पुणे: नागरी सहकारी बँका, जिल्हा बँका आणि पतसंस्थांनी उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न करणे ही काळाची गरज बनली आहे. सध्याच्या काळात हे उत्पन्न वाढविण्यासाठी नागरी सहकारी बँका आणि पतसंस्थांनी कमी व्याजदरांच्या ठेवींमध्ये (कासा फंड) वाढ केली पाहिजे, असा सूर नागरी सहकारी बँकाच्या चर्चासत्रातून रविवारी (ता. ०३) येथे उमटला.
'सकाळ माध्यम समूहा'च्या वतीने आयोजित सहकार महापरिषदेतील चर्चासत्रात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पीडीसीसी) अध्यक्ष रमेश थोरात, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष आमदार छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, नगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष उदय शेळके, महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशचे अध्यक्ष काका कोयटे, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे विभागीय व्यवस्थापक सुशिल जाधव यांनी सहभाग घेतला. तर, बीड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे प्रशासक प्रमोद कर्नाड यांनी या चर्चासत्राचे सूत्रसंचालन केले.
थोरात म्हणाले, 'पुणे जिल्हा बँकेने याआधी तीन लाखांपर्यंत शून्य टक्के व्याजदाराने कर्जवाटप केले. त्यात आता आणखी दोन लाखांची वाढ करून ही मदत आता पाच लाख केली आहे. परंतु कर्जवाटपात जिल्हा केडर बंद केल्याचा मुद्दा अडचणीचा ठरत आहे. त्यामुळे जिल्हा बँकाचे कामकाज सुरळित होण्यासाठी पूर्वीप्रमाणे जिल्हा केडर पद्धत चालू केली पाहिजे.' आमदार शिवेंद्रराजे म्हणाले, 'जिल्हा बँकावर रिझर्व्ह बँकेचे अनेक निर्बंध आहेत. या निर्बंधामुळे जिल्हा बँकांच्या सर्व योजनांच्या अंमलबजावणीवर मर्यादा आलेल्या आहेत. या मर्यादा दूर होण्याची गरज आहे.'
शेळके म्हणाले, 'राज्य सहकारी बँकेपेक्षा नगर जिल्हा बँकेच्या कमी व्याजदराच्या ठेवींची संख्या जास्त आहे. सध्या नगर बँकेच्या कमी व्याजदराच्या ठेवींची रक्कम ४२टक्के एवढी आहे. हीच रक्कम राज्य बँकेची २२टक्के आहे. आम्ही जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहचून सुविधा देतो. तसेच, म्युचुअल फंडात मोठ्या प्रमाणांवर बँकेने गुंतवणूक केलेली आहे.'
कोयटे म्हणाले, 'आज भाग्याचा दिवस आहे. कारण, राज्यातील महत्वाच्या बँका आणि पतसंस्था एका व्यासपीठावर आल्या आहेत. जिल्हा बँकेचा ठेवीदार म्हणून पतसंस्थेकडे पाहिले जाते. परंतु, कोविड काळात पतसंस्था अडचणीत आल्या. त्यावेळी जिल्हा बँकाकडून पतसंस्थाना दिलासा मिळाला नाही, तो मिळण्याची गरज आहे. 'जाधव म्हणाले, 'पतसंस्थाचा अर्थिक स्तर सुधारण्यासाठी जिल्हा बँकानी पुढाकार घ्यायला हवा. तसेच, लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीला एक स्वयंसिस्त असून विमा क्षेत्रासह इतर क्षेत्रात मोठे काम असल्याने लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटी फायद्यात आहे'
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.