आणि एसआरपीएफ असे दोन्हीकडे अर्ज केले आहेत. मात्र आता सर्वच पदांच्या मैदानी चाचण्या एकाच वेळी आल्याने सर्वांची कोंडी झाली.
करिअर मार्गदर्शक विक्रम बोंद्रे म्हणाले, ‘‘अर्ज भरलेल्या एकाचेही नुकसान होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. टप्प्याटप्प्याने चाचणी करणे आवश्यक आहे. किमान प्रत्येकास तीन - चार दिवसांचे अंतर ठेवून प्रवेशपत्र बदलून द्यावीत किंवा खास राखीव दिवस ठेवावेत.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.