पुणे - कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याने फरासखाना, खडक, स्वारगेट व कोंढवा या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील काही विशिष्ट परिसरातील लोकांना घराबाहेर पडण्यास, संचार करण्यास मनाई (कर्फ्यू) करण्यात आली आहे. त्याबाबतचा आदेश पोलिस सहआयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिला आहे. येत्या 14 एप्रिलपर्यंत तो लागू असेल. या कालावधीत सकाळी दहा ते दुपारी बारा या वेळेतच नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करता येणार आहे. या व्यतिरिक्त विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार असल्याचेही डॉ. शिसवे यांनी स्पष्ट केले आहे.
शहराच्या काही भागात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढली असल्याने सर्व पेठांसह कोंढवा, महर्षीनगर ते राजा बहादूर मिल रस्त्यावरील आरटीओ कार्यालयापर्यंतचा परिसर सोमवारपासून सील करण्यात आला आहे. या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी, यासाठी मंगळवारी सायंकाळी डॉ. शिसवे यांनी हा आदेश काढला.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असलेल्या भागात नागरिकांच्या हालचालींवर या आदेशामुळे निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित भागात रस्त्यावर विनाकारण फिरल्यास, वाहने रस्त्यांवर आणल्यास किंवा गल्ल्यांमध्ये फिरणे, थांबणे, रेंगाळणे यावरही मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
येथे असेल मनाई
* खडक पोलिस ठाणे : मक्का मस्जिद, यादगार बेकरी ते दलाल चौक- मोहसीन जनरल स्टोअर्स - शमा फॅब्रिकेशन- शहीद भगतसिंग चौक - उल्हास मित्रमंडळ चौक- राजा टॉवर- इम्यॅन्युअल चर्चची मागील बाजू- हाजी इसाकउद्दीन पथ- पुष्पम ज्वेलर्स, मंगल क्लबजवळ महाराणा प्रताप रोड- मीठगंज पोलिस चौकी - रॉयल केटरर्सजवळील बोळ- जाहीद लेडीज टेलर्स- चॉंदतारा चौक- मदिना केटरर्स- घोरपडे पेठ पोलिस चौकी-इक्बाल स्क्रॅप सेंटर ही ठिकाणे आणि अंतर्गत गल्ली रस्त्यावरील भाग.
* फरासखाना पोलिस ठाणे :
मंगळवार पेठ : कागदीपुरा, गाडीतळ चौक, कामगार पुतळा रोड
रविवार पेठ : गोविंद हलवाई चौक, हमजेखान चौक, गुरूद्वारा रोड, देवाजी बाबा चौक
* स्वारगेट पोलिस ठाणे : मीनाताई ठाकरे वसाहत कमान ः महर्षीनगर ते गिरिधर भवन चौकापर्यंत रस्त्याची डावी बाजू, महावीर प्रतिष्ठानपासून राधास्वामी सत्संग व्यासकडे जाणाऱ्या रस्त्यावर डाव्या बाजूचा रस्ता. राधास्वामी सत्संग व्यासपासून डायस प्लॉट चौकाकडे जाणारा डाव्या बाजूचा रस्ता, खिलारे वस्ती व पी.ऍण्ड टी कॉलनी यांच्या सीमाभिंतीपर्यंतचा भाग तसेच उजव्या बाजूचा रस्ता, डायस प्लॉट चौक ते सेव्हन लव्हज चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील उजवीकडील भाग, डायस प्लॉट चौकाकडून लक्ष्मी नारायण चौकाकडे जाणारा रस्ता. गिरिधर भवन चौक ते डायस प्लॉट चौक या रस्त्याच्या उजव्या व डाव्या बाजूचा भाग. डायस प्लॉट चौक ते राधास्वामी सत्संग व्यास या दरम्यानचा रस्ता.
* कोंढवा पोलिस ठाणे : अशोका म्युज सोसायटी- आशीर्वाद चौक, मिठानगर- सत्यानंद हॉस्पिटल गल्ली- भैरोबा मंदिर पीएमटी बसस्टॉप ते संत गाडगे महाराज शाळा- साई मंदिर ब्रम्हा ऍव्हेन्यू सोसायटी- शालिमार सोसायटी- कुमार पृथ्वी, गंगाधाम रोड, मलिक नगर.
अशा होतील उपलब्ध जीवनावश्यक वस्तू
* दूध व दुग्धोत्पादन पदार्थ, किराणामाल, फळे व भाजीपाला पुरविणारी केंद्रे दिवसभरात सकाळी 10 ते दुपारी 2 या वेळेतच सुरू राहणार.
* जीवनावश्यक वस्तू व सेवा पुरविणाऱ्या ठिकाणी गर्दी टाळावी, सोशल डिस्टन्सींग पाळणे बंधनकारक
* आदेशाचे पालन न झाल्यास पोलिस दुकाने बंद करणार, नागरिकांना माघारी पाठविणार
* ग्राहकांना खरेदीसाठी उपलब्ध न झालेल्या कालावधीची भरपाई देण्याची आवश्यकतेनुसार होणार तजवीज
* बॅंकांनी केवळ आपली एटीएम केंद्र सुरू ठेवावीत
* खबरदारीचा उपाय म्हणून मास्क, हॅंडग्लोज व सॅनिटायझर यांचा वापर करणे आवश्यक
यांना असेल सवलत
आरोग्य विभाग, संरक्षण दल, दवाखाना, मेडिकल, रुग्णवाहिका, कोरोना प्रतिबंधक उपाययोजनाशी संबंधित पुणे महापालिका व शासकीय सेवेतील अधिकारी व कर्मचारी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी.
"" कोरोनाचे रुग्ण वाढल्याने फरासखाना, खडक, स्वारगेट व कोंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील काही विशिष्ट परिसरातील नागरिकांना 7 ते 14 एप्रिल या कालावधीमध्ये संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी ठराविक कालावधी दिला आहे. आदेशाचे उल्लंघन करून विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल.''
डॉ. रवींद्र शिसवे, पोलिस सहआयुक्त.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.