पुणे : कोरोना बाधित रुग्णांसाठी शहरातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय मैदान (सीओईपी) येथील जम्बो हॉस्पिटलच्या कामाला सोमवार (ता.३)पासून सुरुवात झाली असून, या जम्बो हॉस्पिटलमध्ये आठशे बेड्स उपलब्ध होणार आहेत. एका जम्बो हॉस्पिटलच्या बांधकाम, वैद्यकीय सुविधा, मनुष्यबळ आणि पुढील सहा महिन्यांतील वैद्यकीय उपचार असे सुमारे 70 ते 80 कोटी रुपये खर्च होणार आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाधिकारी नवल किशोर राम, महापालिका आयुक्त विक्रम कुमार आणि पिंपरी-चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर या वेळी उपस्थित होते.
राव म्हणाले, जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांसाठी बेड्सची क्षमता वाढविण्यावर भर देण्यात येत आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात तीन जम्बो हॉस्पिटल उभारण्यात येत आहेत. पुणे शहरातील सीओईपी येथील जम्बो हॉस्पिटल 20 ऑगस्टपर्यंत कार्यरत होईल. या जम्बो हॉस्पिटलमध्ये आठशे बेड्स उपलब्ध होणार असून, त्यामध्ये सहाशे ऑक्सिजन बेड्स आणि दोनशे आयसीयू (60 वेंटिलेटर) बेड्स उपलब्ध असतील. पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून दहा ऑगस्टपर्यंत स्वनिधीतून बेड्स उपलब्ध करण्यात येत आहेत. सर्व रुग्णालयांनी डॅशबोर्डवर उपलब्ध बेड्सबाबत माहिती अद्ययावत करावी. जादा शुल्क आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
शहरात मृत्युदर दुपटीने वाढण्याचा दर 22 दिवसांवर आला आहे. राज्यात सर्वाधिक चाचण्या पुणे जिल्ह्यात करण्यात येत आहेत. पुणे महापालिका हद्दीतील मृत्युदर 2.37 टक्के, तर पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील मृत्युदर 1.70 टक्के इतका आहे, असे राव यांनी सांगितले.
मृत्यूबाबत माहिती लपवली नाही : जिल्हाधिकारी
जिल्ह्यात कोरोनाच्या संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत प्रशासनाकडून कोणतीही माहिती लपविण्याचा प्रयत्न केला जात नाही. ज्याप्रकारे मृत्यूच्या आकड्यांबाबत चर्चा करण्यात येत आहे, तशी भयावह स्थिती नाही. प्राथमिक अहवालानुसार ससून रुग्णालयात गतवर्षीच्या जुलै महिन्याच्या तुलनेत यावर्षी मृत्यूचे प्रमाण कमी असल्याची माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
जिल्हाधिकारी राम म्हणाले, ग्रामीण भागात वाढती लोकसंख्या ही चिंतेची बाब असून, जिल्ह्यात तालुकास्तरावर जादा बेड्स उपलब्ध करून देण्यात येत आहे. तसेच, प्रत्येक तालुक्यात खासगी डॉक्टरांकडून मानधन तत्वावर सेवा घेण्यात येणार आहे. ग्रामीण भागात ॲटींजेन टेस्ट वाढविण्यात आल्या आहेत. शिक्रापूर येथे रुग्णवाहिकेत तीन दिवसांपासून मृतदेह पडून होता. याबाबत उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत चौकशी करण्यात येत असून, अहवाल प्राप्त होताच दोषी व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.
दुकानांबाबत पी वन पी टू निर्णयावर महापालिका ठाम :
व्यापाऱ्यांसाठी दुकानांबाबतचा पी वन पी टूचा निर्णय राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार कायम ठेवण्यात येईल. मात्र, मुंबई महापालिकेने हा निर्णय रद्द केला असल्यास, त्याचा अभ्यास करून पुणे शहराबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली.
प्लाझ्मा युनिट उपलब्ध :
सध्या जिल्ह्यात 41 प्लाझ्मा युनिट उपलब्ध आहेत. याबाबत पोर्टलवर स्वतंत्रपणे माहिती उपलब्ध आहे. पाच रुग्णांना प्लाझ्मा उपचार करण्यात आला असून, त्यापैकी चार रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर एका रुग्णावर उपचार सुरु आहे.
गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची स्वयंसेवक म्हणून मदत घेण्यात येणार आहे. फळ, भाजी विक्रेते आणि हॉकर्स यांच्या तपासणीवर भर देण्यात येत असून, पॉझिटिव रुग्णांच्या विलगीकरणावर भर देण्यात येत आहे, असे यावेळी सांगण्यात आले.
कोविड रुग्णांसाठी बेड्सची सध्याची क्षमता (कंसात 1 ऑगस्टपर्यंतची स्थिती)
- ससून रुग्णालय - 446 (850)
- दळवी हॉस्पिटल - 55 (150)
- औंध रुग्णालय - 50 (90)
- डी. वाय. पाटील रुग्णालय - 300 (500)
- वायसीएम रुग्णालय पूर्णतः कोविड रुग्णालय.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
(Edited by : Ashish N. Kadam)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.