पुणे : "मागच्या वर्षी सकाळी दहा वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत 8 घरी काम करायचे. त्यावेळच्या लॉकडाऊनमध्ये 3 कामे गेली, ती पुन्हा मिळाली नाहीत. कालपासूनच्या बंदीमुळे सायंकाळची स्वयंपाकाची दोन कामे जाण्याच्या मार्गावर आहेत. घरची जबाबदारी माझ्यावर आहे. एकतर महागाई जगू देत नव्हती, त्यात आता कोरोना पोट भरू देईना, गरीबांनी जगायचं तरी कसे ? हा प्रश्न घरकाम करणाऱ्या लक्ष्मीबाई कामोठे यांनी उपस्थित केला. एकीकडे शहराभोवतीचा कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस घट्ट होत असताना, दुसरीकडे भाकरीत चंद्र शोधणाऱ्या गोरगरीब, कष्टकऱ्यांना मात्र तोंडचा घास हिरावला जाण्याची भिती व्यक्त होऊ लागली आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने शनिवारी सायंकाळपासून रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. त्यातच हॉटेल्स, चित्रपटगृहे व अन्य क्षेत्रांसह पीएमपीएलसारखी सार्वजनिक वाहतुक व्यवस्थाही बंद ठेवली आहे. या घटनांचा सर्वाधिक परिणाम हातावर पोट असणाऱ्या गरीब, कष्टकऱ्यांवर होऊ लागला आहे. बहुतांश घरेलु कामगार, बांधकाम मजूर, कामगार व अन्य कष्टकऱ्यांकडे स्वतःची वाहने नसल्याने त्यांच्याकडून पीएमपीएल बसचा वापर केला जातो. नव्या नियमांनुसार, बससेवा बंद असल्याने घरकाम करणाऱ्या महिला, मजूर, कामगारांना कामाच्या ठिकाणी जाणे अवघड झाले आहे. तसेच रात्री 8 ते 9 वाजेपर्यंतची कामेही सुटण्याच्या मार्गावर असल्याची सद्यस्थिती आहे.
घरकाम करणाऱ्या सविता केंजळे म्हणाल्या, ""बसने प्रवास करून मला दिवसा व रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत कामे करणे शक्य होते. पण आता बस बंद आहेत, त्यामुळे घराजवळची कामे वगळता, इतर ठिकाणी जाता येत नाही. सहा ते 8 पर्यंतची कामे तर सोडावी लागली आहेत. गॅस, भाजीपाला, धान्य विकत घेताना जीव मेटाकुटीला येतो. आता या बंदीमुळे हातची कामे जाऊ लागली. त्यामुळे संसार चालवायचा तरी कसा, असा प्रश्न पडतो.''
"कोरोना रुग्ण वाढत आहेत हि चिंतेची बाब आहे. त्यामुळे घातलेले निर्बंधही ठिक आहेत. पण पीएमपी बस नसल्यामुळे घरकाम करणाऱ्या महिला, मजुरांना कामावर जाता येत नाही, रात्री घरी परतण्याची सोय नसल्यामुळे भिती आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी सुरक्षित वाहतुक व्यवस्था असली पाहीजे.''
- किरण मोघे, अध्यक्ष, पुणे जिल्हा घरकाम संघटना.
""मागच्या लॉकडाऊनमुळे घरकाम करणाऱ्या महिलांचे 20 टक्के कामे गेली. नव्या निर्बंधामुळे मोलकरणींच्या केवळ कामांच्या वेळेचे चक्रच बदलले नाही, तर 5 टक्के कामे जाण्याचीही भिती निर्माण झाली आहे. बस बंद असल्याने रिक्षावाले जादा पैसे घेतात, तरीही जीवाला धोका पत्करून महिला कामाच्या ठिकाणी पोचतात. मात्र मास्क घालून धुणीभांडी, झाडलोट, फरशी पुसण्यासाठी मेहनतीची कामे करणे अवघड होते. एकूणच कष्टकऱ्यांची सगळीकडूनच कोंडी होत असल्याची सद्यस्थिती आहे.''
- मेधा थत्ते, सचिव, पुणे शहर मोलकरीण संघटना.
- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
(Edited by: Ashish N. Kadam)
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.