किरकटवाडी: पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेल्या नांदोशी-सणसनगर या गावासाठी तयार केलेला विकास आराखडा पूर्णपणे बिल्डर धार्जिणा असून तो तयार करताना स्थानिक भौगोलिक परिस्थिती किंवा उपयुक्तता याचा विचार झालेला नाही. असा आरोप करत नागरिकांनी विकास आराखड्याला विरोध केला आहे. चुकीच्या पद्धतीने आरक्षणे टाकून केवळ बिल्डरांच्या जमिनींना फायदा होईल असा आराखडा तयार करण्यात आल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे.
नव्याने पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या गावांसाठी अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) ३० जुलै रोजी विकास आराखडा जाहीर केला. यावर नागरिकांच्या हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. नांदोशी- सणसनगर येथील नागरिकांनी या विकास आराखड्याला तीव्र विरोध केला आहे. जेथे सार्वजनिक मालकीची जागा शिल्लक आहे तेथे सर्व प्रकारच्या मुलभूत सुविधांसाठी आरक्षण टाकण्याऐवजी खाजगी जमीनींवर मोठ्या प्रमाणात आरक्षण टाकण्यात आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे विकास आराखडा तयार करताना शेकडो एकर शेतजमीन आणि त्यासाठी आवश्यक रस्ते याचा विचार झाला नसून बिल्डरांसाठी मात्र व्यवस्थित रस्त्यांची तजवीज करण्यात आली आहे, तसेच अधिकारी आणि बिल्डर यांनी मिळून हा स्थानिकांवर अन्याय करणारा विकास आराखडा तयार केल्याचाही आरोप नागरिकांनी केला आहे.
"एकाच गटावर चार प्रकारचे आरक्षण टाकण्यात आले आहे.तीन ठिकाणी स्मशानभूमी असताना आणखी जेथे लोक राहण्यास आहेत तेथे स्मशानभूमीचे आरक्षण टाकण्यात आले आहे.सुपीक जमीनीवर शाळा, खेळाचे मैदान, दवाखाना असे आरक्षण टाकण्यात आले आहे. शेती आणि शेतकऱ्यांचा अजिबात विचार झाला नाही. जे नैसर्गिक ओढे आहेत ते न दाखवता राहत्या घरांवरुन ओढे दाखवण्यात आले आहेत. रस्ते चूकीच्या पद्धतीने केवळ बिल्डरांच्या फायद्यासाठी टाकण्यात आले आहेत. शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध होईल याचा विचार विकास आराखडा तयार करताना केलेला नाही." - संदीप सणस, माजी सरपंच, नांदोशी-सणसनगर.
"ज्या शेतकऱ्यांना केवळ वीस गुंठे जमीन आहे त्यावरही आरक्षण टाकण्यात आले आहे. अशाने शेतकरी भूमीहीन तर होणार आहेच शिवाय उपजिवीकेचाही गंभीर प्रश्न निर्माण होणार आहे." -सतीश चौधरी, ग्रामस्थ, नांदोशी.
"प्रत्यक्ष भौगोलिक परिस्थिती न पाहता अंदाजे विकास आराखडा तयार करण्यात आल्याचे दिसत आहे. मुख्य गावठाणात वनीकरण झोन टाकण्यात आला आहे आहे आणि जिकडे बिल्डरांनी मोठ्या प्रमाणात जमीनी खरेदी केलेल्या आहेत तिकडे रहिवासी झोन टाकण्यात आला आहे. सर्व ग्रामस्थांचा या अन्यायकारक विकास आराखड्याला विरोध आहे." - राजाराम वाटाणे, सरपंच, नांदोशी- सणसनगर
नांदोशी-सणसनगर :
लोकसंख्या- ३०००
क्षेत्रफळ- ३२८ हेक्टर
सद्यस्थितीत- प्राथमिक शाळा दोन ( १ ली ते ४थी)
अंगणवाडी- दोन
प्राथमिक आरोग्य उपकेंद्र- बंद
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.