कळस : गुलाबी थंडीची चाहूल सुरू झालेली असताना आता जिल्ह्यातील विविध पाणवठ्यांवर पाणबदकांचे वास्तव्य आढळून येवू लागले आहे. जिल्ह्यातील खडकवासला धरण, पाषाण तलाव, कात्रज तलाव, येरवड्याचे मुळा -मूठा नदी पात्र, कवडीपाट, पाटस तलाव, वीर धरण, इंदापूर तालुक्यातील भादलवाडी तलाव व उजनी जलाशयावर गेल्या काही दिवसांपासून पाणबदकांची संख्या वाढू लागली आहे.
थंड प्रदेशाकडून उष्ण प्रदेशाकडे वाटचाल करीत हे पाणबदक मोठ्या संख्येने या जलाशयांवर दाखल झाले आहेत. या बदकांच्या हालचाली टिपण्यासाठी शहरातील पक्षी अभ्यासक व छायाचित्रकारांची पावले या पाणवठ्यांकडे वळू लागली आहेत.
जिल्ह्यातील विविध जलाशयांवर पट्टकादंब, सुरूची, चक्रवाक, हळदी कुंकू, चक्रांग, ब्राम्हणी बदक, थापट्या, भिवई, शेंडी बदक, सर्जा, अडई आदी सुमारे १३ ते १४ प्रजातीचे पाणबदक पाहावयास मिळत आहेत. दरवर्षी सप्टेंबरनंतर याठिकाणी कमी-जास्त प्रमाणात हे पक्षी हजेरी लावतात. पर्वतमार्गे किंवा समुद्रमार्गे स्थलांतर करत हे पक्षी येथे आलेले असतात. या पक्षांचा मार्च ते एप्रिलपर्यंत येथे मुक्काम असतो. या काळात मुबलक मिळणाऱ्या खाद्यान्नावर ताव मारुन शरीरात भरपूर उर्जा साठवतात.
पक्षी निरीक्षक दत्तात्रय लांघी यांनी गेल्या काही वर्षांपासून या पक्षांचे निरीक्षण नोंदवले आहे. याबाबत माहिती देताना ते म्हणाले, जिल्ह्यातील पाणथळ भागात सुमारे १४ प्रजातींचे पाणबदक शेकडो किंवा हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावतात. काही पाणबदक परेदशातून आलेले असतात. तर काही बदक स्थानिक स्थलांतरीत बदक म्हणून ओळखले जातात. यामध्ये उजनी व वीर धरणाच्या परिसरात पट्ट कादंब, सुरूची, चक्रवाक या प्रजातीचे पाणबदक आढळतात.
तर खडकवासला धरण परिसरात काणूक बदक, लालचारी, वैष्णव व शेंडीबदक आढळून येतात. पाषाण तलावावर मराल (अडई), नकटे बदक आढळतात. कवडीपाठमध्ये चक्रांग, थापट्या, धनवार व मलीन बदक आढळून येतात. हळदी-कुंकू, चक्रवाक हे बदक येथे सर्रासपणे आढळून येतात. येथील वातावरण या बदकांच्या विणीच्या हंगामासाठी पोषक बनू लागल्याने हळदी-कुंकू बदक येथे विणीचा हंगाम उरकत असल्याचेही आढळून आले आहे. पुण्यातील सारसबागेतील एका सुरक्षित ठिकाणी या बदकाच्या जोडीने सुमारे १३ पिलांना जन्म दिल्याचे आढळून आले होते.
परंतू स्थलांतर करून येत असलेल्या या बदकांसाठी पाणथळ ठिकाणे जोपासण्याची गरज आहे. सध्या उजनीतील रसायनमिश्रीत पाण्यामुळे येथे आलेल्या बदकांना खाद्यान्न मिळणे कठीण झाले आहे. तर जिल्ह्यातील पाषाण तलाव, खडकवासला धरण, जांभूळवाडी तलाव, येरवडा नदीकाठच्या भागात सुशोभीकरणामुळे या बदकांच्या खाद्यान्नावर गदा आली आहे. काही ठिकाणी या बदकांची मांसाहारासाठी शिकारही केली जाते. शहरातील राडारोडा, प्लास्टिक व काचेच्या बाटल्यांचा जलाशयावरील थर पक्षांना खाद्यान्न मिळण्यास अडचणीचा ठरत आहे. यावर शासन व वन विभागाने नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.