भारत आणि आफ्रिकेच्या संयुक्त लष्करी सरावाच्या 'एएफइंडेक्स २०२३' अनुषंगाने आयोजित केलेल्या भारत-आफ्रिका लष्कर प्रमुखांच्या परिषदेच्या पहिल्या आवृत्तीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह बोलत होते.
पुणे - भारत आफ्रिकी राष्ट्रांसोबत काम करत प्रादेशिक सुरक्षा, स्थिरता आणि संरक्षण क्षमतांना वाढविण्यावर भर देईल. गरिबी निर्मूलन, शाश्वत विकास साध्य करणे, शांतता आणि सौहार्दाला चालना देणे आणि लोकांचे जीवनमान सुधारणे या समान उद्दिष्टांवर एकजूट आहोत. असे मत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले.
भारत आणि आफ्रिकेच्या संयुक्त लष्करी सरावाच्या 'एएफइंडेक्स २०२३' अनुषंगाने आयोजित केलेल्या भारत-आफ्रिका लष्कर प्रमुखांच्या परिषदेच्या पहिल्या आवृत्तीत ते बोलत होते. या परिषदेला लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे आणि ३१ आफ्रिकी राष्ट्रांचे प्रमुख आणि प्रतिनिधी तसेच इतर नागरी आणि संरक्षण क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
सिंह म्हणाले, 'जेव्हा देशाची सुरक्षा सुनिश्चित केली जाते तेव्हाच देशाच्या प्रगतीची पूर्ण क्षमता साकारता येते. विकसनशील देशांच्या आकांक्षांना अधिक प्रतिसाद देणारी खऱ्या अर्थाने बहु-ध्रुवीय जागतिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी ही भागीदारी महत्त्वाची भूमिका बजावेल. २१ व्या शतकातील सुरक्षा आव्हानांना तोंड देण्यासाठी आफ्रिकी राष्ट्रांच्या सशस्त्र दलांना प्रशिक्षण देण्यात आणि त्यांना आवश्यक कौशल्याने सुसज्ज करण्यात भारत आघाडीवर आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये बंडखोरीविरोधी कारवाया, शांतता राखणे, सागरी सुरक्षा, सायबर सुरक्षा आणि ड्रोन कारवाया यांसारख्या नवीन डोमेनमधील विशेष प्रशिक्षण प्रशिक्षणासह विविध क्षेत्रांचा समावेश आहे. तसेच आपत्ती व्यवस्थापन, मानवतावादी मदत आणि वैद्यकीय सहाय्य यासारख्या क्षेत्रांमध्ये नागरिकांना प्रशिक्षण आदींचा ही यात समावेश आहे.'
आफ्रिकी देशांच्या सशस्त्र दलाचे जवान वेगवेगळ्या क्षेत्रात प्रशिक्षणासाठी भारतात येत असतात. भारत आणि आफ्रिकी राष्ट्रांमधील संयुक्त सराव सशस्त्र दलांना एकमेकांचे कौशल्य आत्मसात करणे व संरक्षण कार्यक्षमतेला प्रोत्साहन देण्याची उत्कृष्ट संधी प्रदान करते. प्रादेशिक शांतता आणि समृद्धीसाठी हिंद महासागराने जोडलेले सागरी शेजारी म्हणून, सागरी सुरक्षा, जलविज्ञान, दहशतवाद आणि दहशतवाद विरोध कारवाईमध्ये भारत आफ्रिकी देशांना सहकार्य करत राहील. असेही त्यांनी सांगितले.
भारत-आफ्रिका लष्कर प्रमुखांची परिषदेची रचना 'आफ्रिका-इंडिया मिलिटरीज फॉर रीजनल युनिटी' (अमृत) या तत्त्वावर करण्यात आली होती. प्रादेशिक सहकार्य यंत्रणेचा एक भाग म्हणून भारत आणि आफ्रिकन राष्ट्रांच्या सैन्यांमधील समन्वय मजबूत करणे आणि सुधारणे हे त्याचे उद्दिष्ट होते. संरक्षण क्षमतांना वाढविण्या बरोबर भारतीय संरक्षण उद्योगांना चालना देणे हा ही याचा एक भाग होता.
राजनाथ सिंह म्हणाले....
- आफ्रिकी भागीदार देशांना त्यांच्या सशस्त्र दलाच्या क्षमता वाढविण्यासह त्यांची आर्थिक वाढ व सामाजिक विकास सुनिश्चित करण्यासाठी संरक्षण संबंधित सर्व बाबींमध्ये भारताचा पाठिंबा असेल.
- भारतच्या डिजिटल, स्वच्छ आणि हरित तंत्रज्ञानामधील कौशल्याचा फायदा आफ्रिकी देशांना होईल
- संरक्षण विषयक गरज भागवण्यासाठी आफ्रिकी देशांनी भारतीय बनावटीचे लष्करी साहित्य आणि तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकेल
- स्वातंत्र्यानंतर लांबचा पल्ला गाठला असला तरी, असे अनेक आफ्रिकन देश आहेत जिथे राज्य व्यवस्थेची क्षमता वाढवण्याचे काम अजूनही प्रगतीपथावर आहे.
- भारत आणि आफ्रिकेची लोकसंख्या पाहता जगातील एक तृतीयांश मनुष्यबळ
- लोकसंख्येतील ही असमानता योग्य प्रकारे वापरले गेले पाहिजे
- मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असलेले हे मनुष्यबळ वृद्धी आणि विकासाच्या कामी वापरावे
- विकसनशील देशांना उच्च आर्थिक वृद्धी दर गाठू न देण्यास कारणीभूत असलेल्या अनेक गोष्टींपैकी संबंधित तंत्रज्ञान विषयक मागासलेपणा हे एक महत्त्वाचे कारण आहे.
प्रमुख निर्यातदार म्हणून भारताची ओळख -
अलिकडच्या दशकात भारत एक प्रमुख संरक्षण निर्यातदार म्हणून उदयास आला आहे. मुबलक तांत्रिक, मनुष्यबळाचा फायदा, तसेच संरक्षण उत्पादन परिसंस्था येथे निर्माण करण्यात आली आहे. भारतीय संरक्षण उद्योग आफ्रिकी देशांच्या संरक्षण गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांच्याबरोबर काम करू शकतात. आफ्रिकन देशांना त्यांच्या सुरक्षेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञानाचा शोध घेण्याचे निमंत्रण देत, संरक्षण उत्पादन, संशोधन आणि विकासामध्ये भारताचे कौशल्य आणि ज्ञान सामायिक करण्यासाठी देखील वचनबद्ध असल्याचे सिंह यांनी नमूद केले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.