पुणे - मोबाईल काढून घेत त्यातील मालिका बंद केल्याने अल्पवयीन मुलाने आईवर कात्रीने वार करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मुलाने घरातील खिडकीच्या काचा फोडून आईला मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (ता. १४) रात्री धनकवडी भागात घडली.
या प्रकरणी आईने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यामुळे अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला या धनकवडी भागात राहायला आहे. मुलगा १४ वर्षांचा असून ते आत्ता सातवीत शिकत आहे. सोमवारी फिर्यादी आणि त्यांचा मुलगा मोबाईलमध्ये युट्युबवर एक मराठी मालिका पाहत होते. बराच वेळ दोघेही मालिक पाहात असल्याने फिर्यादी यांनी मुलाकडून मोबाईल घेत मालिका बंद केली.
मोबाईल हिसकावून घेतल्याने मुलगा आईवर चिडला. त्याने थेट आईला मारहाण करण्यास सुरुवात केली. घरातील लाकडी फ्रेम फोडली, तसेच कात्रीने आईवर वार करण्याचा प्रयत्न केला. आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून घरातील खिडकीच्या काचा फोडल्या. त्यामुळे घाबरलेल्या आईने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार मानसिंग जाधव या गुन्ह्याचा तपास करत आहेत.
दोन वर्षांपासून सुरू आहे मुलाची चिडचिड -
कोरोनाकाळात लागू झालेल्या लॉकडाऊनमुळे मुलाची शाळा ऑनलाईन पद्धतीने सुरू होती. त्यामुळे तेव्हापासून मुलगा दिवसभरात बराच वेळ मोबाईलचा वापर करत. गेल्या दोन वर्षांपासून त्याचा मोबाईलचा वापर जास्त वाढला होता. त्यामुळे मुलगा जास्त वेळ मोबाईल घेऊन बसला तर आई मोबाईल काढून घेत. मोबाईल घेतल्यास तो आरडाओरडा, चिडचिड आणि प्रसंगी आईवर धावून जाण्याचा प्रकार करत. गेल्या दोन वर्षांत हे प्रकार वाढले आहेत. मोबाईलवर तो गेम खेळत, युट्युबवर विविध रिल्स आणि व्हिडिओ पाहात अशी माहिती पोलिसांनी दिली.
मुलाची निरिक्षण गृहात रवानगी -
मोबाईलचा अतिवापर करत असल्याने मुलाची चिडचिड आणि मोबाईल न दिल्यास कुटुंबीयांना त्रास देणे वाढले आहे. त्यामुळे त्याच्या वागणुकीत सुधार होण्यासाठी तसेच तज्ज्ञांच्यामार्फत त्याचे समुपदेशन करण्यासाठी मुलाची निरीक्षण गृहात रवानगी करण्यात आली आहे. त्यात योग्य ती सुधारणा होईपर्यंत त्याला निरीक्षणगृहात ठेवले जाणार आहे, अशी माहिती जाधव यांनी दिली.
लहानपणापासून सर्व मनाप्रमाणे झाल्यास मुलांना नकार किंवा त्यांना हव्या असलेल्या वस्तू मिळाल्या नाहीत तर तो नकार ते पचवू शकत नसतात. त्यांची कोणाचेही ऐकून घेण्याची किंवा अपयश पचविण्याची मानसिकता कमी झाली आहे. त्यातून त्याच्या मनावर तणाव देखील निर्माण होतो. तर बऱ्याचदा पालक वेळ देवू शकत नाही म्हणून मुलांना विविध वस्तू दिल्या जातात. त्या वस्तू त्यांना हव्या तशा वापरू दिल्या नाहीत की मुलांची चिडचिड होते. अशा प्रकारांना प्रत्येकवेळी पालकच जबाबदार असतात असे नाही. काही मुले हट्टी किंवा तापट असू असू शकतात. असे प्रकार टाळण्यासाठी मुल आणि पालक यांच्यातील संवाद आवश्यक आहे.
- डॉ. अर्चना जावडेकर, मनोविकार तज्ज्ञ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.