पुणे - शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणातील पाणीसाठा उन्हाळ्यात कमी झाल्याने बांधकामासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली होती. मात्र, पावसाळ्यात धरण भरल्यानंतर महापालिका प्रशासनाला या आदेशाचा विसर पडलेला दिसत आहे. त्यामुळे बांधकाम क्षेत्रातून पुन्हा एकदा सांडपाणी प्रकल्पातील टँकरच्या पाण्याची मागणी कमी झाली असून पिण्याच्या पाण्याचा वापर वाढल्याचे चित्र आहे.
यंदा पाऊस कमी झाल्याने खडकवासला धरण प्रकल्पात ९२ टक्के पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी आजच्या दिवशी ९८ टक्के पाणीसाठा होता. यंदा पाणीसाठा कमी असल्याने शहरातील पिण्याच्या पाण्याच्या नियोजनासह ग्रामीण भागात सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.
धरणातील पाणीसाठ्याचा काळजीपूर्वक वापर करणे आवश्यक आहे. या संदर्भात पालकमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत पाणी कपात होणार नसली तरी पाणीसाठ्याचा काळजीपूर्वक वापर करण्याचा महापालिकेला आदेश दिला आहे.
यंदा मान्सूनच्या वाटचालीत अल निनोचा प्रभाव असल्यामुळे पाऊस कमी पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यामुळे महापालिकेने पाणी वापर कमी करण्यास सुरुवात केली. त्यासाठी आयुक्तांनी मार्च महिन्यातच बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्यावर नियंत्रण आणण्याच्या सूचना प्रशासनाला दिलेल्या होत्या.
शहरात महापालिकेचे नऊ सांडपाणी प्रकल्प आहेत, तेथे प्रक्रिया केलेले पाणीच बांधकामासाठी वापरावे, असा आदेश काढला होता. त्याकडे बांधकाम व्यावसायिकांनी दुर्लक्ष केल्याने शहरातील सर्व बांधकाम प्रकल्पांची माहिती एकत्र करून प्रत्येक उपअभियंत्याकडून साइटची तपासणी करण्यात आली.
बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष
शहराच्या कोणत्या भागात कुठे बांधकाम सुरू आहे, याची पूर्ण माहिती बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता, उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना असते. तेथे महापालिकेच्या सांडपाणी प्रकल्पातून टँकरने पाणीपुरवठा होत नाही हे त्यांच्या लगेच निदर्शनास येऊ शकते. मात्र बांधकाम विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
दररोज केवळ २० टँकरची मागणी
पाहणीनंतर प्रशासनाने कठोर पावले उचलल्यानंतर मात्र बांधकाम व्यावसायिकांनी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पातून टँकर मागून बांधकामांसाठी त्याचा वापर सुरू केला होता. त्यामुळे मे, जून महिन्यामध्ये टँकरला मोठी मागणी निर्माण होऊन रोज सुमारे ८० टँकरची मागणी अॅपवर नोंदवली जात होती. मात्र सध्या बांधकाम व्यावसायिकांकडून टँकरची मागणी घटलेली आहे. दिवसाला केवळ पंधरा ते वीसच टँकर मागविले जात आहेत.
धरणात पाणीसाठा असला तरीही पाण्याचा वापर काटकसरीने करणे आवश्यक आहे. त्यामुळे बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरणाऱ्या व्यावसायिकांवर नियंत्रण ठेवले जाईल. याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जातील.
- अनिरुद्ध पावसकर, पाणीपुरवठा विभागप्रमुख, महापालिका
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.