मंचर : ''आंबेगाव तालुक्यात कोरोना संसर्ग रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या सहा दिवसांत ६८४ व मंगळवारी (ता. ६) १६६ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. ही बाब चिंताजनक आहे. कोरोनाची साथ रोखण्यासाठी पोलिस व ग्रामपंचायतींनी कठोर भूमिका घ्यावी. गर्दी रोखण्याचे काम पोलिसांनी कार्यक्षमतेने करावे. यामध्ये हलगर्जीपणा झाल्यास ऐकून घेतले जाणार नाही,'' असा इशारा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला.
मंचर (ता. आंबेगाव) येथील अण्णासाहेब आवटे महाविद्यालयात ऑनलाइन पद्धतीने सर्वपक्षीय कार्यकर्ते व प्रशासनाच्या बैठकीत वळसे-पाटील मंत्रालयातून बोलत होते. यावेळी शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, विष्णू हिंगे, संतोष भोर, देविदास दरेकर, बाळासाहेब बेंडे, सुनील बाणखेले, किरण राजगुरू, प्राचार्य के. जी. कानडे आदी मान्यवर उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले, ''मंचर, अवसरी खुर्द, घोडेगाव या गावांवर प्रशासनाने अधिक लक्ष केंद्रित करावे.या गावांमध्ये कोरोना बाधितांचे प्रमाण अधिक आहे. भाजीपाला व फळ विक्री परिसरात गर्दी मोठ्या प्रमाणात होते. अनेकजण विनामास्क फिरतात. अनेकांचा नाकाच्या खालीच मास्क असतो. त्यांच्या फिरण्यावर निर्बंध लावावेत. गेली वर्षभर प्रशासनाने उत्कृष्ठ काम केले आहे. लसीकरणाच्या कामाला गती द्यावी. या कमी माझ्याकडून संपूर्ण सहकार्य मिळेल.''
देवेंद्र शहा म्हणाले, ''शासनामार्फत करार पद्धतीने नेमलेल्या डॉक्टरांना दिला जाणारा पगार कमी पडतो. त्यामुळे कोविड उपचार केंद्रात काम करण्यास डॉक्टर उत्सुक नसतात. त्यासाठी संबंधित डॉक्टरांना अतिरिक्त मानधन भीमाशंकर कारखाना व शरद बँकेमार्फत देण्याविषयी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केलेल्या सूचनेची कार्यवाही केली जाईल.''
सुरेशराव भोर यांनी मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या कामकाजाचे कौतुक केले. वारस नोंदी चुकीच्या पद्धतीने केल्या जातात. त्याचा मनस्ताप नागरिकांनाच सहन करावा लागतो. महसूल खात्याने तक्रारींचे तातडीने निवारण करावे. नागरिकांचे हेलपाटे टाळावेत. असे अरुण गिरे यांनी सांगितले. कोडीलकर म्हणाले, ''मार्च महिन्याच्या अखेरीस अनेक ठिकाणी सामाजिक कार्यक्रम झाले. त्यातूनच संसर्ग झाला आहे. कार्यकर्त्यांनी गर्दी रोखण्यासाठी व लसीकरण मोहिमेसाठी जनजागृती करावी.''
अवसरी खुर्द येथील कोविड उपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी दाखल झालेले अनेक रुग्ण बाहेर फिरण्यासाठी जातात. त्यातूनही संसर्गाचा धोका आहे.तेथे पोलिस बंदोबस्त ठेवावा. सोशल मिडीयावर जनजागृती करावी. आदी मागण्या करण्यात आल्या. देवदत्त निकम, वसंतराव भालेराव, राजाराम बाणखेले, राजू इनामदार, रवींद्र करंजखेले, डॉ. ताराचंद कराळे, जयसिंग एरंडे, अल्लू इनामदार, शीतल तोडकर आदींनी चर्चेत भाग घेतला.
तहसीलदार रामा जोशी, गटविकास अधिकारी जालिंदर पठारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.आंबादास देवमाने, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेश ढेकळे, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल लंबाते, पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पवार यांनी प्रशासनामार्फत राबविलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली.
कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला व दुसरा डोस झाल्यानंतरही कोरोना होतो. अशी चर्चा काही जणांकडून केली जात आहे. पण ज्यांनी दोन डोस घेतले व कोरोना झाला त्यांना अतिदक्षता विभागात न्यावे लागले नाही. ते लवकर बरे झाले आहेत. मृत्यूचा धोका नसतो. ही बाबही लक्षात आणून दिली पाहिजे. प्रत्येक गावात व वाड्या-वस्त्यांवर लसीकरणाबाबत प्रशासन व सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी जनजागृती करावी. रेमडीसीवर इंजेक्शन व अन्य आवश्यक साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून दिला जाईल.-दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री महाराष्ट्र राज्य.
(संपादन : सागर डी. शेलार)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.