मुंबई- पुण्यातील अपघातासाठी कारणीभूत ठरलेल्या अल्पवयीन आरोपी तरुणाने त्या दिवशी पार्टीसाठी किती रुपये खर्च केले होते याचा आकडा समोर आला आहे. अल्पवयीन आरोपी तरुणाने त्यादिवशी ड्रिंक आणि जेवणासाठी तब्बल ४८ हजार रुपये खर्च केले आहेत. 'फ्री प्रेस जनरल'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
पुणे पोलीस कमीशनर अमितेश कुमार यांनी यासंदर्भातील माहिती दिल्याचं कळतंय. एफआयआरमधील माहितीनुसार, अल्पवयीन आरोपी कोझी रेस्टॉरंटमध्ये त्याच्या मित्रांसोबत रात्री साडेनऊच्या सुमारास गेला होता. त्यानंतर त्याने आणि मित्रांनी मद्य प्राशन केले. त्यानंतर ते हॉटेल ब्लॅकमध्ये गेले.
हॉटेल ब्लकमध्ये त्यांनी १ वाजपर्यंत मद्य प्राशन केले. मित्रांसोबत मद्य पित असतानाचा त्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हॉटेलमध्ये एका टेबल भोवती तो आणि त्याचे मित्र बसले आहेत. टेबलवर मद्याचे ग्लास दिसत आहेत. बारावी निकालाची पार्टी करण्यासाठी ते एकत्र आले होते.
पुणे पोलिसांनी याप्रकरणी आरोपीच्या वडिलांना छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे. त्यांना उद्या पुणे कोर्टासमोर हजर करण्यात येणार आहे. याशिवाय पुणे पोलिसांनी कोझे रेस्टॉरंटचे मालक नमन प्रल्हाद भुतडा आणि रेस्टॉरंट मॅनेजर सचिन अशोक काटकर यांना अटक केली आहे. याशिवाय ब्लॅक हॉटेलचे मालक संदीप रमेश सांगले आणि काऊंटर मॅनेजर जयेश सतीश बोनकर यांना देखील अल्पवयीन मुलांना मद्य पुरवल्याप्रकरणी अटक केली आहे.
आरोपींना येरवाडा पोलीस स्टेशनमधील पोलिसांनी पिझ्झा आणि बर्गर खाऊ घातल्याचा आरोप कुमार यांनी फेटाळून लावला आहे. तसेच तपासामध्ये राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही असं ते म्हणाले. याशिवाय कोणी पोलीस अधिकारी अयोग्य गोष्टी करत असल्याचं आढळलं तर त्याच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असं त्यांनी स्पष्ट केलं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.