पुणे - पावसाळा सुरू होणार असला तरी, मेट्रो प्रकल्पाच्या कामाच्या वेगात तो अडथळा आणू शकणार नाही, कारण त्यासाठीची तयारी महामेट्रोने पूर्ण केली आहे. पिंपरी स्वारगेट आणि वनाज- रामवाडी मेट्रो मार्ग आणि आणि स्थानकांसाठी 191 खांबांचे फाउंडेशन पूर्ण झाले असून, 51 खांब वर्षात उभे राहिले आहेत. त्यामुळे पिंपरीतील 20 टक्के आणि पुण्यातील 15 टक्के कामाचा टप्पा महामेट्रोने गाठला आहे. असाच धडाका राहिला, तर पुढील वर्षी नोव्हेंबरपर्यंत एका मार्गावरील काही अंतराची चाचणीही शक्य आहे. कारण, त्या वेळी विधानसभेच्या निवडणुका आहेत.
महापालिका निवडणुकीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबर 2016 रोजी मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. त्यानंतर निविदा प्रक्रिया पूर्ण गेल्यावर्षी जुलैमध्ये प्रत्यक्ष कामाला प्रारंभ झाला. सुरवातीला पिंपरी - स्वारगेट मार्गाचे, तर त्यानंतर वनाज- रामवाडी मार्गाचे काम सुरू झाले. या दोन्ही प्रकल्पांचे काम 2021 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. महामेट्रोने कोरेगाव पार्क, घोले रस्ता आणि फुगेवाडीमध्ये कार्यालय केले आहे. सुमारे 600 कर्मचारी तेथे सध्या काम करीत आहेत. पिंपरी-स्वारगेट मार्ग रेंजहिल्सपर्यंत एलिव्हेटेड, तर तेथून पुढे स्वारगेटपर्यंत भुयारी आहे, तर वनाज- रामवाडी मार्ग संपूर्णतः एलिव्हेटेड आहे. सध्या दोन्ही मार्गांच्या कामाने वेग पकडला आहे.
सध्याच्या टप्प्यात एलिव्हेटेड मेट्रोसाठी खांब उभारण्यात येत आहेत. एका खांबासाठी सुमारे अडीच मीटरचे फाउंडेशन केले जाते, तर 12 ते 20 मीटर सरासरी त्यांची उंची आहे.
पुढील महिन्यात पावसाळा सुरू होत आहे. त्यामुळे सध्या फाउंडेशन पूर्ण करण्यावर भर दिला आहे. बांधकामासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येत असल्यामुळे पावसाळ्यातही मार्गांचे आणि स्थानकांचे काम दैनंदिनरीत्या सुरू राहू शकते.
-ब्रिजेश दीक्षित, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो
प्रकल्पाचा एकूण खर्च 11 हजार 555 कोटी
20 टक्के काम पूर्ण
- पिंपरी-स्वारगेट मार्ग - एलिव्हेटेड आणि भुयारी - 16. 6 किलोमीटर
- स्थानके - पिंपरी चिंचवड, संत तुकारामनगर, भोसरी (नाशिक फाटा), कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी, खडकी, रेंजहिल्स.
- भुयारी स्थानके - शिवाजीनगर, शिवाजीनगर न्यायालय, मंडई, स्वारगेट.
- पहिला टप्पा - खराळवाडी- हॅरिस पूल दरम्यान - एकूण खांब 443 (353 मार्गांचे, 90 स्थानकांचे) - खांब पूर्ण झाले 31, फाउंडेशन पूर्ण 131, काम सुरू असलेले खांब 81
- या स्थानकांची कामे सुरू - संत तुकारामनगर, कासारवाडी, फुगेवाडी, दापोडी, बोपोडी.
15 टक्के काम पूर्ण
- वनाज-रामवाडी - एलिव्हेटेड - 15 किलोमीटर
- स्थानके - वनाज, आनंदनगर, आयडियल कॉलनी, नळस्टॉप, गरवारे कॉलेज, डेक्कन, संभाजी पार्क, महापालिका, आरटीओ, रेल्वे स्टेशन, रुबी हॉल क्लिनिक, बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर, रामवाडी.
- पहिला टप्पा - वनाज-संभाजी पार्क - एकूण खांब 325 (295 मार्गांचे, 30 स्थानकांचे) - खांब पूर्ण 6, फाउंडेशन पूर्ण 60, खांबांचे काम सुरू 21.
- या स्थानकांची कामे सुरू - वनाज, आयडियल कॉलनी, आनंदनगर
(क्रमशः)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.