Garden Toys Sakal
पुणे

Pune News : उद्यानांवरील खर्च ठरला व्यर्थ! खेळणी, व्यायाम साहित्याचे उरले सांगाडे

पुणे शहरातील बहुतांश उद्यानांमधील तुटलेल्या, फुटलेल्या खेळण्यांवर खेळताना मुले जखमी होत आहेत. त्या खेळण्यांना अक्षरशः गंज चढला आहे.

पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे - ‘सारसबागेतील बंद कारंजे, खराब झालेले फलक, अस्वच्छता, झाडाझुडपांत दडलेले क्रांतिकारकांचे स्मृतिशिल्प, खाद्यपदार्थ विक्रेत्यांच्या गर्दीचा नागरिकांना होणारा त्रास, अशा समस्या महापालिकेच्या अधिकाऱ्यांपुढे अनेक महिन्यांपासून मांडत आहे. पण ते एकही समस्या सोडवत नाहीत...’ खासगी कंपनीत काम करणारा तरुण सारसबागेतील समस्या पोटतिडकीने मांडत होता.

शहरातील बहुतांश उद्यानांमधील तुटलेल्या, फुटलेल्या खेळण्यांवर खेळताना मुले जखमी होत आहेत. त्या खेळण्यांना अक्षरशः गंज चढला आहे. आदित्यप्रमाणे अनेक नागरिक महापालिकेच्या अधिकाऱ्यांपुढे समस्या मांडताहेत, अधिकाऱ्यांना पाझर फुटत नाही.

तर याच उद्यानांवर मागील चार वर्षांत ३० कोटी ६३ लाख रुपये, तर यंदा प्रशासकराजवटीत १० महिन्यांत विक्रमी साडेनऊ कोटी रुपये केवळ देखभाल दुरुस्तीवर उडविले आहेत. परंतु, प्रत्यक्षात, उद्याने, त्यातील खेळणी व साहित्याचे अक्षरशः सांगाडेच उरले आहेत.

अशी आहे स्थिती

शहरातील मध्यवर्ती भागातील सारसबाग, छत्रपती संभाजी उद्यान, पु. ल. देशपांडे उद्यान, वर्तक बाग, कमला नेहरू पार्क व उपनगरांमधील काही मोजकी उद्याने वगळता, बहुतांश उद्यानांची अवस्था दयनीय आहे. पेशवे ऊर्जा पार्कमधील साहसी खेळण्यांना गंज चढला आहे, काही खेळणी खराब झाली आहेत. बहुतांश खेळण्यांवर पक्ष्यांनी घाण केलेली असून त्यामुळे मुलांना आजार होण्याची भीती आहे.

स्वच्छतेकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. सारसबागेत स्वच्छता आहे, मात्र मुलांची खेळणी, व्यायामाचे साहित्य तुटक्‍या-फुटक्‍या अवस्थेत आहेत. ‘हिरकणी कक्ष’ कुलूपबंद आहे, तर शुद्ध पाण्याची यंत्रणा धूळखात पडलेली आहे. लहान मुलांचे आकर्षण असणाऱ्या श्री सिद्धिविनायक मंदिराभोवतीच्या तळ्यातील विद्युत कारंजे तांत्रिक कारणांमुळे अनेक महिने बंद आहे.

क्रांतिकारकांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेले ‘स्वातंत्र्य लक्ष्मी की जय’ शिल्पाभोवती गवत, झुडपे वाढली असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. भटक्‍या कुत्र्यांचे कळप उद्यानात सर्रासपणे फिरताना दिसतात.

खाद्यपदार्थ विक्रेते, टवाळखोरांचा उद्यानातील वावर वाढला असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरातील बहुतांश उद्यानांमधील खेळणी, साहसी खेळणी तुटक्‍या, फुटक्‍या अवस्थेत आहेत. तर अनेक उद्यानांमध्ये खेळण्याचे केवळ सांगाडे उरले आहेत. अशी खराब खेळणी व त्याभोवती माती, वाळू नसल्याने मुले खेळताना जखमी होण्याच्याही घटना घडत आहेत. वर्षानुवर्षे खेळण्यांची देखभाल-दुरुस्ती, रंगरंगोटी केली जात नाही.

उद्यानातील कचरा पेट्यांमधील कचरा कित्येक महिने उचलला जात नाही. नळकोंडाळी, स्वच्छतागृहांमधील अस्वच्छता कायम आहे. पावसाळ्यात वाढलेली झाडेझुडपे, गवतही काढले जात नाही. उद्यानांमधील खत प्रकल्प नावापुरताच उरला असून पालापाचोळा, झाडाच्या फांद्या उद्यानांमध्येच पडल्याचे चित्र ‘सकाळ’ने केलेल्या पाहणीत दिसले. वाहनतळांच्या अभावामुळे नागरिकांची गैरसोय होत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.

तक्रारीकडे दुर्लक्षच

उद्यानांच्या दुरवस्थेबाबत, गैरसोयीबाबत नागरिक पूर्वी स्थानिक नगरसेवकांकडे तक्रारी करत होते. मात्र मागील अडीच वर्षांपासून लोकप्रतिनिधी नसल्याने नागरिक सुरक्षारक्षक, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्त्यांमार्फत किंवा ‘पीएमसी केअर’द्वारे ऑनलाइन तक्रार नोंदवितात. मात्र वारंवार तक्रारी करूनही अधिकाऱ्यांकडून त्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे नागरिकांचे अनुभव आहेत. राजकीय व्यक्ती, वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनंतर संबंधित प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न होतो.

नवीन उद्यानांची कामे सुरूच

महापालिकेकडून हडपसरमधील काळेपडळ, सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल, विमाननगर व अन्य भागात सहा ते सात नवीन उद्याने बनविण्याचे काम सुरू आहे. त्यातील काही उद्यानांची कामे अनेक वर्षांपासून सुरू आहेत. मात्र संबंधित कामे अद्यापही संपण्याची स्थिती नाही. तर केशवनगर, मुंढवा व अन्य परिसरामध्ये नागरिक वाढत आहे, मात्र तेथे अजूनही उद्यानांचा अभाव आहे.

सारसबागेतील प्रश्‍नांबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करत आहे. परंतु, त्यांच्याकडून केवळ टोलवाटोलवी केली जात आहे. छोट्या छोट्या स्वरूपाचे प्रश्‍न सोडविण्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. अनेकदा समस्यांबाबत पत्र पाठवूनही अधिकारी दखल घेत नाहीत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत.

- आदित्य गायकवाड, नोकरदार

असा केला खर्च

  • २०१८- १९ आठ कोटी ६० लाख ८० हजार २९५

  • २०१९-२० सात कोटी १९ लाख ७३ हजार ३९५

  • २०२०-२१ सात कोटी ४२ लाख ८२ हजार ८७२

  • २०२१ -२२ सात कोटी ४२ लाख ८७ हजार ७०३

  • २०२२-२३ नऊ कोटी ४९ लाख ३८ हजार ८९२

आकडे बोलतात

  • २११ - शहरातील एकूण उद्याने

  • ०७ - कामे सुरू असलेली नवीन उद्याने

  • ६५० एकर - उद्यानांचे एकूण क्षेत्रफळ

  • एक ते दीड लाख - रोज भेट देणारे नागरिक (सुमारे)

  • ३५० - महापालिका कर्मचारी संख्या

  • ७०० - उद्यानांमधील सुरक्षारक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT